विद्यार्थ्यांना मिळणार तिसरी आवडीची भाषा विषयाची पुस्तके
राज्यात होणार १०,००० कंत्राटी शिक्षकांची भरती

विद्यार्थ्यांना मिळणार तिसरी आवडीची भाषा विषयाची पुस्तके
राज्यात होणार १०,००० कंत्राटी शिक्षकांची भरती
मुंबई: नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार, महाराष्ट्र शासनाच्या शालेय शिक्षण विभागाने इयत्ता पहिली ते चौथीच्या विद्यार्थ्यांसाठी त्रिभाषा सूत्राचा स्वीकार केला आहे. यामध्ये मराठी आणि इंग्रजीनंतर विद्यार्थ्यांना त्यांची तिसरी आवडती भाषा निवडता येणार आहे.
पण सध्या हिंदी वगळता इतर तिसऱ्या भाषेचे शिक्षक उपलब्ध नसल्यामुळे, सरकारने तर्फे सरल पोर्टलद्वारे विद्यार्थ्यांकडून तिसऱ्या भाषेची पसंती घेतली जाईल आणि त्यानंतर त्या-त्या भाषेतील आठ ते दहा हजार कंत्राटी शिक्षक भरले जातील.
विद्यार्थी निवडू शकणार आपली तिसरी भाषा!
* पहिलीच्या विद्यार्थ्यांना आता मराठी आणि इंग्रजीसोबत तिसरी भाषा निवडावी लागेल.
* विशेष म्हणजे, विद्यार्थी पहिली ते चौथीमध्ये कधीही आपली तिसरी भाषा बदलू शकतील.
* यासाठी त्या-त्या भाषेतील तज्ज्ञ शिक्षक नेमले जातील.
या संदर्भात शिक्षण आयुक्त सचिंद्र प्रताप सिंह यांनी सांगितले की, जर एखाद्या भाषेत २० पेक्षा कमी विद्यार्थी असतील, तर त्यांना ती भाषा ऑनलाइन शिकवली जाईल, पण ऑफलाईन शिकवण्याचीही व्यवस्था करावी लागेल.
ऑगस्टमध्ये मिळणार पुस्तके!
राज्यातील शाळा १६ जूनपासून सुरू झाल्या आणि आज (दि २३) विदर्भातील सुरू झाल्या असल्या तरी, तिसऱ्या भाषेची पुस्तके अजूनही विद्यार्थ्यांना मिळालेली नाहीत. आता इयत्ता पहिलीच्या विद्यार्थ्यांची तिसऱ्या भाषेची पसंती घेऊन त्यांना ती पुस्तके ऑगस्ट अखेरपर्यंत उपलब्ध करून दिली जातील.





