‘स्वार्थाच्या दुनियेत वाळवीने पोखरलेला बंडाचा दंडा…!’;वैशाली अंड्रस्कर
शनिवारीय काव्यस्तंभ स्पर्धेचे परीक्षण
‘स्वार्थाच्या दुनियेत वाळवीने पोखरलेला बंडाचा दंडा…!’;वैशाली अंड्रस्कर
शनिवारीय काव्यस्तंभ स्पर्धेचे परीक्षण
महाराष्ट्राच्या इतिहासात, गडकिल्ल्यांच्या कानाकोपऱ्यात, सह्याद्रीच्या दऱ्याखोऱ्यांत, आणि गोदा, कृष्णा, भीमेच्या प्रवाहात एकच नाद अजूनही गुंजतो… छत्रपती शिवराय… छत्रपती शिवराय…!
छत्रपती शिवरायांना परकीय शत्रूंसोबत लढतांनाच स्वकीय शत्रूंचा पण बंदोबस्त करावा लागला. त्यांपैकीच एक म्हणजे जावळीचे मोरे. स्वराज्याच्या कार्यात सहकार्य करण्याचे कबूल करूनही ते जेव्हा स्वराज्यनिर्मितीच्या कार्यात अडथळे आणू लागले. तेव्हा शिवरायांना ‘बंड केलिया मारले जाल…! अशी धमकीवजा सूचना करावी लागली. जिचा आजही इयत्ता चौथीच्या पाठ्यपुस्तकात समावेश आहे.
जावळी खाली करून, राजे न म्हणोन, छत्रचामर दूर करून, हात रुमाले बांधून, भेटीस येऊन, हुजुराची चाकरी करणे. इतकियावर बंडखोरी केलिया, मारले जाल. प्रजेचे हित साधण्यासाठी बंडखोरी करणाऱ्यांना धडा शिकवणारे छत्रपती महाराष्ट्रातील जनतेच्या मनावर कायम राज्य करीत आहेत.
तद्नंतर ईस्ट इंडिया कंपनीच्या राजवटीविरुद्ध १८५७ चे भारतीय बंड, १८७५ सालचा सावकारांविरोधात शेतकऱ्यांनी उभारलेला ‘शेतकरी उठाव वा बंड अशा एक ना अनेक बंडांचे प्रकार आपण ऐकलेले आहेत. जे लोककल्याणकारी राज्यासाठी, देशासाठी केलेले बंड होते. अन्यायाविरुद्ध आवाज उठवण्याचा तो एक मार्ग होता. या बंडाचा दंडा कधीच स्वार्थासाठी नव्हता. मात्र गेले ते दिन अन् गेल्या त्या रात्री ज्या ध्येयासाठी माणसाला, माणूसपणाला जागे ठेवत.
आज ‘मराठीचे शिलेदार’ समूहात शनिवारीय काव्यस्तंभ स्पर्धेच्या निमित्ताने मुख्य प्रशासक राहुलदादा पाटील यांनी ‘बंडाचा दंडा’, हा विषय दिला आणि शिलेदारांनी सद्यःस्थितीवर भाष्य करण्याचा सुरेख प्रयत्न केलायं. ‘बंडाचा दंडा’, सध्या विधायक कार्याला पुढे नेण्यासाठी नसून फक्त सत्ता सुंदरीच्या मोहपाशात गुंतण्यासाठीच जणू काही उगारला जातोयं. त्यामुळेच स्वार्थाच्या या दुनियेत ‘बंडाचा दंडा’, वाळवीने पोखरलेला एक सोटच ठरत आहे. निष्ठा, तत्वे, वैचारिक बांधिलकी या सर्वांना धुळीस मिळवून ‘बंडाचा दंडा’, हाती घेऊन नवा झेंडा हातात घेण्यास मोकळे असणाऱ्यांकडून समाजाने तरी कोणत्या अपेक्षा ठेवाव्यात…?
सौ.वैशाली उत्तम अंड्रस्कर, चंद्रपूर
कवयित्री/लेखिका
सहप्रशासक/मुख्य परीक्षक/संकलक
©मराठीचे शिलेदार समूह