स्वतःचं अस्तित्व प्रकाशमय करतांना पाहिल्या मी ‘जुनाट वाटा’; सविता पाटील ठाकरे
कार्यकारी संपादक सविता पाटील
‘स्वतःचं अस्तित्व प्रकाशमय करतांना पाहिल्या मी ‘जुनाट वाटा’; सविता पाटील ठाकरे
बुधवारीय काव्यरत्न स्पर्धेचे परीक्षण
आज कितीतरी वर्षांनी मामाच्या गावी जाण्याचा योग आला. गाडीच्या वेगासोबतच माझ्या विचारांनाही गती मिळत गेली. किती वर्षांनी आजोळी जाते मी? असा प्रश्न स्वतःला विचारला, पण त्याचं उत्तर ३५ वर्ष येताच माझ्यातल्या स्वार्थी ‘मी’ ने ‘मी’ला खूप कोसले. एवढी कशी स्वार्थी झाली मी ??? आजोळ म्हणजे माझं हक्काचं स्थान…! सुट्टी लागायचा उशीर, मी दुसऱ्याच दिवशी बस पकडून आजोळी जायची. पण ३५ वर्ष मी साधं एकदाही जाऊ नये? विचारांचं चक्र मला गरगर फिरवत होतं. माझी कार मामाच्या गावाजवळ पोहोचली. बापरे, किती हा बदल!!! सारंच बदललं होतं. गावातल्या त्या ग्रामीण सौंदर्याला आधुनिकतेची झळाळी प्राप्त झाल्याचं मला जाणवलं.
त्या गावातील अनेक ‘जुनाट वाटा’ स्वतःचं अस्तित्व मिटवत असताना मी पाहत होते. आजोबांच्या चिरेबंदी वाड्याजवळ पोहोचले, वाड्याच्या भिंतीवरचं ते हिरवं गवत मला वाकुल्या दाखवत होतं. होय….ज्या वाड्याच्या अंगाखांद्यावर आम्ही खेळलो होतो, तो वाडा आता थकलेला दिसत होता. तिथली भयावह शांतता माझ्या मनाला भेदत होती, छेदत होती. आजी, आजोबांच्या अनेक स्मृतींनी माझ्या डोळ्यात अश्रू उभे केले. भूतकाळात शिरलं माझं मन…! अनेक जुनाट वाटा प्रकाशित झाल्यात माझ्या मनात. अतिशय शिस्तप्रिय, पण, ‘हळवी आजी आठवली आणि करारी आजोबांचा चेहरा अश्रूंच्या आत जणू मी लपवला’.
कित्येक वाटांचं मी स्मरण केलं. संस्कारांची, शिस्तीची,
वेळेच्या बंधनांची, दिवाबत्तीची, गुराढोरांची, दुधातुपाची आंबा फणसाची. पण त्या सर्व ‘जुनाट वाटा’ आज काळाच्या ओघात मोडून पडल्या. पण…. पण…..याच वाड्यातील संस्कारांवर आजही मी भक्कमपणे उभी आहे याचा अभिमान ही मला वाटला. आजच्या भाषेत सांगायचं तर भले कंडीशनिंग झालं असेल; पण रुळलेलं, मळलेलं , परंपरेने पूर्वापार आपल्यापर्यंत चालत आलेलं, पूर्णपणे कधीच टाकाऊ नसतं याची मला जाणीव ही झाली. होय… मला मान्य आहे काळ बदलत आहे. बदलूया आपण… पण मी कुठे विरोध करते आहे आधुनिकतेला ?? परंतु अशा अनेक जुनाट वाटा आहेत त्यांच्या श्रेष्ठत्वावरच नवं काही उभं आहे, तेव्हा त्याला विसरून कसं चालेल ?
‘जुने जाऊ द्या मरणालागुनी, जाळूनी किंवा पुरून टाका, सडत न ऐका ठाई ठाका सावध ऐका पुढल्या हाका’. यातली उद्विग्नता समजून घ्यायला हवी. ‘जुनाट वाटा’ कधीच विसरण्यासारख्या नसतात, तर त्या नवीन वाटांसाठी मार्ग दाखवणाऱ्या असतात यावर मी मात्र ठाम झाली. ‘मराठी सारस्वत’ रसिकांना आज ‘बुधवारीय काव्यरत्न’ स्पर्धेच्या निमित्ताने ‘मराठीचे शिलेदार’ समूहाचे सर्वेसर्वा आदरणीय राहुल सरांनी ‘जुनाट वाटा’ हा विषय दिला . पण पुन्हा एकदा सर्व सारस्वत कवी कवयित्रींची लेखणी बहरली.अल्पशा विश्रांतीनंतर समूह पुन्हा एकदा जणू नटला. नुकताच श्रावण संपलेला आहे. निसर्गाने हिरवा शालू अंगावर पांघरलेला आहे आणि साहित्याच्या या सौंदर्यात अनेक सुंदर कवितांनी बहर आला. सर्व काव्य रसिकांचे मनापासून अगदी मनापासून खूप खूप अभिनंदन. पुढील लिखाणास अनंत कोटी शुभेच्छा.
पण थोडे काही…! लिखाणात सातत्य असेल तर, लेखणीही खुलत जाते. नवसर्जनशीलतेची यात भर पडते….तेव्हा सातत्यपूर्ण लिखाणाकडे आपण लक्ष देऊया व मराठीचे साहित्य संपन्न करण्याच्या राहुल सरांच्या प्रयत्नांना साथ देऊया. अतिमहत्वाचे म्हणजे स्पर्धेला विराम देण्याचे मुख्य कारण असे की विजेते कवी कवयित्री सन्मानपत्रासाठी छायाचित्र पाठवत नाही. नुकत्यात सर्व स्पर्धा सुरु करण्यात आल्या पण फोटो पाठवण्यासाठीची धडपड दिसून अली नाही. मागील दोन दिवसीय स्पर्धेतून फोटो न पाठवलेल्या सदस्यांची संख्या वाढली. कदाचित आजही तसे होऊ शकते. कृपया प्रत्येकाने आपल्या लेखणीचा सन्मान स्वीकारायला हवा असे मला वाटते.
सौ.सविता पाटील ठाकरे,सिलवासा
मुख्य परीक्षक,प्रशासक, लेखिका, कवयित्री
©मराठीचे शिलेदार समूह