सांग दर्पणा मी कशी दिसते; वृंदा करमरकर
सोमवारीय काव्यत्रिवेणी स्पर्धेचे परीक्षण

सांग दर्पणा मी कशी दिसते; वृंदा करमरकर
सोमवारीय काव्यत्रिवेणी स्पर्धेचे परीक्षण
‘ओळख पहिली गाली हसते,
सांग दर्पणा कशी मी दिसते.’
या जुन्या गीताच्या ओळी आज आठवल्या. ती तरुणी कुणा तरुणाच्या प्रेमात पडली. तिला सारं जग सुंदर दिसू लागलं. ती सारखी आरशात पाहून स्वत:चं अनोखं रुप न्याहाळू लागली. आरशाला विचारू लागली, “अरे दर्पणा मी कशी दिसते?”.वास्तविक लहानांपासून मोठ्यांपर्यंत अगदी वयोवृद्धांना आरसा हवा असतो. जणू तो आपला मित्रच असतो. आरशा शिवाय आपलं पदोपदी अडतं.अगदी आदिम काळात माणसानं नितळ पाण्यात आपलं प्रतिबिंब पाहिलं असेल. माणसाला आरशात व्यवस्थित प्रतिमा पाहण्यासाठी १८३५ पर्यंत थांबावं लागलं. असं म्हणतात ‘जर्मन शास्त्रज्ञ जस्टस वाॅन लिबिग’ यानं आरशाचा शोध लावला.
आजकाल आरसे सजावटीसाठी ब्युटी पार्लर, जेन्टस् पार्लर, मोठे माॅल, दुकाने येथे वापरले जातात. वाहनांच्या आरशांमुळेच वाहने सुलभतेने वापरता येतात. आरसा आणि स्त्रीचं नातं चिरपरिचित आहे. ‘आरसा आपलं खरं रूप दाखवतो’. नवथरतरुणी तर मान मुरडून आपलं रुप आरशात पहात असते. लहान मूल सुध्दा आरशात भान हरपून बघतं. आरशाला मनाची उपमा दिली जाते. मन चंचल असतं, पणमनाशी मैत्री केली कि ते आपला चांगला मित्र बनतं. “आरसा आपलं बाह्य रुप दाखवतो, तर मन अंतरंग दाखवतो”. आपण बाह्य रुप पाहून खुश न होता अंतरंगी डोकावलं पाहिजे. मनाचा आरसा स्वच्छ ठेवला पाहिजे. काम, क्रोध, लोभ, मत्सर हे षड्रिपू मनाचा आरसा मलिन करतात. रोज मनन, चिंतन, ध्यान केल्यास मनही प्रसन्न होतं आणि आपलं अंतर्मन आनंदी होतं
आपण आरशात पाहतो तेंव्हा, भूतकाळातीलआठवणी दाटून येतात. कधी प्रतिबिंबा त आपल्या जीवलगाचं बिंब दिसतं. पण मला सांगावं वाटतं प्रत्येकानं बाह्य रुपाला न भुलता अंतरंगात पाहिलं पाहिजे. माणूस कसा दिसतो यापेक्षा तो कसा असतो हे पाहता, ओळखता आलं पाहिजे. स्त्रियांनी देहस्विनी न बनता मनस्विनी बनावं. मन शांत, आनंदी असेल तर, मनाचा आरसा स्वच्छ राहील आणि आपलं रुप अंतर्बाह्य आत्मतेजानं झळाळून जाईल.
आजच्या ‘काव्य त्रिवेणी’ स्पर्धेसाठी आपल्याआदरणीय राहुल सरांनी दिलेला ‘दर्पणात मी’ हा विषय चिंतनशील आहे. शिलेदारांनी सुध्दा स्पर्धेला चांगला प्रतिसाद दिला आहे. त्याबद्दल त्यांचे मनापासून आभार.
वृंदा(चित्रा)करमरकर
मुख्य मार्गदर्शक, परीक्षक,सहप्रशासक
सांगली जिल्हा सांगली
©मराठीचे शिलेदार समूह