Breaking
कृषीवार्ताकोकणखानदेशदादरा नगर हवेलीदेश-विदेशनागपूरपरीक्षण लेखपश्चिम महाराष्ट्रपुणेब्रेकिंगभंडारामराठवाडाविदर्भसंपादकीयसाहित्यगंध

हिरवं सपान डोळ्यात भरण्याचा ‘प्रारंभ’ ; स्वाती मराडे

गुरूवारीय चित्रचारोळी स्पर्धेचे काव्यपरीक्षण

0 1 8 3 1 2

हिरवं सपान डोळ्यात भरण्याचा ‘प्रारंभ’ ; स्वाती मराडे

गुरूवारीय चित्रचारोळी स्पर्धेचे काव्यपरीक्षण

यावर्षी तो आला अगदी केलेला वायदा पूर्ण करावा तसे वेळेवर पोहोचला. विरहाग्नीत होरपळलेली ती त्याला पाहताच सुखावली. धुंद होऊन गंधित झाली. त्या गंधाने आसमंत व्यापले. पाऊस सरी पाहून ती धरा तृप्त झाली. फक्त धराच नव्हे तर, समस्त सृष्टीच टपो-या थेंबांचं ते लयबद्ध कोसळणं डोळ्यात साठवू लागली. कुणी सरींना तळहातावर झेलले, तर कुणी माथ्यावर घेत आनंदाने नाचही केला. पण सगळ्यात जास्त हसू फुलले ते बळीराजाच्या ओठांवर. का नाही फुलणार हसू ? वाट पाहून पाहून डोळ्यात पाणी येतं. तरी तो येत नाही. आकाशाकडे डोळे लावून कितीही पाहिले तरी, तो मात्र इकडे डोकावतही नाही. तो आला तो आला अशी चाहूल लागते, आकाश नभांनी व्यापून जातं नि हूल देऊन निघून जातं…! जणू त्याला यायला सवडच भेटत नाही. अशीच सवय असलेला बळीराजा असा अचानक आलेला पाऊस पाहून सुखावतोच. अन् प्रारंभ होतो त्याच्या लगबगीचा.

गेला वळीव निघून, आला मिरग फिरून
कु-या चालल्या रानात, सुरू झालीय पेरण.

होतो प्रारंभ ऋण धरणीचे फेडण्यासाठी. नांगरणी, वखरणी झालेल्या धरतीच्या देहावर पाणी पडताच ती लोण्यासारखी विरघळून मऊ होते. नवांकुर निर्माण करण्यासाठी, चैतन्याचं गाणं गात मनात आस जागवत मग तो बळीराजाही स्वार्थ म्हणून, ‘स्वतःसाठी धान्य पेरतो नि परमार्थ म्हणून पिकांची पुढची पिढी जगवतो’. तो कधी पेरणी करून तिची कुस भरतो, तर कधी दत्तकपुत्र दिल्याप्रमाणे लावणी करून पीक अंगाखांद्यावर खेळायला लावतो. पण तिथेच प्रारंभ होतो नवजीवनाचा, हिरवं सपान डोळ्यात भरण्याचा, चिखल अंगाला माखला तरी मनसोक्त मृद्गंध मनात साठवण्याचा, घामाच्या मोतीहारांनी शृंगारत धनधान्यरूपी माणिक मोती पिकवण्याचा.

केवळ पेरणी नव्हे,
नवसृजनाचा तो प्रारंभ करतो
ऋण मातीचे फेडता फेडता
मनामनात तो नवसोहळाच पेरतो..!

आज गुरूवारीय चित्रचारोळी स्पर्धेसाठी आलेले चित्र शेतात ‘भात लावणी’ करणा-या स्त्रियांचे. पावसाळ्यातील शेतीकामाचे बोलके चित्र. खरेतर मला आठवले ते शेतीचा शोध स्त्रीनेच लावला हे वाचलेले. अन् या चित्रातही लावणी करणा-या सर्व स्त्रियाच आहेत. नवनिर्मितीचा प्रारंभ करणारीही तीच अन् स्वतःच्या कुशीतून नवनिर्माण करणारीही तीच. असेच काहीसे मनात डोकावले. आजच्या आपणा सर्वांच्या रचनाही मनात नवचैतन्य जागवणा-या. लावणीचे हुबेहूब चित्र शब्दातून खुलवणा-या. चिखल, माती, लोकगीते यांच्या आठवणी जागवत सुरेख शब्दपेरणी अंकुरित झाली. सर्व सहभागी रचनाकारांचे हार्दिक अभिनंदन. आदरणीय राहुल दादांनी मला परीक्षण लेखणीची संधी दिली त्यांचे हृदयस्थ आभार.

सौ स्वाती मराडे,इंदापूर जि.पुणे
मुख्य परीक्षक सहप्रशासक कवयित्री लेखिका
©मराठीचे शिलेदार समूह

5/5 - (1 vote)

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 1 8 3 1 2

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे