“अंतरंगातले गूढ खोलितो असा तो चेहरा”; वैशाली अंड्रस्कर
शनिवारीय काव्यस्तंभ स्पर्धेचे परीक्षण
“अंतरंगातले गूढ खोलितो असा तो चेहरा”; वैशाली अंड्रस्कर
शनिवारीय काव्यस्तंभ स्पर्धेचे परीक्षण
पंचमहाभूतांनी बनलेल्या या देहाचा चेहरा हा जणू आरसा. मनातील घडामोडींची बित्तंबातमी उघड करणारा तो चेहरा. एका हिंदी चित्रपटातील गाण्यात म्हटलेच आहे…
लाख छुपाओ, छुप ना सकेगा राज़ हो कितना गहरा
दिल की बात बता देता है असली नकली चेहरा…..!
अर्थात तो चेहरा बोलतो…शब्दही न योजता तो मनातील सारी गुपिते खोलतो.
बाळा, तुझा निरागस तो चेहरा बघता… आनंदी जाहले सर्व, इवल्याशा मुठीत तुझ्या स्वप्न रेखिले भव्य, तू पुत्र, सुत, तनय, मुलगा…वा तू लेक, कन्या, दुहिता.. तुझ्या चेहऱ्यात शोधती आपापल्या परीने माया नि ममता. आई शोधितसे लाडके बाळ, बाप शोधितसे कर्तव्यदक्ष नाळ, प्रीत बघे प्रेमळ प्रियकर-प्रेयसी, पती-पत्नी बघती आदर्शवत जीवनसाथी, मित्रत्वाचे नाते न्यारे… तुझ्या चेहऱ्यात शोधतसे ऋणानुबंध खरेखुरे…!
जन्माला येताच माणसाला एक चेहरा मिळतो. तो चेहरा म्हणजे त्याची दृश्य ओळख. पण वाढत्या वयानुसार, परिस्थितीनुसार त्याच्या चेहऱ्यावरील भाव बदलत जातात. कधी तो कठोर भासतो, कधी ममत्वाने भरलेला, कधी करारी, निग्रही तर कधी शांतचित्ताने संकटाला सामोरे जाणारा. जगात असे अनेक चेहरे असतात. ज्या चेहऱ्यांना बघून जगण्याची प्रेरणा मिळते. संत-महात्मे, समाजसुधारक, आईवडील, प्रियकर, प्रेयसी, जीवनसाथी, मुलेबाळे, मित्रमंडळी या सर्वांच्या चेहऱ्यात आपण जीवनाचे मर्म, सुख शोधत असतो. या चेहऱ्याला आठवणींच्या कप्प्यात मोरपीसासारखे जपून ठेवत असतो.
एक दिवस मात्र असा येतो….हा देह सोडून प्राण निघून जातो. देहाची हालचाल शांत होते. आयुष्यभर जपून ठेवलेला तो चेहरा अग्नीच्या, मातीच्या स्वाधीन करावा लागतो. तेव्हा घरच्यांना धीर देताना आप्तेष्ट, शेजारी पाजारी सांगतात…शेवटचा चेहरा बघून घ्या… पुन्हा तो दिसायचा नाही. पण खरेच तो चेहरा विसरता येईल का ? तो चेहरा फक्त चेहरा नसून ऋणानुबंधाच्या धाग्यांनी विणलेला गोफ आहे. जो आठवांच्या स्मृतीत कायम असणार…!
अशाच अनेकविध आशयाला मध्यस्थ ठेवून शिलेदारांनी रचनांना आकार दिला. राजश्रीताईंचा कृष्णाबाळ, बी. एस. गायकवाड दादांची सहचारिणी, सुनिताताईंच्या काव्यातील शेतात राबणाऱ्या माऊलीचा चेहरा, आई, लेक, प्रेयसी या साऱ्यांच्याच चेहऱ्यांना आज समूहात स्थान मिळाले. कधीही व्यक्त न होणारे पण आज सहज प्रेरणेने श्रीराम केदार काका लिहून जातात…
तो चेहरा गौतम बुध्दाचा,
वसतो या मनात…..
कां मला ठाऊक अजूनही तो हयात
असा असतो तो चेहरा….जो युगे लोटली तरी मनामनावर राज्य करणारा…. नसूनही हयात जीवनाला आकार देणारा….!
आज शनिवारीय काव्यस्तंभ स्पर्धेच्या निमित्ताने मराठीचे शिलेदार समूहाचे मुख्य प्रशासक माननीय राहुल दादा पाटील यांनी ‘तो चेहरा’, या विषयावर व्यक्त होण्याची संधी दिली त्याबद्दल मनापासून आभार …!
सौ.वैशाली उत्तम अंड्रस्कर, चंद्रपूर
कवयित्री/लेखिका
©सहप्रशासक/मुख्य परीक्षक/संकलक
©मराठीचे शिलेदार समूह