“जरी बंडखोर विद्रोही असलो; तरी माझी पूर्ण निष्ठा तिरंग्याशी”; सविता पाटील ठाकरे
बुधवारीय काव्यरत्न स्पर्धेचे परीक्षण

“जरी बंडखोर विद्रोही असलो; तरी माझी पूर्ण निष्ठा तिरंग्याशी”; सविता पाटील ठाकरे
बुधवारीय काव्यरत्न स्पर्धेचे परीक्षण
कुणी मला बंडखोर म्हणा..की कुणी मला समाजविरोधी. कुणी मला विचारांमधील भिन्नतेचा पाईक म्हणा..की कोणी माझ्या धोरणाला आडमुठेपणा म्हणा..मला जे नाहीच आवडतं त्याचा का करू मी स्वीकार? प्रस्थापित व्यवस्थेविरुद्ध, समाजाच्या नकोशा नियमांविरुद्ध कायद्याचे पालन करण्यास नकार देऊन जर मी समाज बदलण्याची इच्छा बाळगतो तर मला का एवढा विरोध होतो? होऊ दे विरोध, मला माहित आहे की मी विद्रोही आहे..!! अरे, अशाच विद्रोहातून क्रांती झाली होती, विसरलात का तुम्ही देश ही स्वतंत्र झाला होता याच विद्रोही भावनेतून.जेव्हा सामाजिक विषमतेविरुद्धची बीजं रोवली गेली होती. तेव्हा डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी माणसाला माणूस म्हणण्याचं ‘बी’ ही याच विद्रोहातून रोवलं होतं.
नोकरशाहीला तुम्ही जाता ना शरण? राज्यकर्त्यांपुढे तुम्ही उचलताना ना सतरंज्या? अरे!! पिण्याचे पाणी नाही भेटत लोकांना आणि आले मोठे जयजयकार करणारे. ‘रस्त्यात खड्डे की खड्ड्यात रस्ता ओळखता येत नाही साधे..आणि गावभर झेंडे मात्र विविध पक्षांचे’. आपल्याला नाही जमत असले धंदे..म्हणूनच मी विद्रोही आहे. अन्याय व अयोग्य गोष्टींना मी शाब्दिक नव्हे तर कृतीशील विरोधही करेल. माझे वैचारिक अधिष्ठानच भक्कम आहे. मी जरी बंडखोर विद्रोही असलो तरी माझी पूर्ण निष्ठा तिरंग्याशी आहे.
मी पाहिले आहे हो…आई-वडिलांच्या आज्ञा झुगारणारे, रस्त्यात खाकी वर्दीतल्या पोलिसांना आव्हान देणारे, भर सभेत पुढार्यांवर कांदे फेकणारे, शेतीमालाला रास्त भाव नाही मिळाला म्हणून आत्महत्या करणारे. खरे तर आता विद्रोही संकल्पना खूप व्यापक झाली. फ्रेंच तत्त्वज्ञ अल्बेट काम्यु म्हणतात, “गुलामाचा मालकाविरुद्ध, गरिबाचा श्रीमंत विरुद्ध आणि व्यक्तीचा समाजविरुद्ध अन्याय, जुलूम, छळ याचा अतिरेक झाला की ज्याचा जन्म होतो तो मी….अर्थात विद्रोह.”
गुडघे टेकून जगण्यापेक्षा, आपल्या पायांवर उभे राहून मरण ज्याला आवडतं तिथे माझे मन रमते.असा मी दुर्लक्षितच असतो पण आज माझी दखल खुद्द ‘मराठीचे शिलेदार’ समूहाचे सर्वेसर्वा आ.राहुल पाटील सरांनी घेतली. बुधवारीय काव्यरत्न स्पर्धेच्या निमित्ताने आज त्यांनी “विद्रोही मी” हा विषय दिला आणि कवी, कवयित्रींच्या अनेक मारून मुटकून, दाबून ठेवलेल्या भावना आज उत्कट झाल्यात, जिवंत झाल्यात. तेव्हा सर्व काव्य रसिकांचे मनापासून हार्दिक अभिनंदन. आजच्या या आगळ्यावेगळ्या विषयास आपण सर्वांनी आपापल्या परीने पूर्णतः न्याय देण्याचा प्रयत्न केला. यापुढेही असंच लिहित रहा.व्यक्त होत राहा.. आपणा सर्वांच्या काव्यलेखनास खूप खूप शुभेच्छा…!
सविता पाटील ठाकरे,सिलवासा
मुख्य परीक्षक,प्रशासक, कवयित्री,लेखिका, कार्यकारी संपादक
©मराठीचे शिलेदार समूह