स्वच्छंदीपणाचा दैवी अविष्कार म्हणजे बालपण’; विष्णू संकपाळ
शुक्रवारीय हायकू काव्यस्पर्धेचे परीक्षण
‘स्वच्छंदीपणाचा दैवी अविष्कार म्हणजे बालपण’; विष्णू संकपाळ
शुक्रवारीय हायकू काव्यस्पर्धेचे परीक्षण
*निर्गुण निराकार भुलले, घेतले सगुण साकारपण*
*राम कृष्ण रूपात, देवानेही अनुभवले बालपण…*
“लहानपण देगा देवा, मुंगी साखरेचा रवा.
ऐरावत रत्न थोर, त्याशी अंकुशाचा मार.
जयाअंगी मोठेपण, तया यातना कठिण.
तुका म्हणे जाण, व्हावे लहानाहून लहान.
संतश्रेष्ठ जगद्गुरू तुकाराम महाराज यांचे हे शब्द बालपणीची महती विषद करण्यास पुरेसे आहेत.. जगातला असा एकही व्यक्ती नसेल की त्याला बालपण भावले नसेल.. किंबहुना मोठेपण पेलता झेलता बालपणीच्या आठवणींनी आपसूकच नेत्रकडा ओलावतात. प्रत्येक व्यक्तीचे बालपण हे त्याच्यासाठी एक स्वतंत्र विश्वच!
ऋतु कोणताही असो, बालपण कधीच बंदिस्त होत नाही. ते अगदी बिंधास्त बागडतं, आणि त्या त्या ऋतुंच्या रंगात रंगून जातं. पावसाचा पहिलाच थेंब अंगावर झेलतं. टप्पोर्या गारा वेचतं, बेभान होऊन नाचतं, गल्लीतल्या वाहणार्या लोंढ्यात होड्या होड्या खेळतं, राडी चिखलात लोळतं. खर्या खुर्या आनंदात नखशिखांत माखतं. पुढं येतो हिवाळा. कडाक्याच्या थंडीची पर्वा करत नसतं, मफलर, स्वेटर, टोपीचं कांहीच घेणं देणं नसतं, वाळक्या काट्या कुट्या “सासू” म्हणून जाळतं, शेकोटीच्या उबेत मनमुराद स्वतःला शेकतं. गार बोचर्या वार्यातही रानोमाळ हुंदडतं. रानमेवा खात खात निसर्गगीत गात राहतं.
*उत्साही मन*
*स्वच्छंदी बालपण*
*आनंदघन…*
कधी ज्वारीच्या ताटाची तर कधी सायकल स्कूटरच्या टायरांची गाडी सुसाट पळवत राहतं. काड्यापेटींचा फोन करून तिथेच संवाद साधतं. कागदाचं विमान करून आकाशात भिरभिरतं. नद्या ओहळ विहिरीत मनसोक्त डुंबतं. किती असो कडक उन्हाळा घामाच्या धारात क्रिकेट क्रिकेट खेळतं. घर, शाळा, शेत, शिवार एकाच ड्रेसवर भागतं. कधी मोठ्या भावाचं लहान भावंडात वाटून घेतं. परिस्थिती हलाखीची तरी मनस्थिती करोडोंची.! ओझं नसतं अपेक्षांचं, भिती नसते उपेक्षेची, चिंता नसते परीक्षेची अन् प्रतिक्षा नसते निकालाची. जे येईल जसे येईल मोठ्या मनानं स्विकारतं. ना खंत ना खेद अपयशातूनच शिकत जातं. गुरूंजींचा मार, फुलांचा हार मानतं, आईबापाच्या शिव्यांनाही बहिणाईच्या ओव्या मानतं. शिक्षेची ना तक्रार करतं. आनंदाच्या दानानं सतत ओंजळ भरत राहतं.. असं बालपण कुठं असतं.? बालपणात हरवून बसतं. मोठेपणी आठवतं. आसवातून झिरपतं. लाखो कोटीचा पैसा मोजूनही एक क्षणही ना घेऊ शकतं तेच अनमोल बालपण असतं. जे फक्त अनुभवायचं असतं. हातातून सुटलं की फक्त आठवणीत रेंगाळतं. साठवणीतलं मोरपीसं हळूवार अंगावर फिरतं. मन कावरं बावरं होतं. इथं तिथं शोधू लागतं. शोधूनही जे सापडत नसतं तेच तर बालपण असतं. कधीच विस्मृतीत जात नसतं. फेर धरून समोर नाचत येतं.
काल शुक्रवारीय हायकू काव्य स्पर्धेसाठी आदरणीय राहूल दादांनी दिलेले चित्र म्हणजे बालपणाची मुक्त सैर. अल्लड अवखळ खट्याळपण, लटके तंटे बखेडे, मात्र मनात नाही मुळीच वैर. स्वच्छंदीपणा, निरागसता, जे आहे त्यात हौस मौज. समूहात विषय येताक्षणीच रचनांची अविरत बरसात झाली. प्रत्येकाने आपापल्या परीने बाललीला साकारल्या. स्वछंदीपणाचा दैवी अविष्कार म्हणजे बालपण! याचाच साक्षात्कार आज समूहात झाला.! असेच भरभरून व्यक्त होत रहावे. सर्वांच्या लेखणीला मनापासून शुभेच्छा! मला परिक्षण लिहिण्याची संधी दिल्याबद्दल आ. राहूल दादांचे आभार..
विष्णू संकपाळ बजाजनगर छ. संभाजीनगर
©सदस्य सहप्रशासक मराठीचे शिलेदार समूह