रविवारी संध्यासमयी ६.०० वाजता घेणार मोदी पंतप्रधानपदाची शपथ
‘या’ नेत्यांनाही निमंत्रण
नवी दिल्ली: यंदाच्या लोकसभेतील एनडीएच्या (NDA) विजयानंतर आता नरेंद्र मोदी (Narendra Modi) तिसऱ्यांदा भारताचे पंतप्रधान होणार आहेत. ते रविवारी, 9 जून रोजी सायंकाळी 6 वाजता राष्ट्रपती भवनात शपथ घेतील. यावेळी पंतप्रधानांसह मंत्रिमंडळाचे सदस्यही शपथ घेतील. नरेंद्र मोदींच्या शपथविधीची तयारी दिल्लीत जोरदार सुरु आहे. नरेंद्र मोदी यांची देश-विदेशातील लोकप्रियता लक्षात घेता, अनेक बड्या व्यक्ती या शपथविधी सोहळ्यात सहभागी होणार आहेत. या सोहळ्यात केवळ शेजारील देशांचे राष्ट्रप्रमुखच सहभागी होणार नाहीत, तर समाजातील प्रत्येक घटकातील महत्त्वाच्या व्यक्तींना आमंत्रित करण्यात आले आहे.
राष्ट्रपती भवनाचे प्रांगण तिसऱ्यांदा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या शपथविधीचे साक्षीदार असणार आहे. जगभरातून आलेल्या पाहुण्यांच्या स्वागतासाठी रेड कार्पेट अंथरले जात आहे. त्यासोबत हिरव्या रंगाच्या खुर्च्या लावण्यात येत आहेत. सुमारे 8000 लोकांसाठी बसण्याची व्यवस्था आहे. मुख्य इमारतीत प्रवेश करण्यासाठी भव्य मार्ग तयार केला जात आहे.
पाहुण्यांमध्ये कोणाचा समावेश?
अहवालानुसार, जागतिक नेत्यांसाठी मोदींची निमंत्रण यादी त्यांच्या सरकारच्या ‘नेबरहुड फर्स्ट’ धोरणावर प्रकाश टाकते. यामध्ये बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसीना, नेपाळचे पंतप्रधान पुष्प कमल दहल, श्रीलंकेचे राष्ट्रपती रानिल विक्रमसिंघे, मॉरिशसचे पंतप्रधान प्रविंद जगन्नाथ आणि सेशेल्सचे उप-अध्यक्ष अहमद अतिफ यांना आमंत्रित करण्यात आले आहे. मालदीवचे अध्यक्ष मोहम्मद मुइझ्झू हे एक उल्लेखनीय निमंत्रित आहेत, ज्यांनी गेल्या नोव्हेंबरमध्ये राष्ट्रपतीपदाची सूत्रे स्वीकारल्यानंतर भारताची पहिली भेट म्हणून निमंत्रण स्वीकारले आहे. याशिवाय भूतानचे राजे जिग्मे खेसर नामग्याल वांगचू यांनाही या सोहळ्यात सहभागी होण्याचे निमंत्रण मिळाले आहे.
सत्ताधारी आणि विरोधी पक्षाच्या नेत्यांशिवाय वकील, डॉक्टर, चित्रपट जगत, क्रीडा जगत, प्रभावशाली व्यक्ती आणि उद्योगपतीही उपस्थित राहणार आहेत. यामध्ये केवळ व्हीव्हीआयपी पाहुणेच नाही तर, 50 प्रमुख धर्मगुरूही शपथविधी सोहळ्यात सहभागी होणार आहेत. इतकेच नाही तर सेंट्रल व्हिस्टा प्रकल्पाशी संबंधित कामगार, स्वच्छता कर्मचारी, ट्रान्सजेंडर, आदिवासी महिला आणि विकसित भारताचे राजदूत यांचाही समावेश करण्यात आला आहे