‘अपेक्षांचं ओझं वाढतच जातंय तेव्हा..!’; स्वाती मराडे
गुरूवारीय चित्रचारोळी स्पर्धेचे परीक्षण
‘अपेक्षांचं ओझं वाढतच जातंय तेव्हा..!’; स्वाती मराडे
गुरूवारीय चित्रचारोळी स्पर्धेचे परीक्षण
जन्माला आल्यावर काही महिन्यात तोंडातून हुंकार बाहेर पडला.. अss.. अ.. तो ऐकताच किती आनंद झाला सगळ्यांना. मग मी आणखी काय काय म्हणावं म्हणून सगळ्यांच्या अपेक्षा वाढल्या. खरंतर मी उच्चारलेला तो अ.. अपेक्षांचाच होता तर..! पुढे शाळेत जाऊ लागलो, किती नि काय मागे लागले याची गणतीच केलेली बरी. पुस्तकं वाचली पाहिजेत, चांगल्या अक्षरात लिहायचं, स्पर्धेत भाग घ्यायचा, गणितं पटापट सोडवायची, गाणं म्हणायला यायला हवं, चांगले मार्क्स मिळाले पाहिजेत. त्यासाठी क्लासला जायलाच हवे. किती ओझी वागवायची ही. जीव अगदी मेटाकुटीला आलाय. वाटते नकोच हे काही. माघार घेतली तर सगळे मला चुकीचे ठरवतात.पण माझं बालपण करपून जायला नको असे मला वाटत असेल तर, ‘माझं काय चुकलं’?
बालपणी अनेक क्षेत्रांत यश मिळवून आईवडिलांचा नावलौकिक करायचा. मोठे होताच कुटुंबियांप्रती कर्तव्य करत रहायचे. कधी काळजी घ्यायची तर, कधी कौतुक करायचे. मित्रमंडळीचा स्नेह जपायचा. नाती जपण्यासाठी आप्तेष्टांशी जिव्हाळा ठेवायचा. अवतीभवतीच्या समाजात मदतीचा हात पुढे करायचा. बरं हे अपेक्षांचं ओझं हळूहळू वाढतच जातंय. इतकं की आता भार नकोसा वाटायला लागलाय. एकेकाची बकेट लिस्ट पूर्ण करण्यासाठी माझा भार मी वाढवत गेलो. थकलीत आता गात्रं, माझी क्षमता मी विसरलो. आता पेलवत नाही ओझं. ‘वाटतं काय चुकलं माझं?’
सर्वांना सुखी करता करता
मी मनाचंही नाही ऐकलं
अन् स्वतःलाच विचारतो आहे प्रश्न
माझं काय चुकलं?
असेच इतरांच्या अपेक्षांचे ओझे वागवणारे काही विद्यार्थी, कितीतरी कुटुंबप्रमुख व गृहिणी आपल्या अवतीभवती आहेत हाच विचार मनात आला आजचे चित्रचारोळी स्पर्धेसाठी आलेले चित्र पाहून. अपेक्षांचा भार वाढता वाढता वाढतच जातो व पूर्ण करणाराला मात्र तो जीवघेणा ठरतो. या आशयाचे ओझ्याने त्रस्त गाढवाचे चित्र लाक्षणिक अर्थाने आले. तोच सूचक आशय रेखत व चित्राबरहुकूम प्राण्यांप्रती दयाभाव जागवत आजच्या रचना शब्दबद्ध झाल्या. सर्व सहभागी रचनाकारांचे हार्दिक अभिनंदन. आदरणीय राहुल दादांनी मला परीक्षण लेखणीची संधी दिली त्यांचे हृदयस्थ आभार
स्वाती मराडे,इंदापूर जि.पुणे
मुख्य परीक्षक,सहप्रशासक,कवयित्री,लेखिका
©मराठीचे शिलेदार समूह