“कधी शब्दांना पंख फुटतात; तर कधी शब्दही रुसतात”; सविता पाटील ठाकरे
बुधवारीय काव्यरत्न स्पर्धेचे परीक्षण
“कधी शब्दांना पंख फुटतात; तर कधी शब्दही रुसतात”; सविता पाटील ठाकरे
बुधवारीय काव्यरत्न स्पर्धेचे परीक्षण
खूप लांबचा प्रवास करून, मी नाशिकरोड रेल्वे स्टेशनवर पहाटे उतरली.डिसेंबर महिना होता. कडाक्याची थंडी अंगाला चांगलीच झोंबत होती. मी घरी जाण्यासाठी कार येण्याची वाट पाहत होते. शेजारी फुटपाथवर काही गरीब लोक थंडीत कुडकुडत होते. पाहून वाईट वाटलं. पण काही करू शकत नाही आपण, याचं शल्यही मनाला बोचलं. खास करून वयोवृद्ध,भिकारी, कुष्ठरोगी लोकांना थंडीचा भयानक त्रास जाणवत होता. विचारांच्या गर्तेत असतानाच एक आलिशान कार त्या फुटपाथ जवळ थांबली. अंधार होता. कोण उतरलं ते दिसलं नाही?. पण, त्या व्यक्तीने दरवाजा उघडला आणि त्यातून नवे कोरे ब्लॅंकेट्स, रजई, चादर बाहेर काढल्या .पटापट त्या लोकांना देत तो निघूनही गेला. त्याच्यासोबत ना मीडिया होता ना फोटोसेशन. ही खरी मदत मला मात्र मनाला खूपच भावली. आजच्या या स्वार्थी युगात ‘असं ही घडतं कधी कधी’.माझा माणूसकीवरचा विश्वास मात्र अधिक दृढ झाला या प्रसंगाने.
बुधवारीय काव्यरत्न स्पर्धेचे परीक्षणत्याला रक्ताची नितांत गरज होती. रक्ताचा रंग तो ‘लालच’. त्याला ना जात लागते ना पात, ना धर्म ना पंथ. त्याचा शेजारी अहमद, ईद सणाचा आनंद लुटत असताना, त्याला फक्त कळलं की, धनुदादाचा अपघात झाला आहे. सर्व सोडून धावतच दवाखान्यात गेला अहमदने रक्त दिले आणि प्राण वाचवले मित्राचे. शेजारी, गावकरी सारं पाहतच राहिले. त्यांच्या मैत्रीच्या नात्याला जातीचा रंगच नव्हता मुळी. असं सर्वत्र घडावं असं मला मनापासून वाटतं. पण ‘असेही घडतं कधी कधी’.
ती रुक्मिणी, नदीवर कपडे धुवायला नेहमीप्रमाणे गेली. सोबत लहान मुलालाही घेऊन गेली. खेळता खेळता तो मुलगा पाण्यात गेला, बुडायला लागला. लोकांनी महत प्रयासाने त्याला वाचवले. पण रुक्मिणीच्या चेहऱ्यावर मुलगा वाचल्याचं समाधान दिसत नव्हते. ती काहीतरी शोधत होती. लोकांनी विचारलं काय झालं ? तुझा मुलगा वाचला याचा आनंद नाही का झाला? त्यावर ती म्हणाली, “अहो मुलगा वाचला, पण त्याच्या डोक्यावरची टोपी मला सापडत नाही.” कशी असतात ना लोक, ‘असेही घडतं कधी कधी’.
कधी ऊनच ऊन, तर कधी शीतल वाऱ्याची धून…
कधी अतिवृष्टी तर कधी अनावृष्टी….
कधी उधाणलेला सागर, तर कधी रुसलेली घागर….
कधी सुवर्णकाळ तर कधी दुष्काळ….. कधी आयुष्याची गाडी वेगाने धावते, तर कधी तणावात जागेवरच थांबते…. कधी दुथडी भरून वाहणारे प्रेम, तर कधी जाळणारा जीवघेणा विरह….
कधी सोनपावलांचे आगमन, तर कधी प्रिय व्यक्तीचे गमन…
कधी विरोध तर कधी उत्तेजन….
कधी घोंघावणारे वादळ तर कधी शांततेची वर्दळ…
कधी सुसंगती तर कधी विसंगती…. कधी साखळदंडाची बेडी तर कधी साखळदंडासकट झेप….
कधी शब्दांना पंख फुटतात; तर कधी शब्दही रुसतात….
कधी हसणं तर कधी रुसणं….!
‘असंही घडतं कधीकधी’ हा विषयच मुळात अतिशय रोचक आहे.आज ‘बुधवारीय काव्यरत्न’ स्पर्धेच्या निमित्ताने ‘मराठीचे शिलेदार’ससमूहाचे सर्वेसर्वा आदरणीय राहुल सरांनी काव्य लिखाणासाठी हा विषय दिला आणि कवी कवयित्रींनी आपल्या भावनांच्या सरींना मुक्तपणे कोसळू दिले. खूप छान छान रचना आज समूहात आल्यात. तेव्हा तुम्हा सर्व कवी कवयित्रींचे अगदी मनापासून अभिनंदन पुढील लिखाणास अनंत कोटी शुभेच्छा.!
सौ.सविता पाटील ठाकरे,सिलवासा
मुख्य परीक्षक,प्रशासक, लेखिका, कवयित्री
©मराठीचे शिलेदार समूह





