Breaking
आरोग्य व शिक्षणई-पेपरकविताक्रिडा व मनोरंजनगोंदियाचारोळीनागपूरब्रेकिंगविदर्भसंपादकीयसाहित्यगंध

‘कवितेवर बोलू काही’ साहित्यसंवादातून उलगडले अभिजात मराठी भाषेचे महत्त्व

कवयित्री प्राजक्ता खांडेकर लिखित 'कैफियत' काव्यसंग्रहाचे थाटात प्रकाशन

0 4 0 9 0 3

‘कवितेवर बोलू काही’ साहित्य संवादातून उलगडले अभिजात मराठी भाषेचे महत्त्व

आपल्या कवितेचा दर्जा तपासण्याची गरज; संमेलनाध्यक्ष बळवंत भोयर

परप्रांतातही गायले जातात मराठीचे गोडवे; उद्घाटक डॉ. अनिल पावशेकर

मुलांनी प्रामाणिकपणे बोलण्यासाठी काव्यसाधनाचा वापर आवश्यक; डॉ. यमुना नाखले

कवयित्री प्राजक्ता खांडेकर लिखित ‘कैफियत’ काव्यसंग्रहाचे थाटात प्रकाशन

मुख्य संपादक: राहुल पाटील,बिनधास्त न्यूज

नागपूर: (दि.२ मार्च): मराठीचे शिलेदार बहुउद्देशीय संस्थेतर्फे ‘जागतिक मराठी भाषा’ गौरव दिनाचे औचित्य साधून अभिजात दर्जा प्राप्त मराठी भाषेच्या सन्मानार्थ ‘कवितेवर बोलू काही’ या साहित्य संवाद, कवी संमेलन व प्राजक्ता खांडेकर लिखित ‘कैफियत’ काव्यसंग्रहाचा प्रकाशन समारंभ दिनांक २ मार्च २०२५ रोजी’ डॉ बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक सभागृह, उरूवेला कॉलनी, वर्धा रोड, नागपूर येथे मराठी सारस्वत व साहित्य क्षेत्रातील दिग्गज मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न झाला.

या कार्यक्रमास संमेलनाध्यक्ष म्हणून प्रसिद्ध कवी बळवंत भोयर, नागपूर, उद्घाटक मार्गदर्शक म्हणून प्रसिद्ध स्तंभलेखक डॉ अनिल पावशेकर, प्रमुख पाहुणे म्हणून नितेश मेश्राम अध्यक्ष निरवाना बहुउद्देशीय संस्था, समुपदेशक डॉ यमुना नाखले, प्रसिद्ध कवयित्री सविता धमगाये, मागासवर्गीय शिक्षक संघटनेचे नेते दिवाकर गणवीर, मराठीचे शिलेदार संस्थेच्या सचिव पल्लवी पाटील, ज्येष्ठ कवी नागोराव सोनकुसरे प्रामुख्याने उपस्थित होते.

कार्यक्रमाची सुरूवात बाल सूत्रसंचालिका कु हर्षिता पाटील हिच्या गोड वाणीने करण्यात आली. मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन व प्रतिमा पूजनानंतर डॉ. पूजा रूखमोडे, प्राजक्ता खांडेकर व तारका रूखमोडे यांच्या संगीतमय वाणीने ‘गर्जा महाराष्ट्र माझा’ या राज्य गीताने ज्ञानपीठ पुरस्कार प्राप्त ‘कुसुमाग्रज’ अर्थात वि.वा. शिरवाडकर यांना नागपूरकर साहित्यप्रेमींनी उभे राहून मानवंदना दिली. लगेचच सूत्र संचालिका प्रा. तारका रूखमोडे यांनी पुढील कार्यक्रमास गती देत सूत्र हाती घेतली. विचारपीठावरील साहित्यिकांचा संस्थेच्या वतीने सन्मानचिन्ह, ग्रंथसंपदा, पुष्पगुच्छ व सन्मानपत्र देऊन सन्मान करण्यात आला.

‘मराठीचे शिलेदार’ बहुद्देशीय संस्थेचे संस्थापक, अध्यक्ष, प्रकाशक व संपादक राहुल पाटील यांनी ‘कवितेवर बोलू काही’ साहित्यसंवाद या कार्यक्रमामागील पार्श्वभूमी सांगत, मराठी भाषेची महत्ती विशद करणारे मार्गदर्शन केले. छत्रपती संभाजीनगर येथे होत असलेल्या संस्थेच्या पुढील साहित्य संमेलनासाठी सारस्वतांना सहभागी होण्यासाठी प्रेरित केले.

प्रास्ताविकानंतर सूत्र संचालिका ‘मधुबाला देशमुख’ यांनी कवयित्री प्राजक्ता खांडेकर लिखित ‘कैफियत’ काव्यसंग्रहाच्या प्रकाशनासाठी सर्व मान्यवरांना प्राजक्ता खांडेकर यांच्या यापूर्वी प्रकाशित झालेल्या चारही कविता संग्रहावर प्रकाश टाकत चित्रपट निर्माती ते कवयित्री असा प्रवास आपल्या वाणीतून अधोरेखित केला. उपस्थित सर्व मान्यवर व खांडेकर कुटुंबियासह प्रसिद्ध कवयित्री ‘प्राजक्ता खांडेकर’ यांच्या ‘कैफियत’ या पाचव्या कविता संग्रहाचे थाटात प्रकाशन करण्यात आले.

कार्यक्रमाचे उद्घाटक प्रसिद्ध स्तंभलेखक डॉ. अनिल पावशेकर यांनी मार्गदर्शन करतांना, अनेक किस्से सांगत मराठी भाषेतील अजरामर गाणी ही परप्रांतातही आवर्जून ऐकतात असे सांगितले. यातून मराठी भाषेची महत्ती किती दूरवर आहे हे समजावून सांगितले. अतिथी मार्गदर्शक डॉ. यमुना नाखले यांनी आपल्या मार्गदर्शनातून मुलांना प्रामाणिकपणे बोलके करण्यासाठी समुपदेशन करीत कोणत्याही प्रसंगाला सामोरे जाण्यासाठी शिक्षकाने तयार असायला पाहिजे असे सांगितले. प्रमुख अतिथी नितेश मेश्राम यांनी प्राजक्ता खांडेकर या अंत:करणातून काव्यलेखन करीत असून त्यांची लेखणी तसूभरही मागे सरत नाही असे सांगत खांडेकर यांच्या पुढील कविता संग्रहासही प्रस्तावना लिहण्याचे आश्वासन त्यांनी आपल्या मनोगतातून केले.

‘साहित्य संवाद’ या सत्रात संजयवाणीकार प्रसिद्ध कवी डॉ. संजय पाचभाई यांनी वैदर्भीय भाषेतून संवाद साधत ‘गावकडच्या दोस्ताची मजा’ शहरात नसून आपले कथाकथन विचारपीठाच्या पायरीवर बसून मांडले. ते म्हणाले, “बोलीभाषेचा वापर आपण आपल्या लेखनातून केल्यास प्रमाण भाषेकडे जातांना मायबोली मराठी अधिक समृद्ध होण्यास मदत होते”. प्रसिद्ध कवयित्री माधुरी काळे, वणी यांनी ‘वाक्याची नवी दुनिया’ या त्यांच्या पुस्तकाच्या निर्मितीची कहानी सांगतांना, “मी कसे लिहते झाले आणि वर्गातील मुले आपोआप या पुस्तकाच्या सहाय्याने बोलकी झाली” हे त्यांनी आपल्या संवादातून सांगितले. आनंद कोंडावार यांनी समाज परिवर्तनासाठी मेंदूला अधिक सक्षम होण्यासाठी विपश्यना करणे गरजेचे असून पुढील आयोजित शिबीरात सहभागी होण्याचे आवाहन केले.

संमेलनाध्यक्ष प्रसिद्ध कवी बळवंत भोयर यांनी कुसुमाग्रजांच्या मुलाखतीचा किस्सा सांगत तात्यांचे साहित्यावर किती प्रेम होते हे सांगितले. तर आपल्या काव्यरचना क्रमिक पुस्तकात येण्यासाठी आपल्या कवितेचा दर्जा तपासण्याची गरज असल्याचे आवर्जून नमूद करत सादरीकरणासाठी कविता ही पाठांतर असायला हवी हे मोलाचे मार्गदर्शन केले. कवयित्री प्राजक्ता खांडेकर यांच्या पाचही कविता संग्रहाचे रसग्रहण त्यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणातून मांडले.

याप्रसंगी कवयित्री प्राजक्ता खांडेकर, बाललेखिका कु हर्षिता पाटील, बिनधास्त न्यूजचे व्हिडीओ जर्नालिस्ट रजत डेकाटे यांचा संस्थेच्या वतीने शाल, सन्मानचिन्ह व सन्मानपत्र देऊन सत्कार करण्यात आला. आयोजित निमंत्रितांच्या कवी संमेलनास प्रतिभा गौपाले नागपूर, माधुरी काळे यवतमाळ, प्रभू फुलझेले नागपूर, रजनी फुलझेले नागपूर, सरोज फुलझेले नागपूर, नागोराव सोनकुसरे नागपूर, माधुरी सोमकुवर नागपूर, मोहिनी निनावे नागपूर, माधुरी लांजेवार नागपूर, केवलचंद शाहारे गोंदिया, सुषमा कळमकर – नागपूर, मधुबाला देशमुख, तारका रूखमोडे गोंदिया, गोवर्धन तेलंग यवतमाळ, श्रीमती. तृप्ती मेश्राम नागपूर, कु. प्राची कोरे, करुणा मून, डॉ. पूजा रुखमोडे गोंदिया, सुरेखा कोरे नागपूर, अस्मिता तिडके, अहिल्याताई, सिंधू बोदेले, वैशाली पांडे धुर्वे, कुंदा घोडमारे- चंद्रपूर, प्रितबाला बोरकर, कु. तनुजा अशोक भोयर, निर्मला जिवने, सुभाष मानवटकर, पंकज चारथळ नागपूर, कु. हर्षिता पाटील, रजनी संबोधी नागपूर, दिलीप घोगुलकर, करुणा मून, अर्चना लोखंडे, दिपक लोखंडे, रतनलाल खांडेकर, मयूर लांजेवार, मुकुंद खोब्रागडे, दीपकुमार गायगोले, भारती गायगोले, मनीषा खापर्डे, निहारिका मेश्राम, दिव्यांशी मेश्राम, प्रफुल नवनागे, डॉ किशोरी पाचभाई, कु.भाग्यश्री पाचभाई, गुलशन रोकडे, संगीता दिवाकर गणवीर व कु.सृष्टी गणवीर आदी कवी, कवयित्री व मराठी काव्यरसिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

5/5 - (1 vote)

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 4 0 9 0 3

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे