“तुरट आंबट.. कच्च्याच कैऱ्या, खाण्यात रंगत”; शर्मिला देशमुख
मंगळवारीय बालकाव्य स्पर्धेचे काव्यपरीक्षण
“तुरट आंबट.. कच्च्याच कैऱ्या, खाण्यात रंगत”; शर्मिला देशमुख
मंगळवारीय बालकाव्य स्पर्धेचे काव्यपरीक्षण
“आंबट गोड कैरीची फोड
मीठ चटणी लावूया,
ऐकूनच सुटते तोंडाला पाणी
सर्वजण वाटून खाऊया…”
रखरखता उन्हाळा ,चैत्र पालवीची बहर, कडुलिंब आंब्यांचा मोहर, त्यांचा दरवळणारा सुगंध, पक्ष्यांचा किलबिलाट , मधमाशांचे घोंगावणे , त्या बहरलेल्या मोहरामधून डोकावणाऱ्या लहान लहान कैऱ्या, कैऱ्या पाहून येणारा चेहऱ्यावरील आनंद, कधी कैऱ्या थोड्याशा मोठ्या होतील आणि पटकन तोडून खाऊ अशी मनाला वाटणारी ओढ ,रोजच्या रोज कैऱ्यांना पाहणे, कैऱ्या मोठ्या होण्याआधीच कच्च्याच घरच्यांच्या नकळत तोडणे, तुरट चवीच्या त्या लहानशा कैऱ्या तशाच खाणे, कच्च्या कैऱ्या तोडल्या म्हणून मोठ्यांचे रागावून घेणे, पुन्हा कैऱ्या कधी मोठ्या होतील यासाठी रोज त्यांना न्याहाळणे, आणि बघता बघता कैऱ्यांचे मोठे होणे. आणि सर्वात प्रथम त्या कैरीला मीच पाहणे, आई कैरी तोडू का म्हणून विचारणे, रोज रोज विचारण्याला कंटाळून आईने तोड म्हणून परवानगी देणे, मीच आधी कैरी पाहिली, मीच आधी तोडली म्हणून आनंदाने उड्या मारणे, काय त्या आंबट गोड आठवणी! सर्वात आधी कैरी खाण्याचा आनंद, वाह्! काय ते दिवस काय त्या सुंदर सुंदर आठवणी!
संपूर्ण शिवारात कोणाच्या झाडाला कैऱ्या आल्या आहेत आणि कोणाच्या कैऱ्या गोड -आंबट आहेत याची इत्यंभूत माहिती आम्हाला असायची. मग काय कैऱ्यांच्या शोधामध्ये दुपारी शाळा सुटली की, उन्हाचा विचार न करता सर्व मुले निघत. बऱ्याच वेळा कोणी कैऱ्या तोडू नयेत म्हणून झाडांना कुंपण घातलेले असायचे आणि राखण्यासाठी कोणीतरी म्हातारे आजोबा, गडी बसलेले असायचे. हे राखणदार इकडेतिकडे गेल्याचे पाहून आम्ही मुले कैऱ्यांवर आक्रमण करायचो. मग बऱ्याच वेळा पकडलो ही जायचे, मारही बसायचा, घरी तक्रार यायची ,घरचेही रागवायचे पण आमच्यात फरक तो काय पडणार! कारण तोंडाला पाणी आणणाऱ्या त्या आंबट कैऱ्यांची आठवण जरी आली तरी तोंडाला पाणी सुटते मग खाण्यापासून आम्ही बिचारी लहान मुलं कशी बरं राहणार?
मोठी माणसेही आंब्याला पाड लागला की, मुलांसाठी मुद्दामहून आणून देत. प्रत्येक घरच्या आंब्याचा वानवळा एकमेकांना दिला जाई. जवळपास गावातील प्रत्येक जणांचा आंबा खायला मिळे. पण सध्याच्या काळात प्रचंड झालेली वृक्षतोड पाहता आंब्याची झाडेच खूप मोजकी राहिली आहेत. माणसाने स्वार्थासाठी, भांडणात ,जमिनीसाठी, हव्यासापोटी वृक्षतोड केली आणि आज गावरान आंबा पाहायला मिळेना खायचा तर प्रश्न दूरच राहिला. आज कालच्या बालकांना कैऱ्या खाण्याचा आनंद दुरापास्त झाला आहे. मनमोकळे हिंडण्याचा आनंद कोसो दूर गेला आहे. सुट्ट्यांमध्ये मामाच्या गावाला जाणे ,आपल्याकडे आत्त्याची मुले येणे या गोष्टी आता इतिहास जमा होत आहेत. एक किंवा दोन अपत्यांच्या संकल्पनेमध्ये आता नाती सुद्धा राहिली नाहीत. तर तो आनंद कुठून राहणार. म्हणूनच कच्च्या कैऱ्या जर खाण्याचा आनंद घ्यायचा असेल तर प्रथम वृक्ष लागवड होणे आवश्यक आहे. आपल्या गावाशी खेड्याशी आपली नाळ जोडून राहणे आवश्यक आहे.
आज राहुल दादांनी मंगळवारीय बालकाव्य स्पर्धेमध्ये “कच्च्याच कैऱ्या” हा विषय दिला . जवळपास प्रत्येक शिलेदाराला आपले बालपण आठवूण गेले. एकमेकांच्या सोबतीने नजर चुकवून कशा कैऱ्या तोडण्याचा आनंद घेतला हे त्यांनी मांडले. आज सगळे शिलेदार जणू कच्च्या कैऱ्या तोडायला रानावनात हिंडत होते. कच्च्या कैऱ्या तोडताना कोणाला मालकांनी पकडले आणि बेदम सडकले तर काटेरी कुंपणावरून कोणी लांब उडी मारून निशाणा साधला. दुपारी जेवणात कैऱ्यांच्या फोडी खाऊन कोणी आनंद घेतला. खूप छान कच्च्या कैऱ्यांचा आनंद आज शिलेदारांनी उपभोगला.
‘बालकविता’ लिहिणे अवघड काम आहे. स्वतःच्या बालपणात जाऊनच ती कल्पना रंगवणे आवश्यक असते. सर्व शिलेदारांना बालपणात जाण्यासाठी, रमण्यासाठी शुभेच्छा. राहुल दादांनी मला परीक्षण लिहिण्याची संधी दिली त्याबद्दल धन्यवाद! तूर्तास ‘कच्च्या कैऱ्यांचा’ आनंद घेत येथेच थांबते..
शर्मिला देशमुख -घुमरे बीड
मुख्य परीक्षक,सहप्रशासक, कवयित्री
©मराठीचे शिलेदार समूह





