साहित्यरत्नाच्या स्मृतींची जपणूक चिरंतन
लोकशाहीर आण्णाभाऊ साठे अध्यासन
साहित्यरत्नाच्या स्मृतींची जपणूक चिरंतन
लोकशाहीर आण्णाभाऊ साठे अध्यासन
अण्णा भाऊ साठे जयंतीदिन विशेष
लेखिका अमृता खाकुर्डीकर, पुणे
मानवातावादी उदात्त विचारांनी विषमतेवर प्रहार करणारा मराठी साहित्यातील वंचितांचा बुलंद आवाज म्हणजे आण्णाभाऊ साठे. तळागाळातल्या सामाजाची व्यथा तळमळीने व्यक्त करणारी त्यांची दमदार शाहिरी म्हणजे लोकवाड्मयात खणखणीत वाजणारा चांदीचा बंदा रूपया. ३५ कादंबऱ्या, १९ कथासंग्रह, १४ लोकनाट्य, ११ पोवाडे, १ प्रवासवर्णन, शेकडो लावण्या, छकडी, गाणी अशी साहित्यिक श्रीमंती लाभलेला कलंदर लेखक आण्णा भाऊ साठे हे “साहित्यरत्न” म्हणून मराठी साहित्यात प्रसिध्द आहेत तसेच संयुक्त महाराष्ट्र चळवळीत प्रत्यक्ष उतरून केलेले त्यांचे जनजागृतीचे कार्य सर्वश्रुत आहे. लेखन आणि समाजसुधारणा या एकाच नाण्याच्या दोन्ही बाजूंनी दलित वंचिताच्या उन्नतीची तळमळ मनात घेऊन आपले सारे आयुष्य वेचणा-या या थोर प्रतिभावंताची कला एके काळी प्रखरतेने प्रकट झाली आणि आजही ती अमरतेचे बिरूद मिरवते आहे. ‘दलित साहित्याचे प्रणेते’ असे श्रेयही त्यांच्या नावे वाड्.मयाच्या ईतिहासात नोंदवले आहे.
अशा सर्वार्थाने थोर असलेल्या स्व. आण्णा भाऊ साठे यांच्या बहुमोल स्मृती चिरंतन जपण्याचे काम सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठामध्ये सुरू असून, लोकशाहीर आण्णाभाऊ साठे अध्यासन या नावाने ते कार्यरत आहे. पुणे विद्यापीठातील सुप्रसिध्द ललित कला केंद्राला लागूनच असलेल्या ईमारतीत अध्यासनाचे काम चालते.”मुं.तरूण भारत”ने या ठिकाणी प्रत्यक्ष भेट देऊन अध्यासन प्रमुख डाॅ. सुनिल भंडगे यांच्याशी संवाद साधला तेव्हा ख-या अर्थाने शाहिरांच्या स्मृतींचा सन्मान इथे साक्षेपाने होतो आहे. विविध उपक्रमांद्वारे हे अध्यासन फक्त विद्यापीठापुरते मर्यादित न राहता समाजात प्रत्यक्ष मिसळून शाहीरांच्या साहित्याचा ज्वलंत उद्गार जनमानसात पोहचवणारे लोकासन झाले आहे, याची प्रचिती आली.
“फकिरा” या बहुचर्चित कादंबरीतून एक समाज परिवर्तनवादी क्रांतिकारी दमदार नायक ऊभा करणारे आणि ‘माझी मैना गावाकडे राह्यली” या गोड, खट्याळ गाण्यातून गावाकडून कामगाराची भावना यथार्थपणे व्यक्त करणारे, अण्णा भाऊ साठें या कलंदर कलावंताचं अल्पचरित्र थोडक्यात जरी समजून घेतलं, तरी या माणसाच्या महान कर्तृत्वाची कल्पना येते. अण्णा भाऊ साठेंचा जन्म सांगली जिल्ह्यात वाळवा तालुक्यातल्या वाटेगावचा. वडिल भाऊराव साठे आणि आई वालुबाई यांच्या पोटी १ ऑगस्ट १९२० रोजी जन्मलेले हे रत्न पुढे ” साहित्यरत्न” या उपाधीने मराठी साहित्यात अजरामर झाले. तुकाराम, असे मूळ नाव असलेले अण्णा फक्त दीड दिवस शाळेत गेलेला एकमेव विद्यार्थी असतील; परंतु आपल्या लेखनातून त्यांनी अवघ्या जगाला जीवन शिक्षणाची शिदोरी दिली. त्यांची “फकिरा” जगभर पोहचली. इंग्रजीसह अनेक भाषात भाषांतरीत झाली. तसेच त्यांचे सर्व लेखन संपदा मराठी साहित्याला समृध्द करणारी ठरली. वाटेगाव ते मॉस्को इथपर्यंतचा त्यांचा प्रवास थक्क करणारा आहे.
आण्णाभाऊंचे लेखन चित्रमय बहारदार शैलीने नटलेले असल्याने त्यांच्या कादंब-यांचे चित्रपट झाले. वैजयंता, टिळा लावते मी रक्ताचा, डोंगरची मैना, वारणेचा वाघ, फकिरा हे गाजलेले चित्रपट त्याची साक्ष आहेत. खरे तर या असामान्य कलावंताचे सगळे लेखन आणि जीवन हे एखाद्या विस्मयकारी चित्रपटासारखेच अदूभूत आहे. म्हणूनच त्यांचा हा सारा जीवनपट “लोकशाहीर आण्णाभाऊ साठे अध्यासन” येथे चिरंतन स्वरूपात अतिशय आस्थेने जपला जातो आहे. अण्णाचे साहित्य, त्यांचे जीवनचरित्र आणि त्यांच्या वस्तू यांची इथे नीट साठवण करून ठेवली आहे.वाचक, अभ्यासक व संशोधक इथे नित्य येतात आणि समाधान पावतात. कारण विद्यापीठ, विद्यार्थी आणि समाज अशा तिनही स्तरावर आण्णांच्या कार्याचा ठसा अखंड रहावा, या उद्देशाने अध्यासनाचे कार्य सुरू आहे. अण्णांचे नातू श्री. सचिन साठे यांचे सर्व प्रकारचे सहकार्य वेळोवेळी लाभते.
विद्यापीठातील विविध अध्यासनं ही सखोल संशोधन, आणि अकादमिक अभ्यासात रमलेली असतात,परंतु सुरवातीपासूनच या अध्यासनाने विविध उपक्रमातून सर्व घटकांना आपल्या कामात सहभागी करून घेण्याची लोकाभिमुख धोरण निश्चित केले.
विविध उपक्रम:
•महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्थेत हिराबेन इन्स्टिट्यूट येथे दि.२० मार्चचा “चवदार तळे सत्याग्रह दिन” साजरा करण्यात आला. त्यावेळी संस्थेच्या महिला अध्यासनाला कायमच्या जोडल्या गेल्या.
•टीकाराम जगन्नाथ काॅलजने ‘फकिरा’ कादंबरीवर दोन अंकी नाटक सादर केले. प्रा. विजय रास्ते यांनी नाटकाचे लेखन आणि श्री. निशिकांत रावजी यांनी दिग्दर्शन केले. मृणाल थिएटरने प्रस्तुत केलेल्या या नाटकाचा पहिला प्रयोग दि.१० जून, २०१८ रोजी “अण्णा भाऊ साठे” या पुण्यातल्या नाट्यगृहात सादर झाला तर दुसरा प्रयोग नवी सांगवीच्या “निळू फुले” थिएटरला झाला.
•लावणीसम्राज्ञी ‘यमुनाबाई वाईकर’ आणि अण्णांची भगिनी ‘जाईबाई भगत-साठे’ श्रद्धांजली
कार्यक्रम घेण्यात आला.
• “‘जातीभेदमुक्त विकसित भारत अभियान'” या मोहीमे अंतर्गत अनेक कार्यक्रम विविध संस्थांच्या सहकार्याने घेण्यात आले.त्यामध्ये फर्ग्युसन काॅलेजमध्ये आंतरजातीय विवाह केलेल्या जोडप्यांचे अनुभव कथन रंगले. प्रसिध्द उद्योगपती पद्मश्री मिलिद कांबळे व त्यांची पत्नी सीमा, डॉ. राजेंद्र हिरेमठ आणि सौ. लता, कुमार आहेर व ॲड.तेजल, श्री. करण थते व स्वराली ही एकापेक्षा एक कर्तृत्वान जोडपी कार्यक्रमात सहभागी होऊन अध्यासनाशी कायमची जोडली गेली.
•न्यू इंग्लिश स्कूलमध्ये बाल-गोपाळांसमवेत एकदा
अण्णाभाऊंचा स्मृतिदिन साजरा झाला, तसेच अण्णांची ९८ वी जयंती “रेडिओ सिटी” चॅनेलवरून साजरी करण्यात आली. लोकप्रिय रेडिओ जॅकी *संग्राम खोपडे* यांनी अध्यासनाच्या कार्याचा परिचय श्रोत्याना खास शैलीत करून दिल्याने कितीतरी अनोळखी श्रोत्यांनी उत्सुकतेने संपर्क साधला.
• “अण्णा भाऊंच्या शोधात” या विषयावर महाविद्यालयीन स्तरावर एच.व्ही.देसाई काॅलेज
येथे परिसंवादात १०० विद्यार्थी सहभागी झाले. •”विश्वसाहित्यकार जन गायक अण्णाभाऊ साठे” या रतनलाल सोनग्रा लिखित हिंदी ग्रंथाद्वारे अण्णा भाऊंचे साहित्य हिंदी भाषेत गेले. कै.श्री. म. माटे यांच्या पुण्यतिथीदिनी महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या सहकार्याने परिसंवाद घेऊन हा ग्रंथ अनेकांपर्यंत पोहचवण्यात अध्यासन यशस्वी झाले.
•रानडे इन्स्टिट्यूटमध्ये विभाग प्रमुख उज्वला बर्वे यांच्या प्रमुख उपस्थितीत पत्रकारितेचे१५० विद्यार्थी कार्यशाळेत सहभागी झाले.
•अण्णांची ५० वी पुण्यतिथी रमणबाग विद्यालयात साजरी झाली. त्यावेळी ‘स्मशानातील सोनं’ या अण्णांच्या प्रसिध्द कथेचे अभिवाचन श्री.परळीकर व श्री. देशपांडे या शिक्षकद्वयीने केले.
•बालगंधर्व रंगमदिरात ‘वारणेचा वाघ’ हा सिनेमा ‘लोकमान्य’ चित्रपटासोबत प्रदर्शित झाला. त्याला लोकांचा अलोट प्रतिसाद मिळाला आणि बहुसंख्य पुणेकरांना त्या दिवशी अध्यासनाचा परिचय झाला.
• शाहीर अमर शेख यांच्या ५० व्या पुण्यतिथीला
मुस्लिम सत्यशोधक मंडळाचे अध्यक्ष डॉ.शमसुद्दिन तांबोळी यांचे शाहीर अमर शेख यांच्या जीवनावर व्याख्यान झाले.
अशाप्रकारे अनेक प्रसिध्द कलावंत, गुणी लेखक, कवी अध्यासनाशी आपुलकीच्या नात्याने जोडले गेले आहेत. प्रसिध्द शिल्पकार प्रमोद कांबळेंनी अण्णांचे सुंदर शिल्प साकारले आणि अध्यासनाला ते भेट दिले. निमंत्रितांच्या कवी संमेलनात प्रसिद्ध वात्रटिकाकार रामदास फुटाणे सहभागी झाले आणि अध्यासनाच्या उपक्रमात मनापासून रमले. अशा अनेक छोटामोठ्या उपक्रमांनी अध्यासनाने जनमानसात स्वतःचे भक्कम स्थान निर्माण केल्यानंतर, एक मोठा उपक्रम हाती घेतला, तो म्हणजे “लोकशाहीर अण्णा भाऊ साठे पुरस्कार” आणि “माता रमाई मातृशक्ती पुरस्कार” असे दोन पुरस्कार विशेष कामगिरी असलेल्या व्यक्तींना द्यायचे ठरले.
पुरस्कार:
पहिला पुरस्कार, शाहीर हिंगे लोककला प्रबोधिनीचे अध्यक्ष आणि पोवाड्याचे प्रशिक्षण वर्ग मोफत चालवणारे शाहीर परिषदेचे धडाडीचे ‘शाहीर हेमंतराजे मावळे: यांना आणि “मातृशक्ती पुरस्कार” कच-यात सापडलेलं सोन्याचं मंगळसूत्र प्रामाणिकपणे परत करणा-या पुणे महापालिकेच्या स्वच्छता कर्मचारी स्वाती गायकवाड यांना प्रदान करण्यात आला. या पुरस्काराचे स्वरूप रोख रू.५०००/- विद्यापीठ सन्मानचिन्ह, शाल, श्रीफळ आणि समता सप्तक असे आहे. बालगंधर्व नाट्यगृहात पहिला पुरस्कार सोहळा रंगला.
कोविड काळात “महर्षी कर्वे कोविड सेवा केंद्र” यांच्या प्रचंड सेवाभावी कामाची दखल घेऊन आण्णा भाऊ साठे पुरस्काराने त्या संस्थेला सन्मानित करण्यात आले. प्रसिध्द सिने दिग्दर्शक दिकपाल लांजेकर यांच्या मातोश्री सुनिता लांजेकर यांना प्रदान करण्यात आला. लहान मुलांना
प्रेरणादायी ऐतिहासिक कथा सांगून सुसंस्कारित करण्याचं काम गेली अनेक वर्ष सुनिताताई करीत आहेत.
पुरस्कार समितीचे सदस्य म्हणून प्रा. डॉ. प्रशांत साठे, प्रा. डॉ. गौतम बेंगाळे, प्रा. डॉ. श्यामा घोणसे, प्रा.डॉ. ज्ञानेश्वर कुंभार, प्रा. डॉ. गणेश राऊत, प्रा. डॉ. तानाजी हातेकर, प्रा. विजय रास्ते हे सर्व मान्यवर अध्यासनाचे प्रमुख डॉ. सुनील भंडगे यांच्या निमंत्रणावरून मनापासून काम करीत आहेत.
• शाहीर नंदेश उमप, शाहीर दीनानाथ साठे, दादा पासलकर आणि गेल्या वर्षी प्रसिध्द दिग्दर्शक केदार शिंदे यांना “लोकशाहिर अणाभाऊ साठे” पुरस्काराने आत्तापर्यंत गौरविण्यात आले आहे.
या प्रत्येक पुरस्कारार्थीचे शाहीरी परंपरेशी आणि अण्णा भाऊंशी गहिरे नाते आहे. केदार शिंदे यांनी “महाराष्ट्राची लोकधारा” या कार्यक्रमातून लोककलेशी नाते जपले. “बाईपण भारी देवा” या चित्रपटामुळे त्यांचे नाव देशातल्या आघाडीच्या दिग्दर्शकांमध्ये पोहचले आहे, परंतु या अध्यासनाने त्यांची पुरस्कारासाठी निवड केली ती; शाहीर साबळे यांच्या जीवनावरील “महाराष्ट्र शाहिर” या चित्रपटासाठी. नातवाने अजोबांच्या कलेचा वारसा जपून लोक वाड्.मय परंपरेचा जो सन्मान केला, त्याबद्दल अध्यासनाने केदारजींचा हा गौरव केला. या पुरस्कार सोहळ्यात मनोगत व्यक्त करताना केदार शिंदे म्हणाले,” अण्णा भाऊ साठे यांच्या जीवनावर चित्रपट काढण्याचे स्वप्नं आहे, परंतु इतक्या थोर साहित्यिकाचं बहुपेडी व्यक्तीमत्वं, अद्भूत जीवनचरित्र आणि जागतिक कीर्तीचे साहित्य यामुळे त्यांच्यावर सिनेमा काढणे, हे शिवधनुष्य पेलण्याइतके कठीण आहे, म्हणून हे स्वप्नं साकार व्हायला बराच वेळ लागेल..”
अध्यासनात नियमित येणारे एक अभ्यासक, श्री. सूर्यकांत गायकवाड यांची यावेळी भेट झाली. त्यांनी आपले मनोगत व्यक्त करताना सांगितले की, “मी अर्थशास्त्रात पीएचडी करीत असूनही मला अण्णाभाऊंचे वैचारिक, सामाजिक लेखन आकर्षित करते.” सूर्यकांत यांच्यासह बरेच अभ्यासक इथल्या परिसंवाद, चर्चासत्रं कार्यक्रमात सहभागी होऊन अध्यासनाचा भरपूर लाभ घेतात.
मातंग विकास संस्थेचे श्री.राजेश रासगे हे आपल्या समाजबांधवांसह अध्यासनाच्या सर्व उपक्रमांना सर्वतोपरी सहकार्य करतात. त्यांच्या संस्थेमार्फत अध्यासनाशी संलग्न कार्यक्रम आयोजित करतात. “अण्णाभाऊ साठे अध्यासन हे आमचे हक्काचे ठिकाण आहे”, अशी भावना त्यांनी यावेळी व्यक्त केली. विद्यापीठीय अध्यासनांचा मुख्य उद्देश बराचसा अकादमीक स्वरूपाचा असतो. विद्यापीठाच्या सर्व भाषा विभागांची या कामी मदत होते. त्यापैकी हिंदी भाषा विभाग प्रमुख- प्रा. विजयकुमार रोडे यांनी आपले आण्णाभाऊ साठे अध्यासनाशी असलेले भावबंध उलगडले. ते म्हणाले की, “लोकशाहीर आण्णाभाऊ साठे अध्यासनाशी माझे भावनिक नाते आहे. हिंदीतील साहित्यातील कृतीशील विचारधारा आणि आण्णाभाऊ साठे यांचे साहित्य यांच्यात फार साम्य आहे. मुंबईविद्यापीठात जसे अनुवादाचे कार्य सुरू आहे तसेच पुणे विद्यापीठाशी टायअप करून हे कार्य व्हावे यासाठी प्रयास सुरू आहेत. उमेदीने संशोधन करणा-या होतकरू व्यक्ती किंवा संस्था यांना काही ठोस रक्कमेचे अनुदान उपलब्ध करून द्यावे, त्यातून चांगल्या दर्जाचे संशोधनाचे काम ऊभे रहावे, यासाठी आम्ही प्रस्ताव मांडणार आहोत”
अशी माहिती देऊन त्यांनी, “दै. मुं. तरूण भारत” नेहमीच शाहिर आण्णाभाऊ साठे यांच्याविषयीचा मजकूर आस्थेने प्रसिध्द करीत असल्याबद्दल कृतज्ञता व्यक्त केली. अध्यासनाचे प्रमुख डाॅ. सुनिल भंडगे यांनी समाजातील लोकांचा मिळणारा उत्तम प्रतिसाद आणि भावी उपक्रम याबद्दल सांगताना लवकरच ‘चरित्रप्रकाशन समिती’ मार्फत अण्णाभाऊंचे साहित्य एका क्लीकवर उपलब्ध होणार असून अण्णाभाऊंच्या कादंब-यावरील चित्रपटांचे पोस्टर्स, त्यांच्या नित्य वापरातल्या काही वस्तू अध्यासनात ठेवल्या जाणार आहेत तसेच प्रसिध्द लेखक विश्वास पाटील लिखित “अण्णाभाऊंची दर्दभरी दास्तान” हे पुस्तकही लवकरच प्रसिध्द होत आहे. अशी महत्त्वपूर्ण माहिती त्यांनी यावेळी दिली.
अण्णाभाऊंना आजपर्यंत शासनाचा एकमेव वाड्.मयीन पुरस्कार फक्त ‘फकिरा’ या कादंबरीला मिळाला आहे.वास्तविक शाहिरांची प्रत्येक कलाकृती पुरस्कार योग्य आहे, हे लक्षात घेऊन शासनाने अण्णाभाऊंच्या साहित्याचा योग्य तो सन्मान करावा, अशी अपेक्षा यावेळी व्यक्त करण्यात आली.
एकूणच या अध्यासन भेटीतून एक समजिक ईतिहास उलगडत गेला. संशोधनात्मक अभ्यास
करतानाच पुणे शहरातल्या अनेक साहित्यिक आणि सांस्कृतिक व्यासपीठाशी नाते जोडून
हे अध्यासन “लोकासन” झाले असल्याचा अनुभव देणारी, ही प्रत्यक्ष भेट संस्मरणीय ठरली.
मुंबईतील ‘चिराग नगरी’ झोपडपट्टीत दि. १८ जुलै १९६९ रोजी अण्णाभाऊंनी अखेरचा श्वास घेतला. परंतु साहित्यरूपाने आपल्यातच असलेल्या अण्णाच्या स्मृती सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने निष्ठेने जपल्या आहेत. अध्यासनाच्या या कामाचा ध्यास लोकशाहिर अण्णाभाऊंच्या स्मृतींना ख-या अर्थाने तो मानाचा मुजरा आहे!
–
– अमृता खाकुर्डीकर,पुणे.
amruta.khakurdikar@gmail.com