जनतेच्या पैशावर डल्ला मारण्यासाठी राजकारणी पोसतात ‘पांढरा हत्ती’; सविता पाटील ठाकरे
बुधवारीय 'काव्यरत्न' स्पर्धेचे काव्यपरीक्षण
जनतेच्या पैशावर डल्ला मारण्यासाठी राजकारणी पोसतात ‘पांढरा हत्ती’; सविता पाटील ठाकरे
बुधवारीय ‘काव्यरत्न’ स्पर्धेचे काव्यपरीक्षण
आज बातमी वाचत होती. मनमाड-इंदूर रेल्वे मार्गाचा सध्याचा उभारणीचा मंजूर एकूण खर्च सुमारे १८,०३६ कोटी रुपये आहे. या मार्गासाठी सुरुवातीला अंदाजे १०,००० कोटींचा खर्च अपेक्षित होता, पण आता सुधारित खर्च १८,०३६ कोटींवर आला आहे, जवळपास दुप्पट खर्च झाला. नियोजन नसल्यामुळे किंमत जवळपास दुप्पट झाली. जनतेच्या खिशातला हा पैसा खर्च करून असे अनेक ‘पांढरे हत्ती’ पोसले जात आहेत. तिकडे महानगर पालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पुन्हा एकदा ७५००० कोटींनी उचल खाल्ली आहे. आरोप प्रत्यारोपाच्या फैरी झाडून पिंजऱ्यात एकमेकांना उभे करणारे अनेक पांढरे हत्ती महाराष्ट्राची करमणूक करत आहेत.
लोकशाहीच्या दरबारात कधी कधी असे काही प्रकल्प, योजना किंवा संस्था उभ्या राहतात त्यांचा आभास डोळे दिपवतात. परंतु त्यामागचा उपयोग मात्र जनतेच्या नजरेआड राहतो. अशाच निष्प्रयोजक, खर्चिक आणि केवळ दिखाऊ व्यवस्थेला राजकीय भाषेत “पांढरा हत्ती” म्हणतात.
पांढरा हत्ती म्हणजे…
सत्ता-संकेताचा खोटा गौरव,
मुळात नाव मोठं, लक्षण खोटं.
अशा योजना कागदावर राष्ट्र उभारणीचा खोटा दावा करतात, पण प्रत्यक्षात त्या तिजोरीवर ओझं ठरतात. उद्घाटनाच्या दिवशी घोषणा, फीतकापण्या, जाहिरातींचा गजर असतो, पण काही काळातच त्या योजना प्रशासनाच्या विस्मरणात जातात. राजकीय सत्तेला पांढरे हत्ती फार प्रिय असतात. कारण त्यातून दूरदृष्टी नव्हे तर दृश्यता मिळते. दीर्घकालीन सुधारणांपेक्षा अल्पकालीन प्रसिद्धी अधिक महत्त्वाची ठरते. शिक्षण, आरोग्य, पाणी, शेती यांसारख्या मूलभूत प्रश्नांवर शांत काम करण्याऐवजी भव्य स्मारके, अर्धवट प्रकल्प, वापराशिवाय उभ्या असलेल्या इमारती उभारल्या जातात. लोकशाहीतील करदात्याचा पैसा अशा वेळी विकासासाठी नाही, तर अहंकाराच्या पूर्ततेसाठी वापरला जातो.
आजचा खरा प्रश्न असा आहे की, विकास म्हणजे उंच इमारती की उंचावलेले जीवनमान? योजना म्हणजे फक्त घोषणा की टिकणारा बदल? जोपर्यंत मतदार जागरूक होत नाही, तोपर्यंत “पांढरे हत्ती” वाढतच राहणार. सत्तेचा दलाल असणारा हा पांढरा हत्ती ओळखता आला, तरच लोकशाही हलकी होईल, नाहीतर विकासाच्या नावाखाली ओझ्यांची मिरवणूक सुरूच राहील.
असा हा “पांढरा हत्ती”आज बुधवारीय काव्यरत्न स्पर्धेच्या निमित्ताने मराठीचे शिलेदार समूहाचे सर्वेसर्वा आदरणीय राहुल सरांनी सर्व समूहात फिरवला. कुणी त्याला ओंजारले, कुणी गोंजारले, कुणी फटकारले तर कुणी त्याला दूषणं पण दिलीत. एकंदर….विषयाला साजेसा न्याय देण्याचा तुम्ही सर्वांनी प्रामाणिक प्रयत्न केला त्याबद्दल तुम्हा सर्वांचे खूप खूप अभिनंदन. पुढील लिखाणास खूप खूप शुभेच्छा.
सविता पाटील ठाकरे,सिलवासा
मुख्य परीक्षक,प्रशासक, कवयित्री
लेखिका, कार्यकारी संपादक
©मराठीचे शिलेदार समूह



