Breaking
आरोग्य व शिक्षणई-पेपरक्रिडा व मनोरंजनछत्रपती संभाजी नगरदेश-विदेशनागपूरपरीक्षण लेखब्रेकिंगमराठवाडामहाराष्ट्रमुंबईराजकियविदर्भसंपादकीयसाहित्यगंध

आमची मुले यंदा मराठीतच नापास; ‘लाभले आम्हास भाग्य…बोलत नाही मराठी’

मराठी विषयात 38 हजार 437 विद्यार्थी नापास

0 3 3 2 8 4

आमची मुले यंदा मराठीतच नापास; ‘लाभले आम्हास भाग्य…बोलत नाही मराठी’

अभिजात दर्जेचा फज्जा; कुठे नेऊन ठेवलीय मराठी भाषा

मराठी विषयात 38 हजार 437 विद्यार्थी नापास

‘लाभले आम्हास भाग्य, बोलतो मराठी…‌’ हे वाक्य आपण मोठ्या अभिमानाने म्हणत असलो, तरी याच मराठी भाषेची तिची जन्मभूमी असणाऱ्या महाराष्ट्रात अवहेलना होताना वारंवार दिसत आहे. राज्य माध्यमिक मंडळाच्या दहावीच्या निकालामुळे सगळीकडे आनंद व्यक्त होत होत असताना समस्त मराठी जनांंसाठी हा निकाल लाजिरवाणाच म्हणावा लागेल. महाराष्ट्राची मातृभाषा जी मराठी आहे, जिला नुकताच अभिजात भाषेचा दर्जा मिळाला आहे, त्याच मराठी विषयात दहावीत राज्यातील तब्बल 38 हजार 437 विद्यार्थी नापास झाले आहेत.

या निकालावर एक नजर टाकली तर इंग्रजीपेक्षाही महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांना आपली मातृभाषा मराठी कठीण जात असल्याचे दिसते. कारण इंग्रजीच्या तुलनेत मराठी विषयामध्ये नापास होणाऱ्या विद्यार्थ्यांची टक्केवारी सहापटीने जास्त आहे. मराठी विषयात 38 हजार 437 विद्यार्थी नापास, तर इंग्रजीत सहा हजार 738 विद्यार्थी अनुत्तीर्ण झाले आहेत. मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळाला म्हणजे आपण मैदान मारले असे नाही, तर मराठी ही महाराष्ट्रातील प्रत्येक व्यक्तीच्या बोलण्यात, मनात ठासवली गेली पाहिजे, तरच तिचा अभिजात दर्जा टिकून राहील, पण आज अनेक उच्चभ्रू समजल्या जाणाऱ्या मराठी घरांमधून मराठीला दुय्यम मानले जाते. त्याऐवजी हिंदी व त्याहीपेक्षा मराठीला अधिक प्राधान्य दिले जाते.

इंग्रजांनी आपल्याला पारतंत्र्यातून मुक्त केले असले, तरी त्यांच्या भाषेचे गारुड आजही मनावर आहे. मुंबई ही जशी देशाची आर्थिक राजधानी आहे तशीच ती महाराष्ट्राची राजधानी आहे. मुंबईसह संयुक्त महाराष्ट्रासाठी 108 हुतात्मांनी हैौतात्म्य पुकारले आहे. मात्र, आज याच मुंबईत मराठीची गळचेपी सुरू आहे. मराठी भाषा सोडा, पण या महानगरी मुंबईतून मराठी माणूसच हद्दपार होण्याचा मार्गावर आहे. लोकांच्या जिव्हाळ्याच्या प्रश्नावर नेहमीच राजकारण करणाऱ्या राजकीय नेत्यांन देखील याबाबत काही सोयरसूतक नाही. मराठी माणसांच्या जीवावर मोठ्या झालेल्या काही राजकीय संघटनांनी आपल्या तत्त्वांनाच तिलांजली दिल्यामुळे मराठी माणूस आणि मराठी भाषेबद्दल त्याला पुन्हा मायेचा पाझर फुटला, तर तो त्याच्या राजकीय स्वार्थासाठी फुटू शकतो.

काही संघटनांनी राज्यातील दुकानांवर मराठीत बोर्ड असावेत म्हणून खळखट्ट्याकसारखे प्रयोग केले. मात्र, त्यांच्या या आंदोलनाला म्हणावा तसा प्रतिसाद व राजकीय पाठबळही मिळाले नाही. मराठीजनांपासून दूर जात असलेल्या या संघटना आता राजकीय अंधारात आपले अस्तित्व शोधताना दिसत आहेत. त्यामुळे महाराष्ट्रात मराठी भाषेबरोबर मराठी माणूसदेखील एकाकी पडला आहे. महाराष्ट्राला देशाची आर्थिक राजधानी समजले जाते. त्यामुळे अनेक राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय कंपन्या, संस्था यांना आपले कार्यालय अथवा शाखा महाराष्ट्रात असावी, असा अट्टहास असतो. पण त्यांना येथील मराठी भाषा व मराठी माणसाची ॲलज असावी असे त्यांचे कामकाज असते. मराठीला तुच्छ मानून हिंदी व बहुतांश इंग्रजी भाषेतूनच त्यांचे व्यवहार सुरू असतात. येथील कॉर्पोरेट संस्कृती पाहून याठिकाणी धोतर व डोक्यावर गांधी टोपी घालून जाण्यास मराठी माणूस लाजतो. संगणक क्रांती आणि त्यानंतर आलेली मोबाईल क्रांती यामुळे मराठीची अधिकच गळचेपी झाली आहे. आपण मुक्त व्यापार धोरण स्वीकारल्यामुळे व्यापारात भरभराट झाली असताना, मराठी भाषेपासून आपण मात्र दुरावत चाललो आहोत.

कारण व्यापारासाठी इंग्रजी ही वैश्विक भाषा बनली आहे. संगणक क्रांती, वाढते व्यापारीकरण यामुळे इंग्रजी भाषेने अनेक शब्दांना जन्म दिला. मात्र, या इंग्रजी शब्दांना पर्यायी मराठी शब्द शोधण्यात आपण कमी पडलो. काही पर्यायी शब्द मराठी भाषेने जन्माला घातले असले, तरी ते उच्चारताना आपली त्रेेधातिरपीट उडते. महाराष्ट्रातील सर्वच राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय कंपन्यांच्या व्यावसायिक कार्यालयातून मराठीला दुय्यम स्थान दिले जात असताना, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या कार्यालयांना देखील आता मराठी भाषा व माणसांची ॲलर्जी आहे की काय, असे वर्तन त्यांच्याकडून होताना दिसत आहे. साधारण तीन महिन्यांपूव मराठी भाषा दिनाच्या पूर्वसंध्येला मराठी भाषेची गळपेची काढणारे परिपत्रक उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे राजकीय ‌‘ठाणे‌’ ओळखल्या जाणाऱ्या ठाणे महापालिकेने काढले होते. मराठी भाषेतून एम.ए.चे शिक्षण घेतलेल्या कर्मचाऱ्यांना यापुढे अतिरिक्त वेतनवाढ न देण्याचा निर्णय ठाणे महापालिकेने घेतला होता. मात्र, मनसेचे आंदोलन आणि समाजमाध्यमांवरील वाढत्या दवाबामुळे महापालिका प्रशासनाने हा निर्णय रद्द केला.

अशाच प्रकारे 2020 मध्ये मराठी शाळांच्या घटत्या पटसंख्येचे कारण पुढे करून व त्यांना मिळणाऱ्या अनुदानावर लक्ष ठेवून अनुदानित मराठी शाळांना अनुदानाचे स्वरूप कायम ठेवून पूर्ण इंग्रजी माध्यमात परावर्तित करण्याचा प्रस्ताव एका शिक्षक संघटनेने शिक्षण आयुक्तालयाकडे पाठवला होता. आज महाराष्ट्रातून मराठी शाळाच हद्दपार होत असताना विद्यार्थ्यांकडून मराठीत पास होणे सोडा पैकीच्या पैकी गुणांची अपेक्षा कधी धरावी? आज इंग्रजीपेक्षाही विद्यार्थ्यांना मराठी भाषा कठीण वाटत आहे. कारण दिवसेंदिवस मराठी भाषेतील तज्ज्ञांची संख्या कमी होत आहे. जे आहेत ते कामचलाऊ मराठी शिकवतात. काना, मात्रा, वेलांटी या मराठी भाषेतील शृंगाराबाबत त्यांना काही देणे-घेणे नाही. त्यामुळे मराठी विषयात नापास होणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या वर्षागणिक वाढतच आहे. भाषेला केवळ राजाश्रय मिळून चालत नाही, तर तिला लोकाश्रय मिळाला पाहिजे. कारण बोलण्यातूनच भाषा समृद्ध होत जाते. संस्कृती, परंपरा, भावभावना हे भाषेला समृद्ध करणारे घटक आहेत. भाषेचा शोध लागला म्हणूनच विज्ञान-तंत्रज्ञानाचा शोध लागला. आज अनेक वर्षांच्या संघर्षानंतर मराठी भाषेला अभिजात दर्जा म्हणजे राजाश्रय लाभला असला, तरी लोकाश्रयापासून ती दुरावत चालली आहे. मराठीला आपण मनात स्थान दिले तरच ती आपल्या ओठावर येईल. मात्र, मराठी भाषेला आपण मनातच स्थान देण्यास तयार नाही. त्यामुळे ‌‘लाभले आम्हास भाग्य, तरी आम्ही बोलत नाही मराठी…‌’ हे वाक्य बोलायची आता वेळ आहे.

(दैनिक गावकरी सहसंपादक यांच्याकडून साभार)

5/5 - (1 vote)

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 3 3 2 8 4

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे
बातमी देण्यासाठी येथे क्लिक करा
11:41