“परिवर्तनाच्या लाटेत कालबाह्य झालेली सायकल रिक्षा..”; विष्णू संकपाळ
शुक्रवारीय 'हायकू काव्य' स्पर्धेचे परीक्षण
“परिवर्तनाच्या लाटेत कालबाह्य झालेली सायकल रिक्षा..”; विष्णू संकपाळ
शुक्रवारीय ‘हायकू काव्य’ स्पर्धेचे परीक्षण
भारतात १९७० च्या दशकात असा एक काळ होता. घोडागाडी अर्थात टांगा आणि सायकल रिक्षा हा मोठ्या शहरातील स्थानिक प्रवासी वाहतूकीचा महत्वाचा हिस्सा होता. ‘कोल्हापूर भागात टांगा प्रसिद्ध होता, तर विदर्भातील काही जिल्ह्य़ात विशेषतः नागपूर शहरात सायकल रिक्षा प्रसिद्ध होती’. तीन चाकाचे हे वाहन, कोणत्याही इंधनाशिवाय मानवी श्रमावर चालत होते. बसस्टँड आणि रेल्वे स्थानकावर या वाहनांचा प्रमुख थांबा असे. बाहेरगावाहून आलेल्या प्रवाशांना त्यांच्या सामानासह शहरातल्या कोणत्याही कोपर्यात पोहचवणे यांचे काम असे. दराबाबत घासाघीस करून हा रिक्षावाला सवारी घेऊन निघत असे. शहराच्या काही भागातील कच्चे रस्ते आणि चढावाच्या ठिकाणी रिक्षाचालकाची कसोटी लागत असे.
मात्र उदरनिर्वाहासाठी हे जीवघेणे कष्ट उपसणारा एक वर्ग याच सायकल रिक्षावर आपले संसार चालवत होता. काहीजण शाळेच्या मुलांची ने आण करत असत. चार पैसे जास्तीचे मिळवून दोन पैसे गाठीशी टाकण्याच्या हेतूने तरूण वयात कमीजास्त सवार्या करणार्या लोकांना, उतारवयात गुडघे, कंबर आणि पाठीचे दुखणे ही देणगी हमखास मिळत असे. काळ नेहमीच कूस बदलत राहतो. आणि नवीन काहीतरी घेऊन येत असतो. हळूहळू अॅटोरिक्षाचा चंचुप्रवेश शहरात झाला आणि सायकल रिक्षाच्या तुलनेत आरामदायी व जलद प्रवास, वेळेची बचत या गोष्टीमुळे सायकल रिक्षाचा धंदा बसला. या स्पर्धेत टिकणे दुरापास्त झालेले लोक मालवाहतूकीकडे वळले. मात्र तिथेही अॅटोरिक्षाने प्रवेश केल्याने सायकल रिक्षाचे चाक परिवर्तनाच्या चिखलात कायमचे रूतले ते रूतलेच.
शुक्रवारीय ‘हायकू काव्य’ स्पर्धेसाठी समूह प्रमुख आदरणीय राहुल दादांनी याच सायकल रिक्षाचे चित्र देऊन जून्या आठवणींना उजाळा दिला. अशा विषयांचे गांभीर्य, महत्त्व लक्षात घेऊन परिणामकारक हायकू निर्मिती होणे अपेक्षित असते. त्या काळात त्याची उपयोगिता आणि या काळात त्याची कालबाह्यता ,अधोरेखित होणे अपेक्षित असते. आपल्या रचनेतून चित्रातला क्षण पकडणे आवश्यक तर आहेच. मात्र त्या विषयाला न्याय देणे सुद्धा तितकेच महत्त्वाचे आहे. म्हणून तर सतरा अक्षरांची ही कसरत प्रतिभेचा कस लावणारी असते. सर्व सहभागी हायकूकारांचे अभिनंदन आणि शुभेच्छा. मला परिक्षणाची संधी दिल्याबद्दल आ. राहुल दादांचे मनःपूर्वक आभार…!!
विष्णू संकपाळ बजाजनगर छ. संभाजीनगर
©सदस्य सहप्रशासक मराठीचे शिलेदार समूह



