आठवणींचा विक्रेता
वसुधा नाईक धनकवडी, जि.पुणे

आठवणींचा विक्रेता
आजच्या धावपळीच्या जीवनात तंत्रज्ञानाने सर्वाना व्यापले आहे. जीवनात माणूस खूप काही कमावतो, पैसा- अडका, प्रसिद्धी, सुखसोयी इत्यादी. पण, या सगळ्यात नकळत हरवत चाललेली गोष्ट म्हणजे जीवनातल्या आठवणी. त्या साध्या, निरागस, मनाला स्पर्शून जाणाऱ्या बालपणातील आठवणी. आई, बाबांची शिकवण, आजी – आजोबांचे संस्कार, कथा या आठवणी खूप मागे चालल्या आहेत. कधी कधी मनात एक कल्पना येते जर आठवणींचाही एखादा विक्रेता असता तर? कदाचित जीवन आणखी सुखकर झाले असते.
कल्पना करूया की, गल्ली, गल्लीत फिरत येणारा पूर्वीचा आवाज जसा” कल्हई लावा भांड्यांना “असा म्हणत येणारा एक माणूस किंवा” बिबं घ्या, सुया घ्या माय”,असं म्हणत येणारी बाई त्या प्रकारे अशीच एखादी व्यक्ती गल्लीमध्ये शिरली आणि म्हणाली “आठवणी द्या ग माई, आठवणी घ्या,या आठवणी तुझ्या बालपणीच्या, तरुणपणाच्या, तुझ्या वृद्ध अवस्थेतल्या, तुझ्या मित्रांच्या,तुझ्या मैत्रिणींच्या आठवणी घे बाई,आठवणी घे ग बाई ” किती छान होईल ना आपल्या परत त्या आठवणी आपल्याला परत मिळाला तर!
काही जण तिच्याकडे जातील तिला सांगतील की, ‘मला बालपणीच्या आठवणी परत दे’. मला तरुणपणातल्या आठवणी परत दे. वृद्धावस्थेत मी आता आहेच आहे, पण मला त्या जुन्या आठवणी माझ्या मला परत दे, तर त्या वेळेला ती काय म्हणेल, विचार केला आणि असं लिहावंसं वाटतं की, ती म्हणेल ‘त्या आठवणी तुझ्याजवळच आहेत. त्या तुझ्यापासून कुठे लांब गेलेल्या नाहीयेत मी फक्त त्याची आठवण करून देण्यासाठी आलेली आहे’. अशा प्रकारे आपल्याला आपल्याच आठवणींचा हिंदोळा जो आपण बांधून ठेवलाय मनामध्ये तो उलगडावा त्या हिंदोळ्यावर पुन्हा एकदा बसावे आणि पुन्हा एकदा त्या आठवणी जपून ठेवलेला पेटारा खोलून त्या आठवणीत रमावे आणि बघा आणखी किती छान जीवन जगता येईल. खूप छान वाटतं मनामध्ये या आठवणी आपण पुन्हा पुन्हा स्मरून पुन्हा पुन्हा विचार करून पुन्हा पुन्हा पण त्या आठवणींच्या झोपाळ्यावर बसलो तर आपल्याला आनंदी आनंद मिळतो. आणि दुःखाच्या छायेतून थोडा विरंगुळा मिळतो.
अजून एक कल्पना, एखाद्या शांत गल्लीमध्ये एक छोटंसं दुकान आहे. त्या दुकानाच्या पाटीवर लिहिलेलं आह “आठवणींचा विक्रेता.” आत गेल्यावर काचेच्या बरण्यांमध्ये, जुन्या पेट्यांमध्ये, रंगीबेरंगी कुप्यांमध्ये वेगवेगळ्या आठवणी जपून ठेवल्या आहेत. कुठे बालपणातील खेळ, कुठे आईच्या कुशीतली ऊब, कुठे शाळेच्या पहिल्या दिवसाची धडधड, तर कुठे पहिल्या प्रेमाची हळवी चाहूल… हा विक्रेता पैसे घेऊन आठवणी विकत नाही. तो पाहतो समोरचा माणूस काय शोधतोय? कोणाच्या डोळ्यात हरवलेलं बालपण दिसतं, कोणाच्या चेहऱ्यावर अपूर्ण नात्यांची ओढ दिसते, तर कोणाच्या मनात न बोललेले शब्द साठलेले असतात. मग तो हळूच त्या माणसाच्या हातात एक आठवण ठेवतो आणि क्षणात त्या व्यक्तीच्या डोळ्यात पाणी तरळतं, ओठांवर स्मित उमटतं.
आठवणी या विकत घेण्यासारख्या नसतात, त्या जगण्याने तयार होतात. प्रत्येक क्षणात त्या निर्माण होत असतात. आपल्या हसण्यात, रडण्यात, नात्यांत, अनुभवांत. पण अनेकदा आपण वर्तमानात इतके गुंतून जातो की या आठवणींना जपायला विसरतो. “आठवणींचा विक्रेता” ही केवळ कल्पना नाही, तर एक जाणीव आहे.आपल्या आयुष्यातील प्रत्येक क्षण अनमोल आहे. उद्या आपण तो विकत घेऊ शकत नाही, म्हणून आज त्याला मनापासून जगा, जपा. शेवटी, खरा आठवणींचा विक्रेता कुठे बाहेर नसतो. तो आपल्या मनातच असतो. आपणच आपल्या आठवणी जपायच्या, अनुभवायच्या आणि गरज पडल्यावर त्या पुन्हा उलगडून जगायच्या.कारण आठवणीच तर आयुष्याला खऱ्या अर्थाने समृद्ध बनवतात. “आजची आठवण, उद्याची विचार साठवण….”.
वसुधा नाईक
धनकवडी, जि.पुणे
=========



