“अन्नप्राशन संस्कार, भारतीय संस्कृतीतील एक आदर्श विचार…”; विष्णू संकपाळ
शुक्रवारीय हायकू काव्यस्पर्धेचे परीक्षण

“अन्नप्राशन संस्कार, भारतीय संस्कृतीतील एक आदर्श विचार…”; विष्णू संकपाळ
शुक्रवारीय हायकू काव्यस्पर्धेचे परीक्षण
मानवी जीवनात, गर्भदान ते अंत्येष्टि पर्यंत जे काही महत्वाचे सोळा संस्कार केले जातात, त्यापैकी अन्नप्राशन हा अतिशय महत्वाचा असा सातवा संस्कार आहे. हिंदू धर्मातील अनेक पवित्र प्रथा, परंपरापैकी अन्नप्राशन केवळ प्रदर्शनीय प्रकार नसून तो एक आदर्शनीय संस्कार आहे. मातेच्या गर्भात नऊ महिने नाळेद्वारे गर्भाचे उदरभरण होत असते. सहाव्या सातव्या महिन्यात होणारे “डोहाळजेवण” हा सोहळा सुद्धा खूपच सूचक असतो. कारण “गर्भाशी आवडे मातेचे डोहाळे” असे म्हणतात. किंबहुना बाळाच्या भविष्यातील आवडीनिवडी मातेच्या वर्तनुकीवर ठरवल्या जातात. जन्मानंतर काही अवधीतच बाळ स्तनपान करू लागते.
मातेचा पान्हा हा अमृतासमान असतो. पुढे बाळ मोठे होत असताना त्याला अतिरिक्त अन्नाची गरज भासते.बाळ जेव्हा वरील पदार्थ खाण्यायोग्य होते; तेव्हा अन्नप्राशन हा सोहळा आयोजित केला जातो. शुद्ध, सात्विक व पौष्टिक आहार बाळाला देण्याचा संकल्प अथवा उद्देश यामागे असतो. हा संस्कार केवळ पारंपरिक अथवा धार्मिक सोपस्कार नसून यामागे बाळाच्या जडणघडणीचा एक उदात्त उद्देश असतो. अगदी पहिल्याच घासापासून बाळाला सकस आणि सत्वगुणयुक्त आहाराची सवय लावणे आणि ती कायम ठेवणे हा एक मौलिक विचार असावा. तसेही आपल्या संस्कृतीत अन्न ग्रहण केवळ उदरभरण नसून पवित्र यज्ञकर्म मानले जातेच.
“खाण तशी माती” किंवा “आहार तसा विचार” अशा अर्थाच्या काही म्हणी आहेत. त्यातून हाच संदेश मिळतो की, मानवी जीवनात आहाराला नितांत महत्व आहे. आणि त्याची योग्य सुरवात पहिल्या घासापासून व्हावी. काल ‘शुक्रवारीय हायकू काव्य’ स्पर्धेकरीता आ. राहुल दादांनी दिलेले चित्र हीच गोष्ट अधोरेखित करते. आईच्या मांडीवर बसलेले बाळ आणि त्याच्यासमोर मांडलेले विविध अन्नपदार्थाचे द्रोण. हे चित्र म्हणजे केवळ सुबत्तेचे प्रदर्शन नसून आपापल्या कुवतीनुसार केल्या जाणार्या पवित्र अन्नप्राशन संस्कारांचे बोलके चित्र आहे. विधीवत पूजन अर्चन करून गोड खीर किंवा तत्सम मऊ पदार्थाचा पहिला सुवर्णघास बाळाला भरवला जातो. आईवडील अथवा परिवाराची प्रार्थना आणि प्रयत्न असेच असावेत की भविष्यातही बाळाला सात्विक आहाराचे वळण आयुष्यभर रहावे. त्याचे शरीर कायम धष्टपुष्ट, निरोगी आणि ताकदवर रहावे. की ज्यायोगे त्याला हर समस्येचा सामना करता यावा….
शुद्ध विचार
अन्न प्राशन विधी
सिद्ध संस्कार
अशा चित्रावर हायकू लिहिणे फार मोठे आव्हान नव्हतेच. एक सूचक सकारात्मक संदेश मिळणे अपेक्षित होते. बहुसंख्य हायकूकारांनी उत्तम रचना पेश केल्या आहेत. जाता जाता एक सूचना वजा विनंती कराविशी वाटते की, सर्वांनी आवर्जून निकाल पोस्ट वाचून वेळेत फोटो पाठवावे. दुर्लक्ष करून सन्मानाकडे पाठ फिरवू नये. उपक्रमासाठी काही हात अहोरात राबत असतात याची जाण आणि भान असावे.. बाकी क्षेम…!!
विष्णू संकपाळ बजाजनगर छ. संभाजीनगर
©परीक्षक, सहप्रशासक मराठीचे शिलेदार समूह