समाजमनाचा आक्रोश व्यक्त करणा-या झडत्यांची जुगलबंदी; प्रशांत ठाकरे
शनिवारीय 'काव्यस्तंभ' स्पर्धेचे काव्यपरीक्षण
समाजमनाचा आक्रोश व्यक्त करणा-या झडत्यांची जुगलबंदी; प्रशांत ठाकरे
शनिवारीय ‘काव्यस्तंभ’ स्पर्धेचे काव्यपरीक्षण
“लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी…
जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी…’
धर्म, पंथ, जात एक जाणतो मराठी…
एवढ्या जगात माय मानतो मराठी…”
मराठी भाषा म्हणजे महाराष्ट्राची आन, बाण आणि शान. महाराष्ट्र खरंतर संतांची भूमी, कलेचे माहेरघर आणि शिवछत्रपतींच्या आदर्शांवर चाललेलं एक राज्य. विविधतेतून एकतेचा मूलमंत्र जोपासणाऱ्या महाराष्ट्रात अनेक प्रांत आपापले वेगळेपण जोपासतात. यातलाच एक म्हणजे विदर्भ… विदर्भाला कला, संस्कृती, भाषा, स्थापत्य या आणि अशा अनेक क्षेत्रात वैभवशाली सांस्कृतिक वारसा लाभलेला आहे. अनेकाविध परंपरा जपणाऱ्या विदर्भात कीर्तन, दशावतार, वगनाट्य, तमाशा, लोकनाट्य ,विधीनाट्य, बहुरूपी डोंबा-याचे खेळ, पोवाडा, गोंधळ, जागरण, कलगीतुरा, बहुरूपी, जोशी, वासुदेव यासोबतच लोककाव्य क्षेत्रात पोळ्याच्या “झडत्या” ही पाहायला मिळतात.
‘पोळा म्हणजे शेतकऱ्यांचा मोठा सण सजवलेल्या बैलांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याचा दिवस’. पोळा भरवला जातो आणि अशावेळी कृतज्ञतेच्या भावनेने खड्या आवाजात सुरू होतात त्या झडत्या. पोळा सणात, गावातील लोक बैलांसाठी खास गाणी म्हणतात, त्यांना ‘झडत्या’ म्हणतात. या गीतांमधून शेतकऱ्यांच्या भावना आणि बैलांविषयीचा आदर दर्शवला जातो. “झडत्या म्हणजे एक पारंपरिक लोककाव्य प्रकार आहे, जो विशिष्ट लयीत बैलांच्या साक्षीने सादर केला जातो.” शेतकरी आणि एकूण समाजमनाचा आक्रोश व्यक्त करणा-या झडत्यांच्या जुगलबंदीने हा सण साजरा केला जातो.
“एक नमनगौरा पार्वती हर हर महादेव….! “जसे भोंडला, हादगा, भुलाबाई या महिलांच्या गीतांची मांदियाळी पहावयास मिळते तसेच पहाडी आवाजातील या झडत्यांमधून विडंबन, विनोद, मिश्किल, टीकात्मक व चिमटे पाहावयास मिळतात. खऱ्या अर्थाने हे ग्रामीण शेतकरी भाषेतील काव्यच होय.
शेतकऱ्यांचे उत्पन्न, करतो म्हणे दुप्पट
अन् तुह्या राज्यात तर राज्या
शेतकरी आत्महत्या तिप्पट…..!!
यासारख्या झडत्या राजकीय परिस्थितींवर पण वज्रप्रहार करतात. अशा झडत्यांमधून लोककलेचा समृद्ध वारसा जोपासला जातो. आज शनिवारीय काव्यस्तंभ स्पर्धेसाठी मराठीचे शिलेदार समूहाचे सर्वेसर्वा आदरणीय राहुल सरांनी पोळ्याच्या पार्श्वभूमीवर “झडत्या” हा विषय देण्यामागचा उद्देश लोकसंस्कृतीचं जतन हाच होता. कारण बदलत्या परिस्थितीनुरूप कोकणातील नाट्यकला दशावतार, लोकनाट्य भारुड, शौर्यगाथा पोवाडा, तमाशा, लावणी, भारुडे, वासुदेव गुडगुडीवाले… अशा अनेक कला लोप पावत चालल्या आहेत यात झडत्यांचीही भर पडू नये हा उद्देश डोळ्यासमोर ठेवला होता. महत्त्वाचे म्हणजे समूहास आज ‘झडत्या’ हा काव्यप्रकार अपेक्षित होता.
अर्थात समूहात अनेक दिग्गज कवी कवयित्री आहेतच, त्यासोबतच नवोदितांनी सुद्धा या विषयाला न्याय देताना हा प्रकार लोकांसमोर यावा यासाठी प्रयत्न केलेत. सर्वांचे खूप खूप अभिनंदन…! आदरणीय राहुल सरांनी “झडत्या” या विषयासाठी माझ्यावर जो विश्वास दर्शवला त्यासाठी सरांचे विशेष आभार. पुढील लिखाणासाठी सर्व सारस्वतांना खूप खूप शुभेच्छा मनापासून सर्वांचे धन्यवाद.
श्री. प्रशांत ठाकरे, सिलवासा
दादरा नगर हवेली दीव दमण
परीक्षक/ सहप्रशासक/ लेखक
©मराठीचे शिलेदार समूह





