सि ई ओ च्या अधिकारपणातही माणुसकीच्या ओलाव्याचे दर्शन
सि ई ओ च्या अधिकारपणातही माणुसकीच्या ओलाव्याचे दर्शन
जुन्नर तालुक्यातील ‘विरणक’ नामक शिक्षकाने अनुभवला माणुसकीचा उमाळा
कोल्हापूर बिनधास्त न्यूज वृत्तसेवा
कोल्हापूर: कोल्हापूर जिल्हा परिषदेकडे शिक्षक म्हणून नियुक्ती झाल्यानंतर आज समुपदेशन प्रक्रियेने शाळा घेण्यासाठी आलेल्या जुन्नर तालुक्यातील हरिभाऊ विरणक या शिक्षकांवर दुःखाचा डोंगर कोसळला.
धरणीचं अंथरूण आणि आभाळाचं पांघरून करून पोटच्या लेकाला मास्तर करण्यासाठी हयातभर राबलेला बाप. वाटेला डोळे लावून बसलेला, अलीकडच्या काळात शासकीय नोकरीसाठी प्रचंड स्पर्धा निर्माण झालीय.नोकरी असली की जीवनप्रवासाची गाडी योग्य वळण घेते असं म्हणतात.नोकरीसाठी हजर झालेल्या माझ्या मुलाला कोल्हापूर जिल्ह्यातील कोणतं गाव मिळणार? अनोळखी गाव,अनोळखी माणसं. साराच अनभिज्ञ प्रवास.
कोल्हापूर जिल्हा परिषदेकडे पवित्र पोर्टल मधून शिक्षण सेवकपदी रुजू होण्यासाठी दाखल झालेला जुन्नर तालुक्यातील ‘हरिभाऊ विरनक’ नावाचे शिक्षक आज कोल्हापूर येथील शासकीय विश्रामगृह येथे नोकरीचे गाव घेण्यासाठी आले असताना पाठीमागे वडील गेल्याची दुःखद बातमी कानावरती येते.सार अवसान गळून पडतं. हयातभर काबाडकष्ट करून मूलग्याला शिक्षक झालेला बघण्याचं बापाचं स्वप्न मात्र अधुरच राहिलं. समुपदेशन प्रक्रिया चालू असताना हा प्रसंग घडला. जिल्हा परिषद प्रशासन आणि उपस्थित सर्व नवनियुक्त शिक्षकाच काळीज हेलावून गेलं.
या प्रसंगांमध्ये जिल्हा परिषदेचे संवेदनशील मनाचे सीईओ एस. कार्तिकेयन यांनी क्षणाचाही विलंब न लावता तात्काळ त्या शिक्षकाला जुन्नर तालुक्यातील त्याच्या गावाला जाण्यासाठी स्वतःच्या गाडीची सोय करून देतात. वडिलांच्या अंत्यदर्शनासाठी स्वतःची गाडी पाठवून ‘अधिकारपणातही माणुसकीच्या ओलाव्याचे’ दर्शन घडवणारे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी एस कार्तिकेयन यांच्या निकोप,निखळ आणि निर्व्याज स्वभावाची संवेदनशीलता उपस्थितांनी अनुभवली.
हाती नोकरीची ऑर्डर, जीवनातील अत्यानंदाचा क्षण आणि नेमके त्याच वेळी मोबाईलवर मेसेज आला वडिलांचे मृत्यू झाल्याचा. मन सुन्न करणारी ही घटना. जुन्नर येथील हरिभाऊ दिगंबर विरणक या शिक्षकाला गुरुवारी एकाच वेळी हसू आणि आसू अशा स्थितीला सामोरे जावे लागले. वडिलांच्या मृत्यूने धक्का बसलेल्या त्या शिक्षकाला जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कार्तिकेयन एस यांनी आधार दिला. शिक्षकाचे सांत्वन केले आणि वडिलांच्या अंत्यदर्शनाला जाण्यासाठी स्वतःच्या वाहनाची सोय केली.
यापूर्वी झालेल्या समुपदेशन शिक्षक बदली प्रक्रियेत संपूर्ण जिल्ह्याने सीईओंच्या संवेदनशील,कर्तव्यदक्ष आणि माणुसकीच्या स्वभावाचे दर्शन घडले आहे. मुलाखतीवेळी सुद्धा परगावच्या उमेदवाराची निवासाची सोय करणारा हा अधिकारी विरळाच! ‘याची देही याची डोळा’ हा प्रसंग पाहताना मुलाखतीसाठी आलेल्या उपस्थित शिक्षकांच्याही भावनांचा बांध फुटला आणि नकळत डोळ्यातून अश्रू ओघळले.
कोल्हापूर जिल्हा परिषदेमार्फत आज गुरुवारी २७ जून रोजी सर्किट हाऊस विश्रामगृह येथे शिक्षक भरतीची प्रक्रिया आयोजित केली होती. पवित्र पोर्टल द्वारे निवड झालेल्या शिक्षकांना पदस्थापनासाठी बोलावले होते. समुपदेशनाने पदस्थापना करण्यात येत आहे. समुपदेशन द्वारे पदस्थापनेची प्रक्रिया सुरू असताना शिक्षक हरीभाऊ दिगंबर विरणक यांच्या वडिलांचे निधन झाले असा मेसेज आला. समुपदेशन साठी आलेल्या शिक्षकांच्या वडिलांचे निधन झाल्याची माहिती सीईओ कार्तिकेयन एस यांना समजली. मुख्य कार्यकारी अधिकारी सभागृहाबाहेर आले. त्या शिक्षकाचे सांत्वन केले. धीर दिला. आणि त्या शिक्षकांना स्वतःच्या गाडीतून पोहचविण्याचे नियोजन केले. स्वतः त्या शिक्षकाला घेऊन गाडीपर्यंत गेले. ड्रायव्हरला सूचना केल्या.
मुख्य कार्यकारी अधिकारी कार्तिकेमन एस यांनी दाखविलेली संवेदनशीलता, माणुसकी आणि तत्परता या साऱ्या गोष्टी मात्र उपस्थित शिक्षकांना मनापासून भावल्या. म्हणून जिल्हा परिषदेचे तरुण, होतकरू, संवेदनशील मनाचे मुख्य कार्यकारी अधिकारी एस.कार्तिकेयन हे कोल्हापूर जिल्हा परिषद कडे हजर झाल्यापासून समस्त जिल्हा प्रशासनाच्या कर्तव्यातील सचोटी आणि माणूसपणाच्या ओलाव्याचा निखळ झरा आहे अशाच भावना समस्त शिक्षकातून उमटल्या. अशा कर्तव्यदक्ष अधिका-याची खरी गरज आज समाजाला आहे.