
अण्णाभाऊंची लेखणी
अण्णाभाऊची लेखणी आहे जगात देखणी
श्रमिकांच्या घामामधुनी फुलली तिची कहाणी…!!
भुकेच्या भेगांतून तिने शब्दांना जन्म दिला
अंधाऱ्या झोपडीतील दिव्याला सूर्यस्पर्श मिळविला…!!
जातपातीच्या भिंतींवर तिने प्रश्नांचा घाव घातला
माणुसकीच्या मंदिरात समतेचा दीप पेटवला…!!
रानावनात गिरणीत नि चाळीत स्वर दुमदुमला
दीन-दुबळ्यांच्या वेदनांना शब्दांचा श्वास मिळाला…!!
“फकिरा” झाला स्वाभिमानाचा अखंड जाज्वल्य हुंकार
अन्यायाच्या छाताडावर कोरला स्वातंत्र्याचा उच्चार…!!
पोवाडा झाला ज्वालामुखी लावणी झाली जागृती
कथांनी शिकवली जगण्याला संघर्षाची संस्कृती…!!
लेखणी नव्हती शाईची ती क्रांतीची तलवार होती
वंचितांच्या प्रत्येक अश्रूची जणू जिवंत हाक होती…!!
अण्णाभाऊंची लेखणी आहे जगात देखणी
समतेच्या भारताची तीच खरी चिरंतन निशाणी…!!
राजश्री मिसाळ ढाकणे
ता. जिल्हा बीड
==========



