आयुष्याच्या आभाळातील न मावळणारा चंद्र…!!!
सौ.सविता पाटील ठाकरे सिलवासा,दादरा नगर हवेली

आयुष्याच्या आभाळातील न मावळणारा चंद्र…!!!
काही नाती जन्माने जुळतात, पण ती आयुष्यभर जपली जातात. प्रेमाने काही व्यक्ती घरात राहतात, पण त्या मनाच्या मंदिरात विराजमान होतात आणि काही माणसं आयुष्यभर आपल्यासाठी जगतात, म्हणूनच त्यांचं ऋण शब्दांनी कधीच फेडता येत नाही. माझ्या आयुष्यात जर अशी एखादी व्यक्ती असेल, जिने आईच्या मायेची ऊब, वडिलांच्या आधाराची ताकद, गुरूच्या ज्ञानाचा प्रकाश आणि मैत्रिणीच्या स्नेहाचा जिव्हाळा एकाच वेळी दिला, तर ती म्हणजे माझी ताई सौ. वैशालीताई अंड्रस्कर, चंद्रपूर, माझी तायडे.
ताई… हे फक्त एक नातं नाही. ती माझ्या आयुष्याच्या पुस्तकातील सर्वात सुंदर अध्याय आहे. ती माझ्या मनाच्या मंदिरातील अखंड तेवणारी समई आहे. ती माझ्या सुख-दुःखाची साक्षीदार आहे. माझ्या प्रत्येक अश्रूला अलगद पदर लावणारी, प्रत्येक वेदनेवर मायेचा फुंकर घालणारी, प्रत्येक अपयशात धीराचा हात देणारी आणि प्रत्येक यशात स्वतःपेक्षा अधिक आनंदाने डोळे भरून येणारी माझी ताई. माझ्यासाठी ‘ती’ देवाने दिलेला सर्वात सुंदर आशीर्वाद आहे.
२०१८ पासून तिच्या सहवासात मी आली आणि आयुष्याच्या प्रत्येक वळणावर मी तिची माया अनुभवली. माझ्या पावलांना अडथळे आले, तेव्हा ती माझी वाट बनली, माझे हात थकले तेव्हा ती माझं बळ बनली, माझ्या डोळ्यांत अश्रू दाटले तेव्हा ती माझं धैर्य बनली. आयुष्याच्या वादळात माझ्या डोक्यावर तिने मायेची छत्री धरली आणि उन्हात सावली बनून उभी राहिली. तिचं व्यक्तिमत्त्व म्हणजे शांत वाहणारी नदी. स्वतः झिजत राहून इतरांना जीवन देणारी. सुगंध स्वतःकडे न ठेवता सर्वत्र दरवळणाऱ्या चंदनासारखी. अंधार स्वतःमध्ये सामावून इतरांना प्रकाश देणाऱ्या दीपस्तंभासारखी. तिच्या चेहऱ्यावरचं स्मित अनेकांना जगण्याची उमेद देत आलं आहे.
शिक्षिका म्हणून तिचा प्रवास हा केवळ सेवेचा नव्हताच; तो संस्कारांचा यज्ञ होता. वर्गात ती धडे शिकवत नव्हती, ती भविष्य घडवत होती. ती फळ्यावर अक्षरं लिहीत नव्हती, ती विद्यार्थ्यांच्या आयुष्यावर सुवर्णाक्षरांनी संस्कार कोरत होती. तिच्या प्रत्येक शब्दात प्रेम होतं, प्रत्येक नजरेत माया होती आणि प्रत्येक कृतीत कर्तव्याची प्रामाणिकता होती. आज तिच्या सेवाप्रवासाला औपचारिक पूर्णविराम मिळत आहे. पण अशा व्यक्तींच्या कार्याला पूर्णविराम नसतो. शिक्षक कधी निवृत्त होत नाही, तो विद्यार्थ्यांच्या स्मृतीत, त्यांच्या यशात आणि त्यांच्या संस्कारांत कायम जिवंत राहतो. म्हणून आजचा दिवस हा निरोपाचा नाही; तर एका तेजस्वी प्रवासाला मानवंदना देण्याचा दिवस आहे.
ताई, आयुष्यभर तू स्वतःच्या इच्छा बाजूला ठेवून कुटुंबासाठी, विद्यार्थ्यांसाठी आणि समाजासाठी जगलीस. स्वतः झिजून इतरांच्या आयुष्यात आनंद फुलवलास. स्वतःचा थकवा विसरून इतरांच्या चेहऱ्यावर हास्य आणलंस. म्हणूनच आज तुझ्या आयुष्याच्या या नव्या पर्वात सुखाचे, समाधानाचे आणि निवांतपणाचे असंख्य क्षण तुझ्या पदरात पडावेत, हीच परमेश्वराच्या चरणी प्रार्थना. तुझ्या आयुष्याचा प्रत्येक दिवस सोन्यासारखा उजळो. प्रत्येक सकाळ आशेची नवी किरणं घेऊन येवो. प्रत्येक संध्याकाळ समाधानाच्या सुवर्णरंगांनी नटलेली असो. तुझ्या अंगणात आनंदाची फुलं बहरोत, घरात प्रेमाचा गंध दरवळत राहो आणि तुझ्या चेहऱ्यावरचं निरागस हास्य कधीच मावळू नये.
ताई, ‘तू माझ्यासाठी केवळ एक नातं नाहीस. तू माझ्या आयुष्याचा आधारवड आहेस’. तू माझ्या भावविश्वातील अढळ ध्रुवतारा आहेस. तू माझ्या प्रत्येक आनंदामागची प्रेरणा आहेस. तू माझ्या आयुष्याच्या आभाळातील ती चांदणी आहेस, जी स्वतः जळत राहून इतरांना प्रकाश देत राहते. तुझ्या मायेची सावली, तुझ्या प्रेमाचा ओलावा, तुझ्या शब्दांचं बळ आणि तुझ्या सहवासाची ऊब माझ्या आयुष्याची सर्वात मोठी श्रीमंती आहे.
आज मी जे काही आहे, त्यामागे माझ्या आई-वडिलांचे संस्कार आहेत, पण त्या संस्कारांना दिशा देणारा हात तुझाही आहे. माझ्या आयुष्याच्या प्रत्येक यशामागे तुझा निःशब्द आशीर्वाद आहे. माझ्या प्रत्येक धैर्यामागे तुझा विश्वास आहे. माझ्या प्रत्येक स्वप्नामागे तुझी प्रेरणा आहे.
ताई, तुझं ऋण शब्दांत व्यक्त करणं म्हणजे अथांग सागर एका ओंजळीत माववण्याचा प्रयत्न आहे. तरीही आज एवढंच म्हणेन..
तू माझ्या आयुष्याची पहिली गुरू आहेस…
तू माझ्या मनाची शांत प्रार्थना आहेस…
तू माझ्या विश्वासाची भक्कम वीट आहेस…
तू माझ्या संघर्षाची शक्ती आहेस…
तू माझ्या आनंदाचं हसू आहेस…
आणि.. “तू माझ्या आयुष्याच्या आभाळातील कधीही न मावळणारा चंद्र आहेस”.
ईश्वराला एकच प्रार्थना.. “देवा, माझ्या ताईच्या आयुष्यातील प्रत्येक दिवस आनंदाने भरून टाक. तिच्या चेहऱ्यावरचं हास्य कधीच हिरावून घेऊ नकोस. तिने आयुष्यभर इतरांच्या वाटा उजळल्या; आता तिची प्रत्येक वाट सुख, समाधान, आरोग्य आणि प्रेमाच्या फुलांनी बहरलेली असू दे.” ताई… तुझ्यावर मनापासून प्रेम आहे. तुझा अभिमान आहे. आणि तो माझ्या शेवटच्या श्वासापर्यंत राहील…!!
तुझीच लहान बहीण…
सविता (तुझी सवू).
सौ.सविता पाटील ठाकरे
सिलवासा,दादरा नगर हवेली
कार्यकारी संपादक साहित्यगंध
=============



