मराठीचे शिलेदार” समूहाचा सार्थ अभिमान; विष्णू संकपाळ
मी मराठी असल्याचा अभिमान; सोनेरी क्षणाचे सोबती आम्ही
“मराठीचे शिलेदार” समूहाचा सार्थ अभिमान; विष्णू संकपाळ
मी मराठी असल्याचा अभिमान; सोनेरी क्षणाचे सोबती आम्ही
अभिजात भाषेचा दर्जा
माय मराठीचा सन्मान
मराठीचे शिलेदार समूहाचे
ज्यात अतुलनीय योगदान
अखेर ‘मराठी भाषेला’ अभिजात भाषेचा दर्जा बहाल केल्याची घोषणा केंद्र सरकारने केली आणि अभिमानाने उर भरून आला. गेल्या अनेक तपांचा हा संघर्ष भगिरथ प्रयत्न, प्रार्थना आणि अविरत पाठपुराव्याच्या बळावर सफल झाला. आज खर्या अर्थाने महाराष्ट्राची मान देशातच काय विश्वातच उंचावली आहे. सह्याद्रीचा कणखर बाणा सिद्ध झाला (तूर्तास आगामी विधानसभा निवडणुकीचा विषय बाजूला ठेवू)
या क्षणाच्या परिपूर्ततेसाठी खूप मोठी प्रतिक्षा करावी लागली आहे.. महाराष्ट्राच्या भाषिक अस्मितेसाठी वैयक्तिक आणि सामूहिक, सामाजिक, राजकीय पातळीवर शक्य तितके प्रयत्न प्रकर्षाने केले गेले. अभिजात भाषेचा दर्जा मिळण्यासाठी माय मराठीच्या पात्रतेची थोरवी शेकडो वर्षापूर्वी ज्ञानेश्वर माऊलींनीच कथन करून ठेवली आहे. ‘माझ्या मराठीची गोडी अमृताते पैजा जिंके, बोल बोलू कवतुके…’ याहून श्रेष्ठ प्रमाण अजून काय हवे? महाराष्ट्राला खूप मोठी संत परंपरा लाभली आहे. संत नामदेव, संत एकनाथ, जगद्गुरू तुकोबाराय यासारख्या अनेक संतसंज्जनांनी मराठीची पताका अटकेपार फडकविण्यात अतुलनीय योगदान दिले आहे. त्याचप्रमाणे अनेक ज्येष्ठ साहित्यिकांनीही आपापल्या परीने हा संघर्ष जिवंत ठेवला.
गेल्या आठ दहा वर्षापासून ‘मराठीचे शिलेदार’ बहुउद्देशीय संस्थेच्या माध्यमातून, मराठी भाषा सक्षमीकरण आणि संवर्धनाचे ध्येय बाळगून अहोरात झटत असलेल्या ‘श्रीमान राहुल पाटील’ या अवलिया व्यक्तिमत्वाची गोष्टच आगळीवेगळी आहे. ‘मराठीचे शिलेदार समूह’ या नावाने वाॅटस अॅप, फेसबुक च्या माध्यमातून महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातील कवी लेखकांची मोट बांधून अनेकांना लिहिते केले. आजवर शेकडो काव्यसंग्रह प्रकाशित करून अनेक नवोदितांना कवी म्हणून घडवले.. त्याचप्रमाणे चारोळी, चित्रचारोळी, हायकू, त्रिवेणी, बालकविता, ज्ञानमंजुषा, साहित्यगंध अशी अनेक व्यासपीठे उपलब्ध करून देत, मराठी नवकवी लेखकांना सतत प्रोत्साहन देत प्रकाशझोतात तर आणलेच.
मात्र मराठी भाषेच्या सक्षमीकरणात अत्युच्च योगदान दिले आहे. तसेच सातत्याने मराठी भाषेचा दर्जा मिळावा यासाठी शासनदरबारी या समूहाच्या माध्यमातून आवाज बुलंद केला. ही गोष्ट विशेष उल्लेखनीय आहे. संपूर्ण महाराष्ट्रातून याकामी अनेक व्यक्ती, संस्थांनी जरूर महान कार्य केलेले आहेच. मात्र श्री राहूल पाटील यांच्या कार्याचा वाटा सुद्धा विशेष कौतुकास्पद आहे. कारण ते आजही अनेक शिलेदार सोबत घेऊन अहोरात मराठी भाषेसाठी कार्यरत आहेत. याकामी त्यांच्या अर्धांगिनी सौ. पल्लवीताईजी, मुख्य प्रशासक परिक्षक सौ. सविताताई ठाकरे, सिलवासा, मुख्य परिक्षक सौ. वैशालीताई अंड्रसकर चंद्रपूर , प्रशासक परिक्षक सौ. स्वाती मराडे पूणे, विश्वस्त श्री अरविंद उरकुडे, श्री अशोक लांडगे, यांचे योगदान आणि बहुमूल्य सहकार्य सातत्याने आहेच. याशिवाय प्रशासक श्री संग्राम कुमठेकर, सौ. तारकाताई रूखमोडे, सौ. सुधाताई मेश्राम, सौ. प्रतिमाताई नंदेश्वर, सौ. शर्मिलाताई देशमुख, किशोर दादा, इत्यादी सहप्रशासक संकलकांचे कार्य सुद्धा कौतुकास्पद आहे.
असे व्यक्तिमत्व आणि अशा समूहाचा हिस्सा होण्याचे भाग्य मलाही मिळाले आणि एक सदस्य ते परीक्षक सहप्रशासक पदापर्यंत दादांनी मला पोहचवले. तसेच याच समूहाच्या माध्यमातून “काव्यप्रपंच” नावाने एक कवितासंग्रह सुद्धा प्रकाशित करू शकलो. आज मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला ही बातमी वाचून आकाश ठेंगणे झाले. या अभियानाचा एक इवलासा हिस्सा असल्याचा सार्थ अभिमान वाटला. यापुढेही सातत्याने मायमराठीची सेवा हातून घडावी हीच ईश्वरचरणी प्रार्थना. समस्त प्रशासक, परिक्षक, संकलक, तसेच सर्व सहकारी सारस्वत बंधू भगिनींना मनःपूर्वक शुभेच्छा आणि आभार.
विष्णू संकपाळ बजाजनगर छ. संभाजीनगर
©सदस्य, सहप्रशासक, परिक्षक मराठीचे शिलेदार समूह