Breaking
आरोग्य व शिक्षणकविताकृषीवार्ताक्रिडा व मनोरंजननागपूरपरीक्षण लेखपश्चिम महाराष्ट्रपुणेब्रेकिंगमहाराष्ट्रमुंबईविदर्भसाहित्यगंध

“निसर्ग पूजेचे व्रत घ्यावे,पर्यावरण जपून सांभाळावे”; प्रतिभा वडनेरकर

ग्रेट भेट: मुलाखतकार: अमृता खाकुर्डीकर, पुणे

0 4 8 2 8 2

“निसर्ग पूजेचे व्रत घ्यावे,पर्यावरण जपून सांभाळावे”; प्रतिभा वडनेरकर

आदिशक्तीची आराधना देईल नवी चेतना

ग्रेट भेट: मुलाखतकार: अमृता खाकुर्डीकर, पुणे

“घराघरात घट बसतात. घटस्थापनेत गव्हाचे बीज रूजवतात. दहा दिवसात हिरवे पोपटी अंकूर उगवतात. आदिशक्तीची आराधना करताना बीजाला अंकूर फुटण्याची ही किमया म्हणजे सृष्टीचे चैतन्य रूप असलेल्या देवी आदिशक्तीची माया. नवरात्राच्या नऊ दिवसात एकीकडे शक्तीचा जागर करताना दुसरीकडे निसर्गाचा चमत्कार दिसतो. माणसाला भरभरून चैतन्य देणा-या निसर्गाची जपणुक एखाद्या पवित्र व्रतासारखी केली पाहिजे, अशी श्रध्दा मनात आस्थेने जपणा-या रमणबाग न्यू इंग्लिश स्कूलच्या निसर्गप्रेमी शिक्षका, प्रतिभा वडनेरकर यांना पर्यावरण संरक्षणाची प्रेरणा सदैव कार्यरत ठेवते. जाणून घेऊ या त्यांच्या कार्याचा प्रवास.”

संवादक- अमृता खाकुर्डीकर

पर्यावरण क्षेत्रात काम करावे, ही प्रेरणा प्रतिभाताईंना आई सौ.जिजाबाई आणि वडील रामचंद्र वडनेरकर यांच्याकडून मिळाली. त्यांचे वडील नाशिकच्या वनवासी कल्याण आश्रमाचे निष्ठावंत कार्यकर्ते तर आई ‘वनविकास महामंडळ’ येथे कर्मचारी. साहाजिकच प्रतिभाताईंना ‘वन विकास’ हा विषय जवळून परिचित झाला. यातूनच हिरव्या वनराईतल्या निसर्गाशी त्यांचे प्रेमाचे नाते जडले. पर्यावरण जपले पाहिजे, हा संस्कार मनात रूजला आणि शालेय जीवनापासूनच पर्यावरणचे काम हळूहळू सुरू झाले. पुढे काॅलेजमध्ये B Sc B Ed करताना वडिलांसोबत नाशिक आणि वाई येथे सामाजिक कार्यातला सहभाग पर्यावरण चळवळीशी कायमचा जोडणारा ठरला.

पर्यावरणाशी जडले नाते:

बी. एड. झाल्यानंतर प्रतिभाताई नाशिक येये रमाबाई आंबेडकर कन्या विद्यालयात शिक्षिका म्हणून रूजू झाल्या. शाळेतल्या विविध उपक्रमात विद्यार्थिनींना मार्गदर्शन करताना विज्ञान प्रदर्शनाच्या निमित्ताने कंपोस्ट खताचा मोठा प्रकल्प ऊभा केला. तेव्हापासून पर्यावरण क्षेत्रात खऱ्या अर्थाने प्रत्यक्ष काम सुरू झाले. शाळेत विद्यार्थिनींना शिक्षणाबरोरच पर्यावरणाचे धडे देणे सोपे होते. त्यानंतर प्रतिभाताईंचा जीवनप्रवास पुणे मुक्कामी पोहचला. या दरम्यान त्यांनी स्वतः वैयक्तीक पातळीवर पर्यावरण विषयक एक एक निवडून काम हाती घेतले होते. एका उपक्रमात मुलगी वैष्णवी आणि मुलगा जयेंद्र यांच्यासह पर्यावरण पुरक जीवनशैलीचा आपल्या रोजच्या आयुष्यात अवलंब करण्याचा घरात सर्व सदस्यांनी निश्चय केला. रोजचे प्रदूषणयुक्त वातावरण आणि त्याचे भयंकर दुष्परीणाम डोळ्यांना दिसत होते. त्यातली दाहकता मनाला जाणवत होती. शुध्द वातावरण आणि प्रदूषणयुक्त घातक पर्यावरण या दोन्हींतला फरक लक्षात येत होता. यातूनच पर्यावरण संरक्षणाचे विविध उपक्रम त्यांनी हिरिरीने राबवले.

पर्यावरण जागृतीचे विविध कार्यक्रम:

न्यू इंग्लिश स्कूल रमणबाग प्रशालेत ‘राष्ट्रीय हरित सेने’ च्या माध्यमातून गांडूळखत प्रकल्प, बियाणांची बँक, बीजापासून रोपे तयार करणे, वसुंधरा महोत्सवात पर्यावरण जागृतीचा चित्ररथ, कार्यशाळेत कागदी व कापडी पिशव्या तयार करून त्यांचे वाटप, निसर्गातले महत्त्वं सांगणारे प्रदर्शन, बियाण्यांच्या राख्या तयार करणे , झाडांना राखी बांधून ‘वृक्ष रक्षणा’ची हमी , डोंगराळ भागात जंगलात पेटणारा वणवा आणि त्यामुळे होणारी वृक्षहानी, या सगळ्यांबद्दलची जनजागृती करतानाच ओसाड माळराने हरित करण्यासाठी देशी झाडांची रोपे लावण्याचा कार्यक्रम, छोटी रोपे तयार करून मोठ्या वृक्ष लागवडीची मोहीम अशा पर्यावरण पूरक उपक्रमात प्रतिभाताईंनी पुढाकार घेऊन अनेक उत्साही कार्यकर्ते जोडले. या कामात त्यांना शाळेचे पदाधिकारी, नियामक मंडळाचे अध्यक्ष व सर्व मान्यवर सदस्य , या सर्वांचे मोलाचे प्रोत्साहन लाभले. विशेष म्हणजे यात विद्यार्थ्यांसह पालकांनी देखील छान सहभाग नोंदवला. डोंगराळ भागात वृक्षलागवड कार्यक्रमात लावलेली रोपे गावक-यांनी उत्स्फूर्तपणे दत्तक घेऊन त्यांच्या संगोपनाची जबाबदारी घेतली.

वसुधंरा महोत्सवात विद्यार्थ्यांचा उत्साह शिगेला पोहचतो. ट्रॉलीवर ऊभारलेले सुंदर चित्ररथ दरवर्षी तयार केले जातात. यात पालकांचा सहभाग लक्षणीय असतो. न्यू इंग्लिश स्कूल रमणबाग प्रशालेत विद्यार्थ्यांच्या सोबतीने केलेले पर्यावरण उपक्रम फारच यशस्वी झाले. एकदा मा. पंतप्रधान यांचे आवाहनानुसार ‘अमृत कोपरा’ तयार करणे, हा कार्यक्रम घ्यायचा होता. 5 वी ते 7 वीच्या मुलांना “रोपासह पालकांसोबत फोटो” या उपक्रमात 1500 रोपे जमा झाली. नवरात्रीचे दिवस असल्याने मुलांनी देवीच्या पुजेसाठी मोगरा, गुलाब, जास्वंद, शेवंती अशा सुगंधी रोपांची निवड केली. हो.. शाळेचे सारे प्रांगण गंधीत आणि हरित होऊन गेले.

शाळेतल्या उपक्रमांशिवाय ‘पर्यावरण संरक्षण गतीविधी’ अंतर्गत सायकल रॅली कार्यक्रमात दरवेळी शेकडो लोक स्वतःहून सहभागी होतात . त्यात पर्यावरण प्रचारासाठी कापडी पिशव्यांचे वाटप करण्यात येते. तसेच 5 जूनच्या पर्यावरण दिनी बागिचांमध्ये ‘ हरीतघर ‘, ‘प्रश्न मंजुषा’ असे कार्यक्रम घेतले जातात. यात शेकडो पर्यावरण प्रेमी सहभागी होतात. लोकांचा उत्साह बघून “आपल्या कामाची पावती मिळल्याचे समाधान मिळते”, अशी भावना प्रतिभाताई व्यक्त केली.

पर्यावरण हानीचे भयंकर परीणाम:

पर्यावरण हानीचे परीणाम किती भयंकर आहेत, याची आपल्या सर्वांना कल्पना आहे. पण त्याहूनही भयंकर आहे, मानसिक पर्यावरणाची हानी, असा विचार मांडून प्रतिभाताईंनी एका वेगळ्याच मुद्दयावर प्रकाश टाकला. त्या म्हणाल्या, सभोवतीचे
वातावरण, माणसाचे समाजातील वर्तन, इथली एकूण परंपरा व संस्कृती, कौटुंबिक पार्श्वभूमी, शिक्षणाची सद्यस्थिती, या सगळ्या गोष्टींचा मनावर होणारा खोल परीणाम नकळत माणसाच्या आरोग्यावर तर होतोच, पण संपूर्ण जीवनशैलीवर होतो. यालाच पर्यावरणाची ‘मानसिक हानी’ म्हणतात. मनाचे पर्यावरण बिघडले तर हवा, पाणी, जमीन, झाडे या घटकांवरही त्याचे परीणाम होतात. विचार, भावना, वृत्ती, सवयी आणि संस्कृती या सर्व गोष्टी माणसाच्या वृत्तीला आणि कृतीलाही दिशा देत असतात. म्हणून साकारात्मक वृत्तीने योग्य कृती करण्याची ईच्छा जागी होते. म्हणून पर्यावरण रक्षणाच्या कामात ‘मानसिक पर्यावरणा’ यावर तातडीने काम करण्याची गरज ताईंनी आग्रहाने मांडली.

● मन सुदृढ असेल, मानसिकता सकारात्मक असेल, तर माणूस झाडे लावणे, परिसर स्वच्छता राखणे. प्रदूषण दूर करण्याचे प्रयत्न करणे अशी चांगली कामे स्वयंस्फूर्तीने करतो. त्याउलट नकारात्मक मानसिकतेमुळे घरात कचरा रस्त्यावर फेकणे, निसर्गाला हानी पोहचेल अशी कृती करणे यातून पर्यावरणाचा नाशच होईल.
● माणसाचा हावरटपणा निसर्गाला आपल्या फायद्यासाठी ओरबाडतच सुटतो. जंगल तोड, वाळू उपसा, नैसर्गिक पाणी स्त्रोतांवर भराव टाकून मोठ मोठे बांधकाम प्रकल्प, असे निसर्गातील घटकांचे अतिरेकी शोषण हिच सध्या पर्यावरणात मोठी समस्या आहे. म्हणूनच पाणी, जंगल, खनिजे, जमीन यांचा ऱ्हास रोखला पाहिजे.
● पर्यावरणाचा समतोल त्याच समाजाला शक्य आहे, जिथे संस्कृतिक मूल्य जपली जातात. परंपरेतून भक्तीभावाने निसर्गपूजा केली जाते. अशाच ठिकाणी पर्यावरणाचे संरक्षण सहजतेने होते. याऊलट चंगळवादी जीवनशैलीत प्लॅस्टिकचा अति वापर, तयार होणारा भरमसाठ उपद्रवी कचरा, याने हवेचे प्रदूषणच वाढते.
● चुकीची जीवनशैली मनाचे व शरीराचे ताण-तणाव वाढवते. यातून धूम्रपान, मद्यपान ही व्यसने जडतात. त्याचे आरोग्यावर अनिष्ट परीणाम होतात. जेवणावळी, पार्ट्या यातून अन्नाची नासाडी होऊन वाया गेलेले पदार्थ प्रदूषण वाढण्यास कारणीभूत होतात. शाश्वत विकास साधायचा असेल तर सकारात्मक विचार , पर्यावरणाचे योग्य शिक्षण, समाजिक संवेदनशीलता, सार्वजनिक स्वच्छतेची जबाबदारी, वस्तूंचा पुनर्वापर (recycling), आणि पर्यावरणपूरक जीवनशैली स्वीकारणे, ही काळाची निकड आहे, असे प्रतिभाताई निर्वाणीचे सांगतात. यासाठी आपण स्वतः वैयक्तिक पातळीवर काही उपाय करू शकतो का, असे विचारल्यावर त्या म्हणाल्या,
● सर्वात महत्वाचे म्हणजे प्रत्येकाने सकारात्मक विचारसरणी ठेवावी. यातून मनाचे आणि शरीराचे आरोग्य सांभाळले जाते आणि समाजासाठीही काही तरी चांगले करावेसे वाटते.
● मानाचे आरोग्य जपून सुदृढ मनस्वास्थ्यासाठी ध्यान- धारणा, योगाभ्यास, प्राणायाम, सकस अन्नाचे ग्रहण, दर्जेदार वाचन, आवडीचा छंद जोपासणे, बागकाम यातून मन शांत आणि स्थिर राहते. मनःस्वास्थ्य चांगले असेल तर विचार व कृतीही चांगलीच होते.
● स्वच्छता आणि शिस्तबध्दता अंगिकारली तर वैयक्तीक स्वच्छता, घर व परिसर स्वच्छता, शाळा, काॅलेज, ऑफीस असे जे कार्यक्षेत्र असेल तेथे स्वच्छता कटाक्षाने पाळली जाते. शिस्तबध्द सवयी पर्यावरण सांभाळाण्यासही पोषक ठरतात.
● निसर्गाशी नाते जुळण्यासाठी बगिचा फुलवणे, झाडे लावणे, निसर्गसंपत्तीची जपणुक करणे, हवा-पाणी तसेच मातीतून शेती पिकवणे यातून निसर्गाशी घट्ट नाते जडते. पर्यावरण आणि निसर्गसंपत्ती जपण्यासाठी जबाबदारीने वागले पाहिजे. आवश्यक तेवढेच संसाधने वापरावित. प्रत्येकाने संयमाने वागले तर यात सर्वांचेच हित आहे, हे प्रतिभाताई ठासून सांगातात.

कौटुंबिक व समाजिक पातळीवरचे उपाय:

सुरक्षित वातावरणात, घरात मायेची ऊब , सर्व सदस्यांमध्ये आपुलकी व परस्पर सामंजस्य असेल तर कोणतेही कुटूंब सुखी समाधानी राहू शकते. कुटूंब सुखी तर समाज सुखी. समाधानी घरातच पर्यावरण रक्षणाचे संस्कार घट्ट रूजतात. निसर्गाची जपणूक, पाणी वाचवणे, झाडांचे महत्त्व ई. गोष्टी मुले घरात मोठ्यांच्या अनुकरणातून शिकतात. सामाजिक पातळीवर अनेक निसर्गप्रेमी लोक समुहाने एकत्र येऊन वृक्षारोपण, स्वच्छता मोहीम, पर्यावरण रक्षण अशा मोहीमा राबवतात. प्रचारासाठी
सोशल मिडिया, इलेक्ट्राॅनिक माध्यमे यांचा सकारात्मक संदेश देण्यास योग्य वापर केल्यास व्यापक परीणाम साध्य होतो.

राष्ट्रीय पातळीवरचे उपाय:

पर्यावरण शिक्षणाचा शालेय अभ्यासक्रमात समावेश करून मानसिक व भौतिक पर्यावरण सांभाळण्याचे मूल्य संस्कार लहान वयातच मुलांना दिले जावेत, यावर प्रतिभाताई ठाम आहेत. राष्ट्रीय पातळीवर हे घडून येण्यासाठी केंद्र सरकारने शाश्वत विकासाचे धोरण राबवले तरच प्रदूषण नियंत्रण, ऊर्जा बचत, पाणी व्यवस्थापन यावर योग्य ती उपाय योजना करणे शक्य होईल. सध्या समाजाची नैराश्यग्रस्त मनःस्थिती बघता मोठ्या संख्येने समुपदेशन व मदत केंद्र स्थापन होण्याची आवश्यकता आहे.
शिवाय, प्रत्येकाने “घर स्वच्छ , परिसर स्वच्छ, मन स्वच्छ, सारे पर्यावरण स्वच्छ” असे तत्त्वं स्वीकारून पर्यावरण चळवळीत मनापासून सहभागी व्हावे, असे आवाहन प्रतिभाताई आवर्जुन करतात.

पर्यावरण धोकादायक स्थितीत:

आजच्या घडीला पर्यावरण अनेक परिक्षेत्रात धोकादायक स्थितीत पोहचले असून हा प्रश्न आता दिवसेंदिवस बिकट होत आहे. पर्यावरणाशी संबंधित अनेक परिक्षेत्रात (fields/sectors) चिंताजनक स्थिती आहे. त्यापैकी काही ठळक क्षेत्रे म्हणजे,
● हवेचे प्रदूषण (Air Pollution) शहरी भागात वाहनांचा धूर, कारखान्यांचा धूर, वाताववरणातील सूक्ष्म धूलीकण यामुळे हवा अत्यंत प्रदूषित झाली आहे. त्यातूनच
श्वसन विकार, दमा, कर्करोग यासारखे गंभीर आजार पसरले आहेत. यावर
तातडीने उपाय म्हणून ‘प्रदूषण नियंत्रण यंत्रणा’ मजबूत करणे, सार्वजनिक वाहतूक व्यवस्था जास्त प्रमाणात उपलब्ध करून सोयीस्कर ठरेल अशा प्रकारे वाढवणे, आता नव्याने आलेल्या इलेक्ट्रिक वाहनांचा वापरणे जाणीवपूर्वक करणे, या गोष्टी आपण गांभीर्याने घेतल्या पाहिजेत. .
● पाणी (Water Pollution & Scarcity) औद्योगिक क्षेत्राचे खराब सांडपाणी, साठलेल्या किंवा वाहत्या पाण्यात प्लॅस्टिक मिसळणे, पिण्याचे तसेच ड्रनेज पाईप लाईनमधले विविध आडथळे, घातक रासायनिक पदार्थांमुळे नद्या-तलाव यातले पाणी दूषित होणे व शेत जमिनीत मुरणा-या विषारी पाण्याने जमिनीचा -हास होणे हे दूरगामी परिणाम घडून येत आहेत. पाणी टंचाईची समस्या उग्र रूप धारण करीत आहे. या गंभीर प्रश्नावर तातडीचे उपाय म्हणून , सांडपाण्यावर प्रक्रिया करून पाणी शुध्दीकरण प्रकल्प ऊभे करणे, पावसाचे वाहून वाया जाणारे पाणी साठवणे (Rainwater Harvesting), अशा सर्वप्रकारे आपण पाणी प्रदूषण रोखू शकतो.
● जंगल व जैवविविधता (Deforestation & Biodiversity Loss) भयंकर वृक्षतोड, खाणकाम यामुळे जंगले कमी होऊन शहरीकरणाचा अति विस्तार यातून प्राणी-पक्षी- वनस्पती यांचे नैसर्गचक्रातले मूळचे अधिवास नष्ट होऊन जैवविविधता
धोक्यात येते. पर्यावरणाचा समतोल ढासळतो. यावर तातडीचा उपाय म्हणून मोठ्या प्रमाणावर देशी झाडांची लागवड, वन संरक्षित क्षेत्रांची जपणुक यातून वन्यजीव संवर्धन शक्य आहे.
● माती व शेती (Soil Degradation & Agriculture) रासायनिक खते, कीड
नाशके यामुळे मातीचा कस कमी होत आहे.शेतजमिन मुरमाड व क्षारयुक्त होत चालली आहे. यासाठी रासायनिक खत- औषधे टाळून नैसर्गिक, सेंद्रिय खतांचा वापर वाढवणे, माती परीक्षण करून जमिनीचा पोत सुधारणे या उपायांचा त्वरेने अवलंब करावा.
● हवाबदलातले बदल (Climate Change) तापमानवाढ, उष्णतेची लाट, वादळे, अनियमित पाऊस, पूर, लोला व कोरडा दुष्काळ यामुळे मानव व पशुपक्षी यांचे जीवनमान धोक्यात आले आहे. यासाठी सौर व पवन या नवीन ऊर्जां स्रोतांची निर्मिती, कार्बन उत्सर्जनाचे प्रमाण कमी करणे, हरित तंत्रज्ञानाचा वापर करणे हे उपाय आहेत. थोडक्यात निष्कर्ष म्हणजे “सहिष्णु मन – स्वच्छ पर्यावरण.” तत्त्वानुसार निसर्गातील माणूस, प्राणी, पक्षी, वनस्पती, जमीन, पाणी, हवा या सर्व घटकांचा स्वीकार करून , ही जीव साखळी जपणे, आणि त्यांना सहजीवनाची संधी देऊन पर्यावरण सहिष्णुता राखणे.

निसर्ग संरक्षणासाठीचे प्रभावी शस्त्र आणि अस्त्र:

प्राचीन काळी नवरात्रानंतर सीमोल्लंघन करून युध्दाची मोहीम सुरू होत असे, तसे आजच्या काळात निसर्ग संरक्षणासाठी प्रभावी शस्त्र हाती घेऊन पर्यावरण संरक्षणाची लढाई लढायची आहे. तरच “दुषित हवामान” या उपद्रवी संकटाचे थैमान कमी होईल, याबद्दल अभ्यासपूर्ण बोलताना प्रतिभाताईंनी काही गोष्टी कटाक्षाने सांगितल्या. मानव हा एकमेव बुद्धिमान प्राणी आहे, जो निसर्गातील कठीण घडामोडींना सामोरा जाऊन त्यावर मात करतो. आधुनिकीकरण आणि भौतिक विकास या आपल्याच हव्यासापायी निसर्ग ओरबाडला जात आहे. याचे भयावह परीणाम आता भविष्यात भोगावे लागू नयेत म्हणून निसर्गाच्या एकेका घटकाची सुधारणा कराशी लागेल. यासाठी पहिल शस्त्र आहे, “पर्यावरण पुरक जगण्याची मानसिकता” ही वैचारिक क्रांती घडावावी लागेल, आणि दुसरे अस्त्र म्हणजे, कुठल्याही फलाची आशा न धरता ‘पर्यावरण संरक्षण गतीविधी’ मध्ये सक्रिय सहभागी होणे. यासाठी घरात व परिसरात ‘शुन्य कचरा’ ही संकल्पना प्रयत्नपूर्वक प्रत्यक्षात आणावी लागेल.

आपले घर करू हरीतघर:

मानव प्राणी या पृथ्वीवर इतर सजीवांसारखाच निसर्गसाखळीचा एक भाग आहे. ही सृष्टीच त्याचे घर आहे. हे घर सदैव हरित हसरे ठेवणे सजग नागरिकांच्याच हातात आहे, याची जाणीव ठेवून नैसर्गिक जीवनशैलीचा अंगीकार करणे आणि वसुंधरेचा हिरवा शेला तिला पुन्हा बहाल करणे, हाच एक पर्याय आहे. निसर्ग मुक्तपणे बहरू द्यायला हवा, असे भावपूर्ण शब्दात सांगून समारोप करताना प्रतिभातांईंनी काही काव्यपंक्ती उदधृत केल्या,

“पिकलेली भरली राने , मुक्या जीवांसाठी अभयारण्ये
पाखरांचेही जपावे गाणे , सकलांनी जगावे सुखाने …
मना हाच एक ध्यास.. भरभरूनि घ्यावा सा-यांनी मोकळा श्वास
लाभू दे विज्ञानाचे पंख आणि ज्ञानाचे विशाल निळे आकाश…”

अशाप्रकारे तन-मन-धनाने झटून ध्यासपूर्वक वातावरण शुध्दीचे काम करणा-या ‘प्रतिभा बडनेरकर’ यांच्यासारख्या अनेक संस्कारी शिक्षिका पर्यावरण चळवळीला कार्यकर्त्या म्हणून लाभल्या तर हवामानाचा ढासळता तोल निश्चित सावरता येईल. नवरात्र पर्वात आदिशक्तीची आराधना नवी चेतना जागी करून निसर्गपूजेचे हे व्रत सर्व मैत्रिणींनी घ्यावे, हिच सदिच्छा.

अमृता खाकुर्डीकर, पुणे
बिनधास्त न्यूज प्रतिनिधी

5/5 - (1 vote)

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 4 8 2 8 2

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे