“तहानलेल्या वन्यजीवांचा आक्रोश; वनविभागाच्या निष्काळजीपणामुळे जंगलातील पाणवठे कोरडे!”
४२ अंश तापमानात वन्यजीव पाण्यासाठी वस्तीवर; वन्य पशु-प्राणी मित्र भागवत झाल्टे यांचा संतप्त हल्लाबोल

“तहानलेल्या वन्यजीवांचा आक्रोश; वनविभागाच्या निष्काळजीपणामुळे जंगलातील पाणवठे कोरडे!”
४२ अंश तापमानात वन्यजीव पाण्यासाठी वस्तीवर; वन्य पशु-प्राणी मित्र भागवत झाल्टे यांचा संतप्त हल्लाबोल
वसुधा नाईक, प्रतिनिधी
बिनधास्त न्यूज नेटवर्क
नाशिक/ येवला, (दिनांक : ०३ जून): येवला तालुक्यातील विसापूर वनपरिक्षेत्रातील कातरवाडी, रापली, वडगाव पांगू, समिट, तळेगाव रोही, कातरणी, विसापूर व परिसरातील जंगलांमध्ये वन्यजीवांसाठी तयार करण्यात आलेले कृत्रिम पाणवठे व पानवटे पूर्णपणे कोरडे पडल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे. सध्या परिसरात तापमान तब्बल ४२ अंश सेल्सिअसच्या पुढे गेले असून वन्यजीवांना पाण्यासाठी मोठी भटकंती करावी लागत आहे. शासनाकडून वन्यजीव संवर्धनासाठी लाखो रुपयांचा निधी खर्च केला जात असताना अनेक पाणवठ्यांमध्ये पाण्याचा एक थेंबही नसल्याने वन विभागाच्या कार्यक्षमतेवर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.
पाण्यासाठी वन्यजीवांचा मानवी वस्तीकडे मोर्चा:
जंगलातील पाण्याची तीव्र टंचाई निर्माण झाल्याने मोर, हरिण, ससे, कोल्हे, तरस, खोकड, लांडगे, रानडुक्कर तसेच बिबट्यासारखे वन्यजीव पाण्याच्या शोधात थेट शेतवस्त्या आणि मानवी वस्तीच्या दिशेने येत असल्याचे चित्र दिसून येत आहे. त्यामुळे मानव-वन्यजीव संघर्षाची शक्यता वाढली असून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान:
पाण्याच्या शोधात वन्यजीव शेतात घुसून टोमॅटो, मिरची, फ्लॉवर, कुबु वांगी पालेभाज्या व इतर पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान करत असल्याची तक्रार शेतकऱ्यांनी केली आहे. आधीच नैसर्गिक संकटांचा सामना करणाऱ्या शेतकऱ्यांसमोर हे नवीन संकट उभे ठाकले आहे.
बिबट्यांच्या वावरामुळे नागरिकांमध्ये भीती:
पाण्याच्या शोधात बिबट्यासारखे हिंस्र वन्यप्राणी मानवी वस्तीजवळ येऊ लागल्याने नागरिक, लहान मुले आणि पाळीव जनावरांच्या सुरक्षेचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे.
“वनविभाग रक्षक की भक्षक?” – भागवत झाल्टे
वन्य पशु-प्राणी मित्र व समाजसेवक भागवत झाल्टे यांनी वन विभागाच्या कार्यपद्धतीवर तीव्र नाराजी व्यक्त करत म्हटले की, “वन्यजीवांच्या संरक्षणासाठी शासन मोठा निधी देते. मग जंगलातील पाणवठे कोरडे कसे? मुक्या प्राण्यांना पाण्यासाठी तडफडत ठेवणे ही अत्यंत गंभीर बाब आहे. संबंधित अधिकाऱ्यांनी तात्काळ पाण्याची व्यवस्था करावी.”
त्यांनी जंगलतोड, वनमजुरांचे रखडलेले वेतन आणि वनविभागाच्या विविध योजनांतील निधीच्या वापराबाबतही प्रश्न उपस्थित केले.
“पाणी भरले नाही तर आम्ही स्वतः भरणार”:
भागवत झाल्टे यांनी स्पष्ट इशारा देत सांगितले की, वन विभागाने तातडीने टँकरद्वारे कोरड्या पाणवठ्यांमध्ये पाणी भरण्याची व्यवस्था केली नाही तर वन्य पशु-प्राणी मित्रांच्या मदतीने ते स्वतः पाण्याची व्यवस्था करतील.
वनमजुरांचे ८ ते ९ महिन्यांचे वेतन रखडले?:
परिसरातील वनमजुरांचे गेल्या आठ ते नऊ महिन्यांपासून वेतन थकीत असल्याची बाबही समोर आली आहे. त्यामुळे वन विभागातील प्रशासनावर कामगारांमध्ये तसेच स्थानिक नागरिकांमध्ये तीव्र नाराजी असल्याचे बोलले जात आहे.
एका वर्षात अनेक वन्यजीवांचा मृत्यू:
विसापूर बिट वनपरिक्षेत्रातील विविध भागांमध्ये गेल्या वर्षभरात मोर, हरिण आणि इतर वन्यजीवांचे विहिरीत पडून तसेच रेल्वेखाली आल्याने मृत्यू झाल्याच्या घटना घडल्या आहेत. स्थानिक नागरिकांच्या म्हणण्यानुसार, संबंधित वनरक्षक व वनपाल घटनास्थळी वेळेवर पोहोचत नसल्याने वन्यजीवांच्या संरक्षणाबाबत गंभीर प्रश्न उपस्थित होत आहेत.
वनरक्षक वनपाल व RFO यांची बदलीची मागणी:
स्थानिक शेतकरी, ग्रामस्थ, समाजसेवक आणि वन्यजीवप्रेमींनी विसापूर वनपरिक्षेत्रातील संबंधित वनरक्षक व वनपाल RFO यांची तातडीने बदली करण्याची मागणी केली आहे. वन्यजीव संरक्षणासाठी मंजूर होणारा निधी नेमका कुठे खर्च होतो, याचीही चौकशी करण्याची मागणी होत आहे.
लोकप्रतिनिधींना साकडे:
दिंडोरी लोकसभा मतदारसंघाचे खासदार भास्करराव भगरे, महाराष्ट्र राज्याचे मंत्री छगन भुजबळ, आमदार सुहास कांदे, आमदार नरेंद्र दराडे, शिक्षक आमदार किशोर दराडे तसेच आमदार राहुल आहेर यांनी या गंभीर प्रश्नाकडे तातडीने लक्ष देऊन वन्यजीवांच्या संरक्षणासाठी आवश्यक उपाययोजना कराव्यात, अशी मागणी भागवत झाल्टे यांनी केली आहे.
“मुक्या प्राण्यांना पाणी मिळालेच पाहिजे. वन्यजीवांचे संरक्षण ही केवळ वन विभागाची नव्हे तर संपूर्ण समाजाची सामूहिक जबाबदारी आहे. पाणवठे तातडीने भरले नाहीत तर जनआंदोलन उभारले जाईल.”
भागवत झाल्टे, वन्य पशु-प्राणी मित्र व समाजसेवक



