‘मिमांसा बेस्ट स्कूल अवॉर्ड’ने प्रहार मिलिटरी स्कूल सन्मानित
प्राचार्या वंदना कुलकर्णी यांनी स्वीकारला पुरस्कार
‘मिमांसा बेस्ट स्कूल अवॉर्ड’ने प्रहार मिलिटरी स्कूल सन्मानित
प्राचार्या वंदना कुलकर्णी यांनी स्वीकारला पुरस्कार
सर्व स्तरातून होतेय अभिनंदनाचा वर्षाव
नागपूर शहर प्रतिनिधी
बिनधास्त न्यूज नेटवर्क
नागपूर: (दि १३) शहरातील सी.पी अँड बेरार एज्युकेशन सोसायटीच्या अंतर्गत कार्यरत प्रहार मिलिटरी स्कूल, रवीनगर या शाळेने शैक्षणिक गुणवत्ता, तांत्रिकदृष्ट्या सक्षम अध्यापन पद्धती तसेच विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी राबविलेल्या नाविन्यपूर्ण उपक्रमांमुळे मानाचा “मिमांसा बेस्ट स्कूल अवॉर्ड” प्राप्त केला. या प्रतिष्ठित सन्मानाने शाळेच्या उल्लेखनीय कार्याचा गौरव करण्यात आला असून प्राचार्या श्रीमती वंदना कुलकर्णी यांना विशेष सन्मानित करण्यात आले.
हॉटेल प्राईड येथे आयोजित भव्य पुरस्कार सोहळ्यात आय.आय.एम. नागपूरचे संचालक डॉ. भिमराय मेत्री, मिमांसा एड्युनेटवर्कचे संस्थापक संचालक नवीन रॉय तसेच सहसंचालक यशोधरा दास यांची प्रमुख उपस्थिती लाभली. मान्यवरांच्या हस्ते प्राचार्या श्रीमती वंदना कुलकर्णी यांनी हा पुरस्कार स्वीकारला.
शाळेतील समर्पित शिक्षकवृंद, कर्मचारीवर्ग आणि संस्थेचे पदाधिकारी यांच्या एकत्रित प्रयत्नांमुळेच हा मानाचा पुरस्कार प्राप्त झाल्याची भावना यावेळी व्यक्त करण्यात आली. विद्यार्थ्यांमध्ये शिस्त, देशभक्ती आणि नेतृत्वगुण विकसित करण्याच्या शाळेच्या ध्येयधोरणांची दखल घेऊन हा सन्मान प्रदान करण्यात आला. शैक्षणिक क्षेत्रासोबतच शाळेमध्ये विविध प्रकारच्या खेळांचे नियमित आयोजन केले जाते. विद्यार्थ्यांनी राज्यस्तर व राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धांमध्ये सहभाग नोंदवून उल्लेखनीय यश संपादन केले असून अनेकांनी विजय मिळवत शाळेचे नाव उज्ज्वल केले आहे.
या यशानंतर प्रहार मिलिटरी स्कूल, रवी नगर भविष्यातही शैक्षणिक उत्कृष्टतेसह आधुनिक तंत्रज्ञानाधारित शिक्षण, क्रीडा प्राविण्य आणि मूल्यांवर आधारित संस्कार यांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना सक्षम व जबाबदार नागरिक घडविण्याच्या दिशेने अधिक जोमाने वाटचाल करणार असल्याचे प्राचार्या श्रीमती वंदना कुलकर्णी यांनी सांगितले.
