“हरवलेली ती वाट पुन्हा नव्याने जागवायची आहे”; स्वाती मराडे
गुरूवारीय 'चित्र चारोळी' स्पर्धेचे परीक्षण

“हरवलेली ती वाट पुन्हा नव्याने जागवायची आहे”; स्वाती मराडे
गुरूवारीय ‘चित्र चारोळी’ स्पर्धेचे परीक्षण
मावशी, बघ ना.. हा अमित हल्ली एकटा एकटा राहतो. कधी कधी आक्रमकपणे वागतो. धड जेवत नाही, नीट बोलत नाही. काही सांगत नाही. कसली घुसमट होतेय का त्याची..? सगळं तर पाहिजे तसे, हवे तेव्हा देते मी त्याला.. मग तरीही का बरं असा खिन्न राहत असेल?
हातात रिमोट घेऊन गाडी चालवणाऱ्या अमितचे मावशींनी क्षणभर निरीक्षण केले. त्याला जवळ बोलावले. पर्समधून काही चित्रे हातात घेतली आणि त्याला दाखवायला सुरुवात केली. इमारती, रस्ते, गाड्या, शाळा, मुले, मुली, झाडे, वेली, पाऊस, पक्षी, डोंगर, नद्या, झरे.. जसजशी तो ही चित्रे पाहत होता तसतसे त्याच्या चेहऱ्यावर सूक्ष्म छटाही उमटत होत्या… ते पाहिले अन् मावशीच्या चेहऱ्यावर हसू उमटले. काही नाही गं याला कारण आहे केवळ हा सभोवताल. म्हणूनच मला नक्की वाटतंय आपली वाटच चुकतेय गं.. सध्याची ही कृत्रिम वाट सोडून त्याला गरज आहे नव्या वाटेने जायची..! म्हणजे काय गं मावशी?
बघा ना.. ऐलतीरावर तो उभा आहे. या तीरावर त्याच्या सोबत आहेत. उंच उंच इमारती, मोठमोठे रस्ते, कारखाने, आजूबाजूला टी.व्ही, संगणक, मोबाईल व वेबचे जाळे, निर्जीव खेळणी.. जणू कृत्रिम दुनियेतच तो वावरतोय. नको तेवढा कृत्रिमतेचा मारा होतोय गं बाल बुद्धीवर.. ना निसर्गाचं सान्निध्य, ना पक्ष्यांचा किलबिलाट, ना पावसात भिजणं, ना झऱ्यांची झुळझुळ, ना नदीचं खळखळणं, ना चंद्राचं चांदणं.. नैसर्गिक सुखसहवासाला पारखा झालाय गं तो. त्याला जरा निसर्गाच्या कुशीत ने. पैलतीरावर आहे ना तो स्वागताला तयार.. आपणच ही निसर्गाची मळलेली वाट विस्मृतीत घालवली नि वेगळ्या वाटा निवडल्या. आता पुन्हा त्याच्या कुशीत जायचं तर त्यासाठी बांधा ना एक सांकव.. हरवलेली ती वाट पुन्हा नव्याने जागवायची आहे. जुनीच असली तरी नव्या दमाने या नव्या वाटेने जायचे आहे.
होय गं मावशी.. अगदी खरंय तुझं. आता मी नक्कीच त्याला आठवड्यातून एकदा तरी निसर्ग सहवासात नेईल. पक्ष्यांचं गाणं ऐकवेन, चांदण्यात भिजवेन, फुले दाखवेन, झाडांच्या अंगाखांद्यावर खेळवेन, रानमेव्याची ओळख देईल.. मीसुद्धा त्याच्यासोबत माझं ते जुनं बालपण पुन्हा जगेन. किती छान वाट दाखवलीस तू मला. काहीतरी गवसल्याच्या आनंदात ती अलगद मावशीला बिलगली.
आजच्या चित्र चारोळी स्पर्धेसाठी आलेले चित्र सांकव ओलांडून निसर्ग सान्निध्यात आनंदाने जाणारा मुलगा.. जणू एक नव्या वाटेने जात असल्याचा आनंद सोबत घेऊन तो बागडतो आहे. अनेकविध कल्पनांनी आजच्या रचना साकारल्या..नव्हे रचनांची बरसात झाली. चित्रातील सूक्ष्म अर्थ शोधत केलेली शब्द बांधणी मन वेधून घेणारीच. मराठी राजभाषा दिनास आपला हा उत्साह चैतन्य निर्माण करणाराच. असेच लिहित रहा या शुभेच्छांसह सहभागी रचनाकारांचे हार्दिक अभिनंदन. आदरणीय राहुल दादांनी मला परीक्षण लेखणीची संधी दिली त्यांचे हृदयस्थ आभार.
स्वाती मराडे,इंदापूर पुणे
मुख्य परीक्षक/लेखिका/कवयित्री
©मराठीचे शिलेदार समूह





