दोस्तीतली कुस्ती’ ही अहंकार शाबूत असल्याचं लक्षण; प्रशांत ठाकरे
शनिवारीय काव्यस्तंभ स्पर्धेचे काव्यपरीक्षण
‘दोस्तीतली कुस्ती’ ही अहंकार शाबूत असल्याचं लक्षण; प्रशांत ठाकरे
शनिवारीय काव्यस्तंभ स्पर्धेचे काव्यपरीक्षण
खरी दोस्ती… स्वार्थ, अपेक्षा आणि व्यवहाराच्या पलीकडे वसलेलं नाते. ती केवळ आनंदाच्या क्षणी जवळ राहणारी नसून, संकटाच्या काळात न बोलताही आधार देणारी असते. काळाच्या कसोटीवर जे नातं तग धरतं, तीच मैत्रीच्या शिखरावर पोहोचते. आजच्या स्वकेंद्री युगात संबंधांची गर्दी आहे,पण आत्मीयतेचा अभाव आहे. खरी मैत्री म्हणजे मित्राच्या उत्कर्षात निःसंकोच आनंद आणि अपयशात निःस्वार्थ साथ. मतभेदांतही मनभेद न होऊ देणं, संयम, क्षमा आणि विश्वास जपणं हीच खरी मैत्रीची ओळख. अन्…अशा मैत्रीत….अर्थात दोस्तीत कुस्ती…म्हणजे कुठेतरी स्वार्थाचा लवलेश….!!
संत तुकाराम महाराज म्हणतात… “आपुलाचि दोष दिसे दुसऱ्यासी”. दोस्तीतली कुस्ती नेमकी इथेच उगम पावते. मित्राच्या कृतीत जे खटकते, ते बहुतेक वेळा आपल्या आतल्या अस्वस्थतेचं प्रतिबिंब असतं. मित्र पुढे गेला म्हणून आपण दुखावतो, पण संत विचार सांगतो, “दुखावलेपण हे मित्राचं कृत्य नसून आपल्या अपूर्णतेची जाणीव आहे.” दोस्तीतली कुस्ती ही दुसऱ्याशी नसून स्वतःशीच असते. त्याही पुढे जात संत एकनाथ स्पष्ट सांगतात…. “अहंभाव जरी जाई, तैसेचि मित्रत्व पाई”. अहंकार शिल्लक असताना दोस्ती टिकते, पण ती खोल जात नाही. अहंकाराचं अस्तित्व म्हणजे सततचा गुणतोल. कोण पुढे, कोण मागे? म्हणून दोस्तीतली कुस्ती ही अहंकार शाबूत असल्याचं लक्षण आहे. अहंभाव गळून पडला की मित्र प्रतिस्पर्धी राहत नाही, तो सहप्रवासी होतो.
म्हणून दोस्तीतली कुस्ती टाळता येत नाही, पण तिचं रूपांतर करता येतं. अहंकाराची कुस्ती आत्मपरीक्षणात बदलता आली, तर मैत्री मोडत नाही ती परिपक्व होते. संतविचार आपल्याला हेच शिकवतो की, मित्राशी झगडण्याआधी स्वतःच्या मनाशी झगडायला शिका.कारण संतांच्या दृष्टीने… दोस्ती म्हणजे विजय नव्हे तर दोस्ती म्हणजे विलीनता होय. तेव्हा दोस्तीत ही कुस्ती कधीच येऊ देऊ नका. आज ‘शनिवारीय काव्यस्तंभ’ स्पर्धेसाठी मराठीचे शिलेदार समूहाचे सर्वेसर्वा आदरणीय राहुल सरांनी “दोस्तीत कुस्ती” हा विषय दिला. कवी मन असते….मोठे विचारी अन् उत्तुंग… प्रत्येकाने आपापल्या परीने दोस्ती रेखाटली आणि त्यातली कुस्ती ही शब्दबद्ध केली तेव्हा तुम्हा सर्वांचे खूप खूप अभिनंदन. लिहत राहूया वाचत राहूया.. तूर्तास एवढेच… धन्यवाद.
प्रशांत ठाकरे, सिलवासा
मुख्य परीक्षक/ लेखक
©सहप्रशासक मराठीचे शिलेदार समूह



