आत्महत्या हा मुक्तीचा मार्ग होऊच शकत नाही’; विष्णू संकपाळ
शुक्रवारीय हायकू काव्यस्पर्धेघे परीक्षण
‘आत्महत्या हा मुक्तीचा मार्ग होऊच शकत नाही’; विष्णू संकपाळ
शुक्रवारीय हायकू काव्यस्पर्धेघे परीक्षण
जे जीवन मिळवण्याचा आपल्याला कांही अधिकार नाही. तेच जीवन स्वतःहून गमावण्याचा तर मुळीच नाही. किंबहुना जीवन हे जगण्यासाठीच आहे. आणि मृत्यू हा अटळ आहे. मग तो यायचा तेव्हा त्याच्या मर्जीनेच येऊ द्यावा. स्वतःच्या मर्जीने ओढवून घेणे म्हणजे शुद्ध पळपुटेपणा झाला. कारण व्यक्ती कोणीही असो त्याचे जीवन एक रणसंग्राम आहे. आणि संकटे, अपयश, नैराश्य, दुःख, वंचना. गरीबी. हे सर्व आपले शत्रू आहेत. या सर्वाशी निधड्या छातीने लढतो तोच खरा योद्धा ठरतो. मात्र मृत्यूला स्वतःकडे जबरदस्तीने ओढवून घेण्यात कोणता पुरुषार्थ आहे..? आत्महत्या हा कोणत्याही परिस्थितीत मुक्तीचा मार्ग होऊच शकत नाही. किंबहुना अशा निर्णायक प्रसंगी आत्मचिंतनातून आत्मसन्मान राखण्यासाठी, आत्मनिर्भर होत आत्मउन्नती साधणे यातच खरी जीवनाची सार्थकता आहे.
एक काळ असा होता की, एखाद्या असाध्य रोगाला कंटाळून आत्महत्या पत्करण्याची क्वचित उदाहरणे सापडायची मात्र आजकाल कोणत्याही वयोगटातील व्यक्ती अतिशय क्षुल्लक कारणावरून आत्महत्या करताहेत हीच सर्वात चिंतेची बाब आहे. विशेषतः तरूण..! ज्या वयात स्वसामर्थ्यावर यशाचे एक एक शिखर गाठण्याची धमक हवी, संकटांना निष्प्रभ करण्याची चमक हवी, अशा वयात भ्रामक समजुतींना बळी पडून जीव गमावणे समर्थनीय होऊच शकत नाही. आजकाल प्रेमभंगातून आणि जीवनातील अपयशाने नैराश्यातून आत्महत्या हा रोग फैलावतो आहे.
अशा क्षणी जरा विचार करावा की, अत्यंत जीवघेणी नैसर्गिक संकटे आली म्हणून आजवर कोणत्या मुक्या प्राण्याने आत्महत्या केली आहे का? मग बुद्धीजीवी माणूसच का टोकाला जातो आहे? ऐन वीस तीस वयातच जगण्याचे सर्व मार्ग संपतात? आरे माणसा, एक दार बंद झाले म्हणून काय झाले? कुठले तरी अन्य दार तुझ्या ठोठावण्याची वाट पहात आहे. संधीचा शोध घे…!
*का रे करशी*
*आत्महत्या निष्फळ*
*मृत्यू अटळ*
हे जरी खरे असले तरी जेव्हा परमपूज्य साने गुरुजी, अध्यात्मिक गुरू भैय्यू महाराज, मंदा आमटे असे दिग्गज आत्महत्येचा मार्ग निवडतात तेव्हा जीवन जगण्याचे सर्वच मार्ग खरेच संपलेले असतात का? हाच प्रश्न पडतो. वरवर सर्व आलबेल आहे किंवा ज्या व्यक्तींकडे पाहूनही परमशांतीची अनुभूती येते. त्या व्यक्तीच्या मनातही किती खळबळ माजलेली असेल याची यत्किंचितही कल्पना कुणाला येत नाही. माणूस संपर्कात आहे पण संबंधात, संवादात मात्र नाही हेच खरे.
काल शुक्रवारीय हायकू स्पर्धेसाठी समूह प्रमुख आदरणीय राहूल दादांनी दिलेले चित्र याच ज्वलंत समस्येला वाचा फोडणारे आहे. समस्त सारस्वतांनीही हायकू च्या माध्यमातून या समस्येला शब्द कोंदणात बद्ध करण्याचा छान प्रयत्न केला. सतरा अक्षरात सकारात्मक संदेश देण्याचा खूप स्तुत्य प्रयत्न केला गेला. सर्वांच्या लेखणीला भरभरून शुभेच्छा. आज मला हायकू परिक्षण लिहिण्याची संधी दिल्याबद्दल आ. राहुल दादा आणि समूह प्रशासनाचे आभार.
विष्णू संकपाळ बजाजनगर छ. संभाजीनगर
©सदस्य सहप्रशासक मराठीचे शिलेदार समूह