‘माझ्या पतीला आत्महत्या करण्यास प्रवृत्त करणा-यावर कारवाई करण्यास पोलीसांचा नकार’; जयश्री गोमासे
‘माझ्या पतीला आत्महत्या करण्यास प्रवृत्त करणा-यावर कारवाई करण्यास पोलीसांचा नकार’; जयश्री गोमासे
हिंगणा गुन्हे शाखेचा तपास संशयास्पद असल्याचा दावा
‘राहुल गोमासे’ आत्महत्या प्रकरणाचा तपास थंडबस्त्यात
नागपूर जिल्हा प्रतिनिधी
नागपूर: हिंगणा तालुक्यातील आमगाव देवळी येथील युवा शेतकरी राहुल दत्तूजी गोमासे यांनी आपल्या शेतातील बांधावर असलेल्या आंब्याच्या झाडाला फास लावून आत्महत्या केली आहे. आत्महत्या करण्यापूर्वी राहुलने आपल्या पत्नीला अंदाजे 20 पेक्षा जास्त व्हॉईस मॅसेज केले आहे. त्यात गावातील काहींनी त्याला मानसिक त्रास दिल्याचे नावासहीत सांगितले आहे. हिंगणा पोलिसांनी या घटनेचा तपास थातूर मातूर पद्धतीने केला आहे. व्हॉईस मॅसेज असताना सुध्दा अद्याप पर्यंत सायबर सेलकडून तपासणी केली नाही. तीन महिन्यापासून तपास स्थानिक गुन्हे शाखेने थंड बस्त्यात ठेवला आहे.
नेमके काय घडले
हा तपास सक्षम अधिकारी यांचे कडून करून न्याय मिळून देण्याची मागणी मृतकाची पत्नी जयश्री राहुल गोमासे यांनी निवेदनाच्या माध्यमातून राज्याचे उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री व पोलिस आयुक्तांना केली आहे. तसेच निवेदनात असेही म्हंटले की आमगाव देवळी येथील युवा शेतकरी राहुल दत्तूजी गोमासे हे 12 मार्च 24 रोजी पहाटे 4 30 वाजताच्या दरम्यान घरी कुणालाही न सांगता घराबाहेर पडले. मंगळवारी सकाळी त्यांच्याच शेतात आमगाव शिवारात त्यांचा मृतदेह झाडाला लटकताना गावातील नागरिकांना दिसला. या वेळेस पोलिसांनी आकस्मिक गुन्हा दाखल केला. घटनेच्या दुसऱ्या दिवशी पत्नी जयश्रीला दुसऱ्या दिवशी राहुलने सोशल ऍपवर पाठविलेले जवळ पास 25 मेसेज दिसले ते मेसेज राहुलने आत्महत्या करण्याआधी शेतातून पाठविले अशी माहिती पत्नी जयश्रीने दिली आहे.
पोलीसांची कारवाई शून्य
यामध्ये त्याने काही आर्थिक व जमिनीच्या व्यवहाराबाबत त्याला मानसिक व आर्थिक त्रास देणाऱ्यांची स्पष्टपणे नावेच घेतली आहे. स्थानिक गुन्हे शाखेने तो मोबाईल घेऊन त्याचा तपास करू असे पत्नी जयश्री गोमासे व कुटुंबातील सदस्यांना सांगितले. मात्र तीन महिन्यापासून याबाबत काय तपास केला अद्यापही कळविले नाही. या प्रकरणाची तक्रार करण्यास हिंगणा पोलिस स्टेशनमध्ये गेले असता, तक्रार घेतली नाही व एफ. आय. आर.ची प्रतसुध्दा दिली नाही .
काय म्हणाले नेमके पोलीस?
या प्रकरणात पत्नी किंवा वडिलांना फिर्यादी करणे आवश्यक होते ते सुध्दा केले नाही. या प्रकरणात बयान सुध्दा घेतले नाही. तसेच अशा आत्महत्या करण्यास प्रवृत्त करणाऱ्या प्रकरणात आमचेकडून काहीही कारवाई केल्या जात नाही असेही पोलिस सांगण्यास विसरले नाही.असेही जयश्री गोमासे म्हणाल्या. त्यामुळे पती राहुलच्या आत्महत्येस जबाबदार असणाऱ्या, शेती विक्री व्यवहारातील आरोपीवर तात्काळ गुन्हा दाखल करावा अशी विंनती राज्याचे उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्रजी फडणवीस तथा नागपूर पोलिस आयुक्त यांना निवेदनाद्वारे केली आहे.