टी ई टी’ ची परीक्षा देताय…तर नक्की वाचा ही माहिती
‘टी ई टी’ ची परीक्षा देताय…तर नक्की वाचा ही माहिती
शिक्षक पात्रता परीक्षा (टीईटी) २३ नोव्हेंबर रोजी होणार आहे. या परीक्षा केंद्रातील प्रत्येक वर्गात समवेक्षक तैनात असणार आहेत. ते पाच मिनिटांपेक्षा जास्त वेळ एका जागी स्थिर राहिले तर एआय ( आर्टिफिशियल इंटेलिजेंस) आधारित हॉटलाइनद्वारे केंद्र संचालकांना सूचना मिळेल.
विद्यार्थी संशयास्पद हालचाल करत असेल, जसे की वारंवार मागे-पुढे पाहणे तरीही हॉटलाइन सक्रिय होईल. तसेच केंद्र संचालकांच्या केबिनमध्ये तीनपेक्षा जास्त लोक उपस्थित असतील किंवा अचानक अनोळखी व्यक्ती तिथे आल्यास, एआय-कॅमेरा वरिष्ठ अधिकाऱ्यांना अलर्ट पाठवेल. संपूर्ण परीक्षा प्रक्रियेत हा उच्चस्तरीय एआय-निगराणीचा वापर केला जाणार आहे.
कॉपीमुक्त, पारदर्शक परीक्षेसाठी यंदा प्रत्येक केंद्रावर ‘एआय’ हॉटलाइन, सीसीटीव्ही असणार आहेत. सकाळी साडेदहा वाजता पहिला पेपर सुरू होणार आहे. परीक्षेसाठी विद्यार्थ्यांनी एक तास आधी केंद्रावर उपस्थित राहणे आवश्यक आहे. त्यांचा चेहरा (फेस रेकग्निशन) व अंगठा बायोमेट्रिकद्वारे पडताळणी केला जाणार आहे. परीक्षार्थींचा चेहरा किमान ५० टक्के जुळायला हवा, अन्यथा त्याला परीक्षेला बसता येणार नाही.
परीक्षार्थीस कोणतीही इलेक्ट्रॉनिक्स वस्तू घेऊन जाता येणार नाहीत. दरम्यान, या परीक्षेत केंद्र संचालक, पर्यवेक्षक, समवेक्षक यांच्यावरही ‘एआय’ कॅमेऱ्यांचे लक्ष असणार आहे. प्रत्येक केंद्रावरील संशयास्पद हालचालींचा अलर्ट महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेसह संनियंत्रण कक्षातील अधिकाऱ्यांना लगेचच मिळणार आहे. सर्वोच्च न्यायालयाने इयत्ता पहिली ते आठवीच्या वर्गांवरील ५२ वर्षांपर्यंतच्या शिक्षकांसाठी ‘टीईटी’ बंधनकारक केली. त्यामुळे यंदा ‘टीईटी’साठी गतवर्षीच्या तुलनेत लाखभर अर्ज जास्त आले आहेत.
पहिल्यांदाच असतील सॅटेलाईट फोन
राज्यातील पावणेपाच लाख उमेदवार २३ नोव्हेंबरला ‘टीईटी’ देतील. त्यासाठी १४२३ परीक्षा केंद्रे असून, त्या प्रत्येक केंद्राला यंदा एक अतिरिक्त समवेक्षक दिला आहे. परीक्षा नेहमीप्रमाणे पारदर्शक होईल, यासाठी यंदा प्रत्येक केंद्रावर ‘एआय’चा वापर केलेला सॅटेलाईट हॉटलाईन (फोन) असणार आहे.
– डॉ. नंदकुमार बेडसे, अध्यक्ष, महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद
प्रत्येक जिल्ह्यात संनियंत्रण कक्ष
शिक्षक पात्रता परीक्षेसाठी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हाधिकारी कार्यालयात संनियंत्रण कक्ष असणार आहे. त्याठिकाणी सॅटेलाईट फोन तथा हॉटलाइन दिला जाणार आहे. त्या माध्यमातून जिल्ह्यातील अधिकाऱ्यांना महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेमार्फत व्हाईस मेसेज किंवा फोन करून परीक्षेतील हालचालींची माहिती दिली जाणार आहे.



