‘तूच’ माझं जगणं जिवंत करणारी अन् सावलीच्या खुणा मिरवणारी; स्वाती मराडे
‘तूच’ माझं जगणं जिवंत करणारी अन् सावलीच्या खुणा मिरवणारी; स्वाती मराडे
गुरूवारीय चित्रचारोळी’ स्पर्धेचे काव्यपरीक्षण
तू म्हणायचीस नेहमी, ‘सावलीसारखी सोबत राहीन’. पण, प्रत्यक्षात तू माझी सावली झालीस. उन्हातान्हातून चालता चालता अचानक एखादं थंड सावलीचं झाड दिसावं नि त्याखाली विसावा घेत ताजंतवानं व्हावं. अगदी तसंच मनात माझ्या कधीही दगदग झाली की तुझे अलवार शब्द सावली होऊन यायचे नि सगळा शीण घालवायचे. ‘ग्रीष्माच्या उन्हात जिवाची काहिली थांबवणारी तू थंड झुळूक झालीस’. माझ्या अपयशी जगण्यात कुणीच नव्हतं सोबतीला, तेव्हा तुझीच साथ लाभली. जणू सगळीकडे रणरणतं वाळवंट असताना ओॲसिस भेटलं.
माझं जगणं जिवंत करणारी, श्वासातही तू श्वास भरणारी, कृष्णधवल जीवनात माझ्या इंद्रधनू चितारणारी, पानगळ झालेल्या भणंग वृक्षावर वसंत फुलवणारी, काळोखात आशेचा दिप पेटवणारी, तृप्त करणारा श्रावण होऊन बरसणारी, सतत सोबत असणारी. पण कधी कधी देहाने येते अंतर. पण सोबत असते नेहमी तुझे ‘अंतर’.. भासात, श्वासात, स्वप्नातही तूच असतेस सोबत. सावली होऊन सावलीच्या खुणा मिरवणारी. मग मीही सावलीत तुला शोधतो. पुढे मी चालताना सुखद अनुभूती येते ती या सावलीच्या खुणांची. तू तीच सावली, “प्रकाशात सतत पाठराखण करणारी, संकट आलेच तर पुढेही चालणारी अन् अंधार झालाच तर मला बिलगून माझ्यात सामावणारी”.
मम देहाच्या अणुरेणूत, तूच आहेस सामावलेली
माझ्या सावलीच्या खुणाही, देतील याची ग्वाही..!
आज ‘गुरूवारीय चित्रचारोळी’ स्पर्धेसाठी आलेले चित्र पाहून दोन प्रेमी जिवांचे एकरूपत्व जाणवले. ‘तू जो मुडके देख लेगा, मेरा साया साथ होगा’, ‘तू जहाँ जहाँ चलेगा, मेरा साया साथ होगा..’या गीताच्या ओळी ओठांवर आल्या. तू केव्हाही वळून पहा माझं अस्तित्व तुला जाणवेलच याची ग्वाही देणारे. पुढे चालणा-या ‘त्याच्या’ मागे सावली आहे ती ‘तिची’. राधाकृष्णासारखे अद्वैत असणाऱ्या प्रितीचे प्रतिरूपच जणू. याच सावलीच्या खुणा शब्दांकित करताना आपणा सर्वांच्या लेखणीने रंग भरले. अशीच आपली लेखणी बहरत राहो. सर्व सहभागी रचनाकारांचे हार्दिक अभिनंदन. आदरणीय राहुल दादांनी मला परीक्षण लेखणीची संधी दिली त्यांचे हृदयस्थ आभार.
सौ स्वाती मराडे,इंदापूर जि पुणे
मुख्य परीक्षक,सहप्रशासक,कवयित्री लेखिका
©मराठीचे शिलेदार समूह