‘विसरु कशी मी ? प्रीतखुणेसह घाव मनावरचे ?; वैशाली अंड्रस्कर
शनिवारीय काव्यस्तंभ स्पर्धेचे परीक्षण

‘विसरु कशी मी ? प्रीतखुणेसह घाव मनावरचे ?; वैशाली अंड्रस्कर
शनिवारीय काव्यस्तंभ स्पर्धेचे परीक्षण
आज शनिवारीय काव्यस्तंभ स्पर्धेच्या निमित्ताने माननीय राहुल दादा पाटील यांनी ‘विसरु कशी मी ?’, हा विषय दिला आणि मराठीचे शिलेदार समूहातील सर्व रचना वाचतानाच सहप्रशासक सौ. स्वाती मराडे ( आटोळेंची ) फार जुनी रचना जी तेव्हा सर्वोत्कृष्ट मध्ये निवडल्या गेली होती ती आठवली. कवितेचे शीर्षक होते ‘टिपूस’. आजही ही रचना मी माझ्या मोबाईलमध्ये जतन करून ठेवलेली आहे आणि आपल्या रसग्रहणास ती सादर करीत आहे….
कसे आहात द्वारकाधीश ?
शब्द ते राधेचे….
गेले काळीज चिरून
अगं, तुझ्यासाठी तरी
राहू दे मला..कान्हाच होऊन
आठवण तुझी आली की,
यायचं डोळ्यांत पाणी टचकन…
अन् तूच द्वारकाधीश म्हणतेस…?
या कान्हाला गेली का विसरुन…?
सांग तू काय करायचीस….?
जेव्हा माझी आठवण यायची तुला
खरं सांगते कान्हा
तुझी आठवण कधी आलीच नाही मला
आणि नाही कधीच या डोळ्यांतून
टिपूसही वाहिला
आठवणींचं म्हणशील तर
मी कधी विसरलेच नाही तुला
अन् डोळ्यांत रूप तुझं साठवून ठेवलंय ना
ते आसवांबरोबर वाहून नको जायला
म्हणूनच या डोळ्यांतून
कधी टिपूसही नाही वाहिला….
विसरु कशी मी ? किंवा तू विसरणार तर नाही मला ? या दोन्ही प्रश्नांच्या पलिकडे एक भावविश्व असतं…सौ. स्वातीने ते कान्हा आणि राधेच्या प्रीतीतून अधोरेखित केलं. अशीच आपली नाती असतात, कधी आईवडील बहीण भाऊ अशी रक्ताची, कधी मित्र-मैत्रिणी, सखा अशी ऋणानुबंधाने जुळलेली. या नात्यांना आंतरिक ओढ असेल तर ती व्यक्ती शरीराने दूर असो वा जवळ काहीही फरक पडणार नाही आणि विसरु कशी मी ? म्हणायला जागाच उरणार नाही. ती कायमचीच मनात जपली जाणार…श्वासाच्या अंतापर्यंत…!
मात्र ह्या सौख्याच्या पलिकडेही कधी दुःखाचं तर कधी क्रौर्याचं जग असतं. जे जिवंतपणी मरणयातना देतं. प्राक्तन, प्रारब्ध अशा गुळगुळीत शब्दांनी आपण त्यांना सामोरे जातो…पण ते दुःख, क्रौर्य मनाच्या एका कोपऱ्यात कायम दडून राहतं आणि मग एखादेवेळी त्यावरील खपली निघून मन म्हणतं, ‘विसरु कशी मी ?’
उपरोक्त आशयाच्या रचनांनी समूह समृध्द झाला, नावेच घ्यायची झाली तर, विसरु कशी मी ?, म्हणताना वृंदाताई करमरकर लिहितात, ‘अंतर्यामी तो झिरपत गेला,मीच अरे कान्हा जाहले….’, तर विष्णूदादा संकपाळ म्हणतात, ‘अर्ध्य दान घे प्रितीचे उरले नाही माझी मी, हीच होती तपस्या, सांग विसरू कशी मी..?’, तर विरह भावना अधोरेखित करताना सुलोचना लडवे ताई म्हणतात, ‘विसरू कशी तुला रे मी तुझ्या अभावी श्रृंगार रूसला…’, वर्षा मोटे म्हणतात, विसरू कशी मी ? त्या वाटांना, जिथे तुझ्या पाऊलखुणा उमटल्या, तिथेच अजुनी उभी राहुनी, मी काळजाच्या हाका ऐकल्या’, बळवंत डावकरे दादांनी शिवबाची सय येऊन अब्रू वाचवणाऱ्यासाठी स्त्री मनातील कातर भाव पुढील शब्दांत अंकीत केले, ‘आला धावून तो असा, अब्रू मज शाबूत राहिली, विसरु कशी मी सांगा, माझ्या आयुष्याची काहिली…!
खरोखरच समूहातील सर्वच रचना भावनांनी ओतप्रोत भरलेल्या काहींनी सुखावले काहींनी डोळे पाणावले…सर्वांचे खूप खूप अभिनंदन… आणि भावी वाटचालीस भरभरून शुभेच्छा…!
सौ.वैशाली उत्तम अंड्रस्कर, चंद्रपूर
कवयित्री/लेखिका
©सहप्रशासक/मुख्य परीक्षक/संकलक
©मराठीचे शिलेदार समूह