“राजकीय धुळवडीत रंगलेला ‘जुना गडी नवा डाव’….!” वैशाली अंड्रस्कर
शनिवारीय काव्यस्तंभ स्पर्धेचे काव्य परीक्षण
“राजकीय धुळवडीत रंगलेला ‘जुना गडी नवा डाव’….!” वैशाली अंड्रस्कर
शनिवारीय काव्यस्तंभ स्पर्धेचे काव्य परीक्षण
निरागसपणे सरलेले बालपण, मस्तीत उधळलेले तरूणपण, जबाबदाऱ्या पार पाडलेली प्रौढावस्था आणि थरथरते वृद्धत्व या सगळ्यांमध्ये अनुभवलेले बालपण कधीच विसरता न येण्याजोगे. शाळा, घर, दोस्त मित्र, या सगळ्यांच्या सोबतीने मांडलेले वेगवेगळे खेळ, डाव मग ते असो विटीदांडूचे, लगोरीचे, लंगडी, लपंडाव, काचापाणी वा झेलगोट्यांचे. या सगळ्यांमध्ये लपंडाव हा खेळ जरा ऐतिहासिक महत्त्व सांभाळून बसलेला. कारणही तसंच…या खेळात मधूनच एखाद्या गड्याला खेळामध्ये घ्यायचं असेल तर त्या नवीन गड्याला डाव द्यावा लागायचा. रेश-टीप म्हणता म्हणता तो गडीही खेळात सहज सामावून जायचा.
लपंडाव या खेळाला ऐतिहासिक महत्त्व यासाठी की, या खेळातील ‘नवा गडी नवा डाव’, हा वाक्प्रचार सध्या यत्र तत्र सर्वत्र व्यापून राहिलेला आहे. मात्र महाराष्ट्रातील सध्याच्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर म्हणा किंवा नात्यांतील गुंतागुंत सोडविण्याचा एक उपाय म्हणून समजा…काल मराठीचे शिलेदार समूहात शनिवारीय काव्यस्तंभ स्पर्धेच्या निमित्ताने माननीय राहुल दादा पाटील यांनी ‘जुना गडी नवा डाव’, असा जरा अफलातून विषय दिला.
विधानसभा निवडणुकीच्या निमित्ताने नुकतीच राजकीय धुळवड रंगली. या धुळवडीने शिलेदारांच्या लेखणीला मात्र धुमारे फुटले. गल्ली ते दिल्ली आणि गावातल्या चावडीपासून तर शहरातल्या चौकाचौकात चालणाऱ्या राजकारणावरील नवनव्या बातम्यांपर्यंत शिलेदार पोहचले. येनकेन प्रकारे सत्ता आपल्याच हाती असावी या हेतूने साम, दाम, दंड आणि भेद वापरणारे नेतेमंडळी ‘जुना गडी नवा डाव’, मांडतांना तत्व, निष्ठा या गोष्टींना कसे वळचणीला टांगतात याचे वस्तुनिष्ठ वर्णन कवींनी केले.
काहींनी मुरलेल्या नात्यांत गैरसमजाने आलेली दरी भरून काढण्यासाठी जुन्याच गड्यासोबत नव्याने डाव मांडण्याचे आवाहन केले आणि ते योग्यही आहेच. माणसाचे आयुष्य किती आहे ? त्यामुळे एकमेकांचे उणेदुणे काढत बसण्यापेक्षा दोघांनी पण आपल्यातील उणीवा दूर सारून नव्याने डाव मांडण्यास काय हरकत आहे….? अशा या ‘जुना गडी नवा डाव’, नकारात्मक आणि सकारात्मक या दोन्ही बाजूंचा परामर्श घेणाऱ्या सर्वांच्या लेखणीचे हार्दिक अभिनंदन….!
सौ.वैशाली उत्तम अंड्रस्कर, चंद्रपूर
कवयित्री/लेखिका
©सहप्रशासक/मुख्य परीक्षक/संकलक
©मराठीचे शिलेदार समूह