“गनिमाला आमच्या नजरेत भिती पहायची होती.. पण त्याचं हे स्वप्न शेवटी स्वप्नच राहिलं”; स्वाती मराडे
गुरूवारीय 'चित्र चारोळी' स्पर्धेचे काव्यपरीक्षण

“गनिमाला आमच्या नजरेत भिती पहायची होती.. पण त्याचं हे स्वप्न शेवटी स्वप्नच राहिलं”; स्वाती मराडे
गुरूवारीय ‘चित्र चारोळी’ स्पर्धेचे काव्यपरीक्षण
चित्र पाहिलं की काळजात धस्स होऊन आलं ना डोळ्यात पाणी! किती त्या यातना अन् किती त्या वेदना.. जीभ ओढून काढली, डोळयात गरम सळ्या घातल्या, हात तोडले, पाय तोडले, अंग सोलून काढले, उघड्या जखमांवर मिठाचे पाणी टाकले.. कल्पनेनेच डोक्यात विचारांचं काहूर माजले नि मन अस्वस्थ झाले.. सगळंच असह्य. मन सुन्न झालं. पण शंभूराजांच्या तोंडातून निघाला नाही भितीचा एकही शब्द चुकार. आपण फक्त ऐकलं, वाचलं, चित्रातून पाहिलं.. तरीही उमटला एक अस्वस्थ हुंकार.. तोच वेदनेचा हुंकार शब्दातून निःश्वास सोडू लागला. पण शंभूराजांनी ते प्रत्यक्ष सोसलं. शंभुराजे, कसं सोसलं हो तुम्ही ते सगळं.. फक्त नि फक्त स्वराज्याची अस्मिता जपण्यासाठी. आबासाहेबांचा मान राखण्यासाठी, आऊसाहेबांची आदर्श शिकवण तेवत ठेवण्यासाठी… आणि तुमच्या-आमच्या मनात तेच स्फुल्लिंग पेटविण्यासाठी.. स्वधर्म, स्वराज्य यापेक्षा सगळं गौण आहे हे दाखवण्यासाठी.
शत्रूला ज्या नजरेत भिती पहायचीय ती नजरच त्याला घाबरवू लागली अन् हुकुम आला.. ‘काढा रे याचे डोळे. जीभ छाटली तरी नजरेने बोलतोय. किती ती गुर्मी..!’ गरम सळ्या नजरेसमोर आणताना काही क्षण जल्लादसुद्धा मागे सरकला. नजरेतली जरब की तेज, धाक की शौर्याचा दरारा.. पाहूनच तो स्तब्ध झाला. हात लटपटले. त्या शेवटच्या क्षणी तुमच्या नजरेसमोर.. (हे तरी कसं म्हणावं..)अंत:चक्षूसमोर आबासाहेब, आऊसाहेब, आईसाहेब व स्वराज्यच असेल. काय होते ते तुमचे शेवटचे शब्द ? तुम्ही रयतेला जगणं शिकवलंत.. मी मरणाला निडरपणे सामोरं कसं जायचं हे दाखवून देईन.
गनिमाला आमच्या नजरेत भिती पहायची होती.. पण त्याचं हे स्वप्न शेवटी स्वप्नच राहिलं.. त्याला कळायला पाहिजे हा शिवपुत्र एका सिंहाचा छावा आहे. “आबासाहेब तुम्ही आभाळाच्या डोळ्यांनी माझ्याकडे पाहत असाल; पण आभाळभर तुम्ही असलेल्या तुम्हाला पहायला माझ्याकडे डोळेच नाहीत.” स्वराज्याच्या मातीचा तिलक कपाळावर लावायला हात नाहीत अन् गुडघे टेकवून नतमस्तक व्हायला पायही नाहीत. जीभही छाटलीय.. बोलायला आवाज नाही.. तरीही माझ्या गात्रागात्रांच्या अणुरेणुतून तोच आवाज घुमतोय.. स्वराज्य.. स्वराज्य.. स्वराज्य !! लहानपणीच आईस पारखं झालेलं मन आता तिच्याकडे धाव घेऊ लागलंय. आऊसाहेब तुम्हीही गेलात, आता तुमच्या कुशीत पुन्हा यायचंय. आबासाहेब तुमचीही शेवटची भेट झालीच तर नव्हती. आभाळमायाच तुमची.. ती आभाळमाया मला आतातरी मिळेल.
“…असे म्हणत चेहऱ्यावर हसू ठेवतच मरणाला मिठी मारलीत”. शेवटी शत्रूला नाहीच दिसला कुठेही भितीचा लवलेश. अवघं ३२ वय, कधीच हार न झालेल्या १२० लढाया.. तो लढवय्या शेवटीही शत्रूला मनातून उध्वस्त करून गेला. अन् शत्रूलाही म्हणावं वाटलं, ‘काश हमे भी संभा जैसा बेटा होता |’
“टाहो विरला तुळापूरच्या रानी
दैवही चरकले निःशब्द होऊन,
पण शंभुराजे तुमचे शेवटचे शब्द
उमटले गात्रांच्या अणुरेणूतून…”
छत्रपती संभाजी महाराज बलिदान मासानिमित्त ‘गुरूवारीय चित्र चारोळी’ स्पर्धेसाठी चित्र आले. चित्र पाहताच धैर्य, शौर्य, तेज, अभिमान, वेदना, यातनांची असह्य कल्पना अशा विविध भावना मनपटलावर उमटल्या. राजे तुम्ही पराक्रमांचाही पराक्रम करणारे, तसेच कवीमनाचेही.. पण तुमचे शेवटचे शब्द. शब्दात व्यक्त करताना मन अस्वस्थ झाले. इतिहासाच्या पानांवर व आमच्या मनामनावर अभिमानाने मिरवणाऱ्या तुम्हास अनंत प्रणाम. या सर्व भावना व्यक्त करण्यासाठी अनेक रचना चित्र चारोळी स्पर्धेसाठी आल्या. चित्रानुरूप अनेक हृदयस्पर्शी रचनांनी मन वेधून घेतले. परंतु चित्रचारोळी स्पर्धेत चित्र ऐतिहासिक असेल तर त्याच बाजूने विचार करणे अपेक्षित होते. काही रचना यास अपवाद वाटल्या. याचाही रचनाकारांनी अवश्य विचार करावा. सहभागी सर्व स्पर्धकांचे अभिनंदन. आदरणीय राहुल दादांनी मला परीक्षण लेखणीची संधी दिली त्यांचे हृदयस्थ आभार.
स्वाती मराडे, इंदापूर पुणे
मुख्य परीक्षक/कवयित्री/लेखिका
©सहप्रशासक मराठीचे शिलेदार समूह



