उत्साही स्री आणि प्रसन्न प्रभात म्हणजे सृजनाचा मिलाफ’; विष्णू संकपाळ
शुक्रवारीय हायकू काव्यस्पर्धेचे परीक्षण

‘उत्साही स्री आणि प्रसन्न प्रभात म्हणजे सृजनाचा मिलाफ’; विष्णू संकपाळ
शुक्रवारीय हायकू काव्यस्पर्धेचे परीक्षण
“रात्रीच्या गर्भात असतो उद्याचा उषःकाल” असे म्हणतात ते उगीच नाही. रोजची संध्याकाळ वैविध्यपूर्ण अनुभवाचे गाठोडे पदरी बांधून मावळते. ज्यात कुणाचा स्वप्नभंग, तर कुणाची स्वप्नपूर्ती, कुणी सौख्यात दंग तर कुणास दुःख ग्लानी, कुणास मिळे गरूडपंख तर कुणास जहरी डंख, कुणास होते नव्याची भेट तर कुणास अंतरते कुणी थेट, कुणास मिळे जन्माचे दान. तर कुणाचे पडे गळून पान…! अशी प्रत्येकाची अलग सायंकाळ मात्र रात्रीच्या गर्भातून उद्या साकारणारी असते. “कालचे काल गाडून पुरून सज्ज व्हावे घेण्यास चैतन्याची ओंजळ भरून. नव्या संकल्पाचे अर्ध्य समर्पून सिद्ध व्हावे नवी संधी मानून”. कालचे विटाळ किटाळ विसरून, घ्यावी नवी साद ऐकून. सकाळ म्हणजे नव्या संधीचा साक्षात्कार. पूर्वेच्या नभातून सोनेरी आभेचा उत्साही अविष्कार. ही फक्त दिवसाची नव्या उंबरठ्यावरची पहिली चाहूल नसून, जीवनाच्या एका अनामिक प्रेरणाशक्तीचे नवे पाऊल असते.
काल ‘शुक्रवारीय हायकू’ स्पर्धेसाठी दिलेले चित्र पाहता
हायकू विषयाचा केंद्रबिंदू असलेली स्त्री नभाकडे हात उंचावते आहे—हे केवळ शरीराच्या हालचालीत सिमीत राहणारे चित्र नाही. तर तिच्या अंतरात्म्यातून उमटणारी तिच्या स्वप्नांची, आकांक्षांची, आणि उत्कट प्रेरणेची अभिव्यक्ती आहे. तिच्या मुखावरचा प्रसन्न भाव हा युगानुयुगे स्त्रीच्या अस्मितेचे आणि तिच्या अंतर्गत तेजाचे प्रतिबिंब आहे. ती केवळ प्रकाशाकडे पाहत नाही, तर त्या प्रकाशाचा एक अविभाज्य भाग होण्याची अभिलाषा बाळगते.
पहाटेचा मंद वारा तिच्या मनातील विचारांना संजीवनी देतो, आणि ती नव्या भरारीसाठी सज्ज होते. तिचे नभाकडे उंचावलेले हस्तद्वय हे मागणीचे नव्हे, तर स्वीकाराचे प्रतिक आहे. चैतन्याचा स्वीकार, स्वतःच्या सामर्थ्याचा स्वीकार, आणि अमर्याद आकाशाच्या दिशेने निर्भय झेप घेण्याचा आत्मविश्वासपूर्ण हुंकार हेच दर्शवतो की, ती हर आव्हान पेलण्यास तय्यार..!
खरे तर सकाळ हा शब्द सुद्धा स्रिलिंगीच आहे. स्री आणि सकाळ, किंवा सृष्टी हे सृजनाचे प्रतिक आहेत. उगवता सूर्य प्रेरणेचे ऊर्जेचे प्रतिक आहे. तर विस्तीर्ण आभाळ ध्येयासक्तीचे प्रतिक आहे. याच अनुषंगाने हायकू निर्मिती करताना हायकूकारांनी या सर्व गोष्टींचे भान ठेवणे आवश्यक आहे. कणाकणात चैतन्य भरणारी पहाट आणि ते स्वीकारण्यास तयार असणारी स्री केंद्रिभूत मानून प्रभावी हायकू लेखन होणे अपेक्षित आहे.
‘सकाळ आणि स्त्री—या दोन सृजनशक्तींचा मिलाफ म्हणजे जीवनाच्या अनंत शक्यतांचे उद्घाटन’. हायकूच्या मोजक्या शब्दांमध्ये या भावनांचे लयबद्ध प्रतिबिंब उमटवता येईल. आज तमाम हायकूकारांनी सुंदर प्रयत्न केला आहे.. सर्वांना मनापासून शुभेच्छा…आणि हो ऐका… ७ मे २०२५ छ. संभाजीनगरला सर्वांना यावेच लागते. पुस्तक प्रकाशन सोहळा आणि काव्यवाचन स्पर्धा… बघताय काय.. सामील व्हा..!!! आज मला हायकू परिक्षणाची संधी दिल्याबद्दल समूह प्रमुख आ. राहुल दादांचे मनःपूर्वक आभार.
विष्णू संकपाळ बजाजनगर छ. संभाजीनगर
©सदस्य सहप्रशासक मराठीचे शिलेदार समूह