कविता’ अलंकारीक शब्दश्रृंगाराने नटलेली असावी; सविता पाटील ठाकरे
'बुधवारीय काव्यरत्न स्पर्धेचे काव्यपरीक्षण'
‘कविता’ अलंकारीक शब्दश्रृंगाराने नटलेली असावी; सविता पाटील ठाकरे
‘बुधवारीय काव्यरत्न स्पर्धेचे काव्यपरीक्षण’
तो : साडी नेसून खरंच छान दिसतेस ग तू ! तुझं सौंदर्य खुलते त्यात…कानातले डूल,नाकातली नथ, गळ्यातला मोतीहार,पायातले पैंजण सुंदर नेलपॉलिश तुझ्या सौंदर्यात मनसोक्त भर घालतात…अन् होय..तुझा तो कमरपट्टा तर तुझ्या सौंदर्याला झळाळीच देतो. तू साडी नेसून छान तयारी केली ती मला खूप आवडते.
ती: असं होय…अरे साज शृंगार म्हणतात तरी कशाला? यालाच ना…! पण असा साजशृंगार अजून कुणीतरी करतं..जी माझ्या हृदयस्त आहे. एकदा का तिला छान नटवलं, सजवलं मग ती कुणाच्याही काळजाचा सहज वेध घेऊ शकते.कमी शब्दात अख्ख भावविश्व समोर आणून ठेवते ती… तुला जाणून घ्यायच आहे का? कोण आहे ती?
तो: निश्चितच आवडेल मला …
ती: ती आहे कविता… कोणी मुलगी नाही रे… साहित्याची राणी आणि सर्वोच्च सम्राणी…चल आज सांगते तुला.. कशी असावी कविता?
अलंकार, प्रतिमा, प्रतीक, मिथक, आदिबंध आदींचा वापर करणारी.. छंदबद्ध, वृत्तबद्ध किंवा मुक्तछंद, मुक्तशैलीत ती लिहिली जाते. शब्दांनी घडविल्या गेलेल्या प्रतिमांची जी सेंद्रिय रचना ठरते. ‘एरीसस्टॉटल पासून रिचर्डसन’ पर्यंतच्या कवींनाही जी मोहात पाडते. बा.भ.बोरकर, इंदिरा संत, शांता शेळके, बा.सी.मर्ढेकर, दिलीप चित्रे, अरुण कोल्हटकर आणि नामदेव ढसाळ यांचीही जी लाडकी ठरते.
रसिक सृजनहो….अशी असावी कविता…. ‘बुधवारीय काव्यरत्न’ स्पर्धेच्या निमित्ताने मराठीचे शिलेदार समूहाचे सर्वेसर्वा आदरणीय राहुल सरांनी हा विषय दिला आणि काव्य म्हणजे शब्द आणि अर्थ यांचे साहचर्य होय याची प्रचिती आली. रमणीय अर्थ प्रतिपादन करणारे शब्द म्हणजे काव्य होय हेही उमगले….पंडितीकाव्य, शाहिरीकाव्य, नवकाव्य ही त्याची विविध अंग होत.
या कवितांच्या प्रेमातच प्रा. इंद्रजीत भालेराव म्हणतात. माझ्या कवितेने बोल….
काळजातला बोलावा….
उन्हाळ्यात खापराला…
जसा असतो ओलावा….
किती मोठा भावअविष्कार असतो ना कवितेत! माणसाचं मन आणि माणसं जोडते तेच खरे साहित्य.. आणि त्या साहित्याचा आत्मा म्हणजे काव्य होय. कसे असावे काव्य…यावर विचार करताना मला वाटतं.
ते लवचिक असावं…
ते सोपं असावं…
ते हृदयाचा ठाव घेणार असाव…
ते अर्थपूर्ण असावं…
ते ममत्ववादी असावं…
ते परखडही असावं…
ते अंतकरणातून आलेलं असावं
ते नैसर्गिक असावं…
ते वास्तववादी असावं…
ते शब्द पेरणारं असाव…
ते मनमोकळं असावं…
अर्थात आज परीक्षणार्थ रचना वाचतांना हे सर्व मला पहावयास मिळालं. खूप सुंदर पद्धतीने आज सर्वच समूहात कवितांची मांदियाळी जमली. एक क्षणभर मलाही प्रश्न पडला की परिक्षणात नेमकं काय लिहावं? तेव्हा तुम्हा सर्वांचे अगदी मनापासून खूप खूप अभिनंदन व तुमच्या लेखणीस सलामही.
सविता पाटील ठाकरे,सिलवासा
मुख्य परीक्षक,प्रशासक, कवयित्री,लेखिका, कार्यकारी संपादक
©मराठीचे शिलेदार समूह





