‘पत्रकारांनी अश्वारूढ होऊन सत्यरक्षणाचा दिग्विजय करावा’; विष्णू संकपाळ
‘पत्रकारांनी अश्वारूढ होऊन सत्यरक्षणाचा दिग्विजय करावा’; विष्णू संकपाळ
शुक्रवारीय हायकू काव्य स्पर्धेचे परीक्षण
‘पत्रकारिता’ हा लोकशाहीचा चौथा स्तंभ आहे. हा नैतिक दृष्टीने जितका, निर्भिड आणि परखड तितकीच जनमानसात लोकशाही अधिक मजबूत होण्यास मदत होते. एक काळ असा होता की, राष्ट्रीय बांधिलकी, समाजप्रबोधन, सत्यरक्षण आणि अन्याय अत्याचाराविरुद्ध आवाज उठवणे यासाठीच पत्रकारिता केली जायची. अधर्माचे परखडपणे वाभाडे काढणार्या पत्रकारामुळे न्यायव्यवस्था सुद्धा अधिक सुदृढ आणि निष्पक्षपाती होण्यास मदत होते.
पत्रकारिता म्हणजे नैतिकता आणि बांधिलकीचा वारसा, समाजमनाचा स्वच्छ आरसा, ज्याला दंभ नसावा फारसा, लेखणीने घ्यावा जनहिताचा वसा, पत्रकारिता म्हणजे धगधगता विद्रोही अंगार, खदखदता बंडखोर उद्गार, असंतोषाचा लाव्हा, केवळ सत्य आणि सत्यासाठीच बिजलीसारखी तळपावी जीव्हा, पत्रकारितेत हवी निर्भिडतेची चमक, सत्य वदण्याची धमक, सत्तांध मुजोरशाहीवर उठवावा सवाल खोचक, मनमानी धनिकावर बसवावी जबर वचक, नारीगौरवाचा असावा कृतीशील शिवविचार, सारासार विवेकबुद्धीचा आदर्श आचार आणि प्रलोभनाला धुडकावणारा स्पष्ट उच्चार.
आज ‘सोशल मिडिया:चा प्रचंड सुळसुळाट आणि धनलोभीवृत्तीने गाठलेला कळस. ज्यात पत्रकारितेने किळसवाणे स्वरूप गाठले आहे. सत्याची मोडतोड, तत्त्वांशी तडजोड, आणि कुणाच्या तरी प्रभावाखाली कळसूत्री बोलघेवडेपणाचा निलाजरेपणा करताना या लोकशाहीच्या चौथ्या स्तंभाच्या सशक्ततेवर प्रश्नचिन्ह लावले आहे..!
गर्दभ लिला
नैतिकतेचा र्हास
बाहुले खास
या सर्व पार्श्वभूमीवर काल ‘शुक्रवारीय हायकू’ स्पर्धेसाठी समूह प्रमुख आदरणीय राहुल दादांनी दिलेले चित्र अत्यंत बोलके आहे.आजच्या विकाऊ मिडियावर मार्मिक भाष्य करणारे हे चित्र एक खोचक सवाल आहे. या अनुषंगाने गेल्या पंधरा दिवसांपासून देशात गाजत असलेला नीट परीक्षेचा वादग्रस्त निकाल हे एक ज्वलंत उदाहरण आहे. अशी शेकडो उदाहरणे पत्रकारितेच्या गाढवी अधःपतनाची देता येतील. २४ तास बातम्यांच्या नावाखाली शेंडा बुडखा नसलेल्या गोष्टीचे जणू चर्वितचर्वण चालू असते. हाही शुद्ध गाढवपणाच नव्हे काय?
असे प्रकार वेळीच रोखून त्यांनी अश्वारूढ होऊन दिमाखदारपणे सत्यरक्षणाचा दिग्विजय करावा आणि लेखणी स्वातंत्र्याचा योग्य वापर करत हा लोकशाहीचा चौथा स्तंभ अधिक प्रगल्भ आणि सशक्त बनवावा हीच अपेक्षा. या चित्राच्या अनुषंगाने अतिशय सुरेख हायकू रचनांचे प्रकटीकरण झाले. ज्वलंत विषयाला वाचा फोडण्याचे काम नेहमीच समूहाच्या माध्यमातून राहुल दादा करत आले आहेत. याच कामी आपल्या सर्व सारस्वतांची लेखणी झिजते आहे याचेच मनस्वी समाधान वाटते. आज मला या विषयावर परिक्षण लिहिण्याची संधी दिल्याबद्दल आ. राहुल दादा आणि समूह प्रशासनाचे आभार.
विष्णू संकपाळ बजाजनगर छ. संभाजीनगर
©सदस्य सहप्रशासक मराठीचे शिलेदार समूह