‘नात्यांच्या गुणाकाराचे ‘तारतम्य’ हे एकच सूत्र”; वैशाली अंड्रस्कर
शनिवारीय काव्यस्तंभ स्पर्धेचे परीक्षण
‘नात्यांच्या गुणाकाराचे ‘तारतम्य’ हे एकच सूत्र”; वैशाली अंड्रस्कर
शनिवारीय काव्यस्तंभ स्पर्धेचे परीक्षण
टिचर… तुमच्याकडे किती वेगवेगळ्या रंगाचे स्वेटर आहेत…? या प्रश्नाने मी आनंदित होण्याऐवजी विचारमग्न झाले. काय उत्तर द्यावे सुचेना? कसेबसे होय म्हणून प्रश्न विचारणाऱ्या मुलांना शांत केले मात्र मेंदूतील विचारांचा तळ पार ढवळला होता.
काही वर्षांपूर्वी मराठी माध्यमात शिकणारी मुले-मुली बऱ्यापैकी मध्यम वर्गातील होती. त्यामुळे आईवडिलांकडून त्यांची हौसमौज, कोडकौतुक व्हायचेच आणि आपणही केलेली वेशभूषा असो की इतर काही दिसणे वागणे यात तितकासा फरक पडत नव्हता. परंतु आता काळ बदललेला इंग्रजी माध्यमाच्या ओढीने पालकवर्ग ओढाताण करून इंग्रजी वर्गात पाल्यांचे प्रवेश घेऊ लागला. मग उरलेली अतिशय हलाखीच्या परिस्थितीतील मुले-मुली बहुसंख्येने मराठी माध्यमात आलेली. हाता-तोंडाची गाठ जुळविताना मॅचिंग, नवेकोरे, शाळेच्या गणवेशात समाविष्ट असलेले स्वेटर घेणे सर्वांना परवडेनासे होते. या विचाराचे तारतम्य न बाळगता मी हौसेपोटी घातलेले मॅचिंग स्वेटर मला आता खुपू लागले. त्या स्वेटरच्या उबेऐवजी माझे शरीर माझ्या विद्यार्थ्यांच्या प्रश्नाने आणि परिस्थितीने अधिकच गारठून गेले.
असे अनेक प्रसंग आपल्या आयुष्यात येत असतात. रक्ताने मिळालेली नाती, शैक्षणिक, व्यावसायिक संबंधाने जुळलेली मैत्री वा हाताखालील कामकरी वर्ग सारीच आर्थिक, सामाजिक पातळीवर एकसारखी नसतात कधी; पण त्यांना जुळवून ठेवताना शब्द, वाचा, लकब यातून ते दुखावले जाणार नाही हेच आपले कर्तव्य आणि हेच तारतम्य. हे ज्याला जमले त्याच्यासारखा या जगात सुखी कुणी नाही….हेच नात्यांच्या गुणाकाराचे एकमेव सूत्र खरंय ना…!
आज शनिवारीय काव्यस्तंभ स्पर्धेच्या निमित्ताने मराठीचे शिलेदार समूहात माननीय मुख्य प्रशासक राहुल पाटील यांनी ‘तारतम्य’, विषय देऊन शिलेदारांना मनातील भाव व्यक्त करण्याची संधी दिली आणि सर्वांनीच तोडीस तोड रचना लिहिल्या. सर्वांचे खूप खूप अभिनंदन आणि भावी वाटचालीस भरभरून शुभेच्छा.!
सौ.वैशाली उत्तम अंड्रस्कर, चंद्रपूर
कवयित्री/लेखिका
©सहप्रशासक/मुख्य परीक्षक/संकलक
©मराठीचे शिलेदार समूह