‘चला वाघ्याच्या सफारीला…. ताडोबा पहायला’
सौ. स्वाती मराडे-आटोळे

‘चला वाघ्याच्या सफारीला…. ताडोबा पहायला’
निसर्गाच्या अप्रतिम सौंदर्याचा अनुभव घेण्यासाठी अवश्य भेट देण्यासारखे ठिकाण म्हणजे ताडोबा. ताडोबा राष्ट्रीय उद्यान, ज्याला ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्प म्हणूनही ओळखले जाते, हे महाराष्ट्रातील एक वन्यजीव अभयारण्य आहे जे जगभरातील निसर्गप्रेमी आणि वन्यजीव प्रेमींना आकर्षित करते. हे उद्यान स्वतःच त्याच्या समृद्ध वाघांच्या संख्येसाठी आणि विविध वनस्पती आणि प्राण्यांसाठी प्रसिद्ध आहे, तर आजूबाजूचा प्रदेश तितकाच मनमोहक आहे. प्राचीन मंदिरे आणि निसर्गरम्य तलावांपासून ते चैतन्यशील सांस्कृतिक स्थळे आणि शांत निसर्ग स्थळांपर्यंत, ताडोबाजवळील परिसर प्रवाशांसाठी अनुभवांचा खजिना देतात.
चंद्रपूर जिल्ह्यातील ताडोबा हे प्रमुख राष्ट्रीय उद्यान आहे. याची स्थापना १९५५ साली झाली. हे महाराष्ट्रातील सर्वात पहिले राष्ट्रीय उद्यान आहे. उद्यानात आढळणाऱ्या मगरी-सुसरी आणि गवा हे इथले मुख्य वैशिष्ट्य आहे.
या परिसरातील घनदाट जंगलात राहणाऱ्या तारु या सरदाराला देवत्वाचे रूप प्राप्त झाले, म्हणून तारोबा म्हणून आदिवासींद्वारे आदराने संबोधले जात असे त्याचाच अपभ्रंश होत ताडोबा असे नाव झाले. तसेच येथून वाहत असलेली आंध्र नदी.. याचा अपभ्रंश अंधारी असा होतो.
नुकत्याच झालेल्या एका सर्वेक्षणात, ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पातील कोअर भागात सुमारे ५५ व बफर झोनमध्ये सुमारे १५ वाघ आढळले आहेत. येथे ३०० पेक्षा अधिक प्रकारचे पक्षी आहेत, विविध फुलपाखरे, अनेक सरपटणाऱ्या प्रजाती, वैविध्यपूर्ण वनस्पती, ६० पेक्षा अधिक गवताच्या जाती, बिबट्या, जंगली कुत्रे, भालु, गौर, सांभर, चितळ, भेकर, निलगाय व काळ्या बिबट्याचे अस्तित्व आहे.
ताडोबा राष्ट्रीय उद्यानात मुख्य आकर्षण जंगल सफारी आहे. प्रशिक्षित स्थानिक मार्गदर्शकासह खुल्या टॉप जीप आणि बसेस पर्यटकांसाठी उपलब्ध आहेत. विविध ठिकाणी मुक्कामाची सोय देखील उपलब्ध आहे.
व्याघ्र प्रकल्पालगतच्या गावात मानव-वन्यजीव संघर्ष कमी करण्यासाठी कृत्रिम बुद्धीमत्तेचा एआयचा वापर केला जात आहे. ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पाच्या जवळच अटलबिहारी वाजपेयी निसर्ग उद्यान आहे. ताडोबा राष्ट्रीय उद्यानात सफारीवर जाणे हा एक रोमांचक अनुभव आहे, जो त्यांच्या नैसर्गिक अधिवासात भव्य बंगाल वाघांना पाहण्याची संधी देतो. या रोमांचक साहसात सामील होण्यासाठी, ताडोबा राष्ट्रीय उद्यानाची तिकिटे मिळवावी लागतात.
सौ. स्वाती मराडे-आटोळे
इंदापूर, पुणे
सहसंपादक, साप्ताहिक साहित्यगंध.