‘हवी नात्यांची घट्ट वीण आणि विश्वासार्हता चोरून भेटताना…!’; वैशाली अंड्रस्कर
शनिवारीय काव्यस्तंभ स्पर्धेचे काव्यपरीक्षण
‘हवी नात्यांची घट्ट वीण आणि विश्वासार्हता चोरून भेटताना…!’; वैशाली अंड्रस्कर
शनिवारीय काव्यस्तंभ स्पर्धेचे काव्यपरीक्षण
वाऱ्याच्या वेगाने जगभरात बातम्या पसरविणारी प्रसारमाध्यमे, फास्ट फॉरवर्ड रिल्सचा जमाना, एका क्लिकवर जिवलगाला बघण्याची, त्याच्याशी चॅटिंग करण्याची सोय अशा या अल्लाउद्दिनच्या जादुई चिरागाप्रमाणे सर्व मनोकामना पूर्ण करणारी संसाधने हात जोडून उभी असताना चोरून भेटण्याचे थ्रिल अनुभवणारी पिढी कदाचित हळूहळू कमी होईल की काय अशी शंका येईस्तोवर ‘मराठीचे शिलेदार’ समूहात शनिवारीय काव्यस्तंभ स्पर्धेच्या निमित्ताने ‘चोरून भेटताना’, हा विषय प्रसारित झाला आणि नकळतपणे ओठ गुणगुणू लागले….!
‘जेव्हा तिची नि माझी चोरुन भेट झाली,
झाली फुले कळ्यांची, झाडे भरात आली.’
मंगेश पाडगावकर यांचे गीत, यशवंत देव यांचा स्वरसाज आणि अरुण दाते यांचा तरल तितकाच ठसकेबाज स्वर यांनी विशिष्ट उंचीवर नेऊन ठेवलेल्या या भावगीताने एकेकाळच्या तरुण पिढीला वेड लावलेले. प्रियकर – प्रेयसीचा हा ‘चोरून भेटण्याचा’ क्षण ते दोघे भेटल्यानंतर मात्र निःशब्दता अनुभवतो आणि म्हणूनच कवी म्हणतात….
नव्हतेच शब्द तेव्हा, मौनात अर्थ सारे
स्पर्शात चंद्र होता, स्पर्शात लाख तारे
ओथंबला फुलांनी आकाश भोवताली
खरंच ही तरलता अनुभवण्यासाठी प्रीतही तितकीच तोलामोलाची हवी नाही का…? यासाठी हवा परस्परांवर विश्वास, रेशमी नात्यांची असावी घट्ट वीण, तरच सुखी आयुष्याचे सुंदर वस्त्र विणले जाईल. पण आज नात्यांची वीणच उसवलेली दिसते आणि चोरून भेटण्याची ओढ फक्त प्रियकर-प्रेयसीमध्येच नाही तर इतरही नात्यांमध्ये दिसून येते. कधी विवाहित लेकीला तिच्या आईशी चोरून भेटावे लागते, तर कधी नवऱ्याला आपल्या आई-वडील, बहिणीशी चोरून भेटावे लागते. किती विपरीत परिस्थिती ना..आणि हीच खरी शोकांतिका आहे नात्यांची….!
ही खंत एकीकडे असतानाच ‘चोरून भेटणे’, कधी कधी देशप्रेमाची ग्वाहीही देऊन जातं. स्वातंत्र्याच्या लढ्यात क्रांतिकारक भूमिगत होऊन चळवळ करताना एकमेकांशी चोरून भेटत, खलबते करत आणि भारतभूमीला गुलामगिरीच्या विळख्यातून सोडविण्यासाठी जीवावर उदार होत. भगतसिंग, राजगुरू, सुखदेव या त्रयींसोबतच नेताजी सुभाषचंद्र बोस, चंद्रशेखर आझाद, राणी लक्ष्मीबाई, अरुणा असफ अली, उषा मेहता, कल्पना दत्ता, प्रितिलता वड्डेदार अशी कितीतरी नावे इतिहासाच्या पानांवर कोरलेली आहेत.
असा हा सर्वस्पर्शी ‘चोरून भेटताना’, विषय ‘मराठीचे शिलेदार’ समूहाचे मुख्य प्रशासक माननीय राहुल दादा पाटील यांनी दिला. शिलेदारांनी आपल्या भावनांचा आवेग लेखणीतून चोरून भेटतानाची घालमेल अधोरेखित केली. सर्वांचे खूप खूप अभिनंदन… आणि मला परीक्षण लेखनाची संधी दिल्याबद्दल मनापासून आभार….!
सौ.वैशाली उत्तम अंड्रस्कर, चंद्रपूर
कवयित्री/लेखिका
©सहप्रशासक/मुख्य परीक्षक/संकलक
©मराठीचे शिलेदार समूह