“ध्येयाप्रत पोहोचवणारी… कासवगती”: शर्मिला देशमुख
मंगळवारीय 'आम्ही बालकवी' स्पर्धेचे परीक्षण
“ध्येयाप्रत पोहोचवणारी… कासवगती”: शर्मिला देशमुख
मंगळवारीय ‘आम्ही बालकवी’ स्पर्धेचे परीक्षण
‘ससा तो ससा की कापूस जसा
त्याने कासवाशी पैज लाविली,
वेगे वेगे धावू नि डोंगरावर जाऊ
ही शर्यत रे आपुली…ससा..तो ससा’
‘कासवगती’ म्हटले की, हे लहानांबरोबर मोठ्यांनाही वेड लावणारे गीत आठवल्याशिवाय राहत नाही. अगदी लहानपणापासून ऐकत आणि ऐकवत आलेली सान थोरांची आवडती गोष्ट म्हणजे, ‘ससा आणि कासव’ यांच्या शर्यतीची गोष्ट. गोष्टीतील ससा खट्याळ, वेगवान पण अतिविश्वास त्याचा घात करतो तर कासव शांत, संयमी आणि मंद गती तरीही आत्मविश्वास,सातत्य आणि प्रयत्न त्याला जिंकवून देतात. पुढे चालून या कथेच्या पुढे अनेक कथा जोडण्यात आल्या, गाणे बनवण्यात आले. या कथेतील रस मात्र काळ ओलांडला तरी कमी झाला नाही हे मात्र खरे.
आता कासवगती या शब्दाचा शब्दशः विचार केला तर, कासवाच्या गती प्रमाणे मंद गतीने, अतिशय हळुवार चालणे असा अर्थ होतो. कासवगती या शब्दसमूहाचा व्याकरण दृष्ट्या विचार केला तर अतिशय मंद गतीने काम करणे असा होतो. विशेषतः ‘निर्णय’ घेण्यासंदर्भात याचा वापर केला जातो. हा शब्दप्रयोग एखाद्या कामातील दिरंगाई किंवा अत्यंत सावधगिरीने केलेली कृती दर्शवण्यासाठी वापरला जातो. आता यावरून कासवगती हा शब्द दोन अर्थाने वापरला जातो हे समजते. म्हणजे खूप विचार करून विचारांती सावधगिरीने निर्णय घेणे याला कासवगती म्हणायचे आणि अतिशय मंद गतीने केलेले काम किंवा कामातील दिरंगाई करणे याला सुद्धा कासवगती म्हणायचे. आता हा शब्द कशासाठी वापरला हे मात्र वाक्यातील संदर्भावरून ओळखावे लागणार हे नक्की.
आता तुम्ही म्हणाल हे मराठी व्याकरण कुठे आले बालकाव्यामध्ये. तर त्याचे असे झाले की, आपल्या समूहाचे सर्वेसर्वा राहुल दादा यांनी ‘मंगळवारीय बालकाव्य’ स्पर्धेसाठी ‘कासवगती’ हा विषय दिला आणि समूहात कासव गतीने का होईना पण रचना येऊ लागल्या. कासवाच्या प्रयत्नांना आलेले यश पुन्हा कवितेच्या रूपाने समूहात अवतरले. कासवगतीने का होत नाहीत समूहात 11 रचनांचा आकडा तयार झाला. सांगण्याचे तात्पर्य हेच की, समूहातील शिलेदारांनी बालकाव्य लिहण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न करावा. तसे पाहता बालकविता लिहिणे अवघड असले तरी अशक्य मात्र नाही. कासव गतीने बालकाव्याकडे वाटचाल करा ध्येय नक्कीच प्राप्त होईल. सर्व ‘मराठीचे शिलेदार’ बंधू भगिनींना लेखणीसाठी भरभरून शुभेच्छा. मला परीक्षण लेखनाची संधी दिल्याबद्दल राहुल दादांचे शतशः ऋण! तूर्तास थांबते धन्यवाद….!!!
शर्मिला देशमुख -घुमरे, बीड
मुख्य परीक्षक/लेखिका/कवयित्री
©सहप्रशासक,मराठीचे शिलेदार समूह



