“पुन्हा परतून यावी ती…. गंमत जंमत”; शर्मिला देशमुख
मंगळवारीय 'आम्ही बालकवी' काव्यस्पर्धेचे परीक्षण

“पुन्हा परतून यावी ती…. गंमत जंमत”; शर्मिला देशमुख
मंगळवारीय ‘आम्ही बालकवी’ काव्यस्पर्धेचे परीक्षण
‘येशील का परतून, तू बालपणा,
पुढे जीवन रे हे शून्य, घे मिठीत जीवना.’
गमाडी गंमत.. जमाडी जंमत, मुठीत काय ओळखा पाहू? गुड गुड गुपित, लाकडाच्या कुपीत. काय तुझ्या मनात, सांग माझ्या कानात… काय ते रम्य बालपण ..निसर्गाच्या कुशीत निजलेलं, मायेच्या पावसात भिजलेलं, चिखल पाण्यात माखलेलं, घसरगुंडी करत चिखलात मुद्दाम घसरलेलं, धरणीच्या अंगा खांद्यावर लोळलेलं, पक्षांची भाषा बोललेलं, प्राण्यांसवे चार हातावर चाललेलं, कुहू कुहू कोकिळेसवे गायलेलं, माळरानावर हुंदडलेलं, फुलपाखरांसवे बागडलेलं, नदी ओढ्या काठी रमलेलं, तासंतास पाण्यात डुंबलेलं, रानमेव्याच्या आंबट गोड चवीत पोसलेलं, वृक्षछायेत पारंब्यावर लोंबकाळणारं, ऊन वाऱ्यात खेळलेलं.
खरे सांगू तर… अंधाऱ्या रात्री चमचमणारं, विविध कल्पनात झेपावणारं, रंगीत संगीत स्वप्नांनी सजलेलं, पंख नसतानाही उंच आकाशी उडणारं, कागदी नावेत सात समुद्र पार करणारं, भिरभिरणाऱ्या भिरभिऱ्यासोबत भिंगणारं,पानांच्या पिपाणीत संगीत वाजवणारं, कोवळ्या सूर्यप्रकाशात न्हाहणारं, चंद्राच्या शीतल छायेत झोपणारं, कथा गोष्टीत रमणारं, राक्षसाला घाबरणारं, भुतिया कथा ऐकून पाय पलंगावर घेऊन बसणारं, फुल वेलींच्या शोधात दूर दूर भटकणारं, पहिली कळी उमलताना पाहणारं ,शेजारी नातेवाईक सगळे माझेच समजणारं, आपले परकेच्या परे असणारं , आजी – आजोबांच्या छत्रछायेखाली वावरणारं, झाडांच्या पत्त्यांना पैसे समजून व्यवहार करणारं ,अंगत पंगत करून चटणी भाकरी आनंदाने खाणारं… कुठे हरवले हो ,ते बालपण आणि त्या गंमती जंमती?
‘जाऊया ना परत त्या विश्वात पुन्हा गंमत जंमत करायला.’ या धावपळीच्या जीवनातून मोकळा श्वास घेऊन जगायचे आहे, फुलायचे आहे, नाचायचे आहे, बागडायचे आहे, याल ना माझ्यासोबत? खूप सुंदर जीवन होतं हो, पुन्हा तेच जगायचे आहे. किती बरं झालं असतं ना, काळ परतला असता तर! आवडणारे ते दिवस पुन्हा पुन्हा जगले असते, हवे तेव्हा, हवे तसे, नाही का?
वेडी कल्पनाच ना ही? हो वेडीच कल्पना. पण हरवलेले हे जीवन आज बालकविता समुहातील शिलेदार मात्र पुन्हा त्या काळात परतून गंमती जंमती करत जगत होते. अहो, काय? काय म्हणून काय विचारता? आज मंगळवारीय बालकव्य स्पर्धेचा विषय “गंमत जंमत” दिला ना राहुल दादांनी आणि आमचे बालकवी पक्षी, प्राणी, शाळा, अंक, नदी , अभ्यासातील विषयांच्या गंमती जंमती, डोंगर, माळरान , चिमणी, पाखरे, फुलपाखरे, अंगत पंगत, विविध खेळ,वन्यप्राणी, मामा मामी, नातेवाईक, यामध्येच रमले की. खूप खूप गंमती जंमती केल्या त्यांनी. त्यांना असे बालपणात रमताना पाहून कोण आनंद झाला म्हणून सांगू ?असो, सर्व बालकवींचे सुंदर प्रयत्न चालू आहेत. सर्वांच्या लेखणीला भरभरून शुभेच्छा. राहुल दादांनी परीक्षा लेखनाची संधी दिली त्याबद्दल शतशः ऋणी मी. चला तर मग जाऊया परतून अनुभवायला परतून ती गंमत जंमत… तूर्तास थांबते, धन्यवाद!!!!
शर्मिला देशमुख -घुमरे, बीड
मुख्यपरीक्षक/लेखिका/कवयित्री
©सहप्रशासक मराठीचे शिलेदार समूह





