“सापशिडी – पापपुण्य, नैतिकता शिकवणारा खेळ”; शर्मिला देशमुख
मंगळवारीय 'आम्ही बालकवी' स्पर्धेचे परीक्षण
“सापशिडी – पापपुण्य, नैतिकता शिकवणारा खेळ”; शर्मिला देशमुख
मंगळवारीय ‘आम्ही बालकवी’ स्पर्धेचे परीक्षण
तेराव्या शतकातील भारतीय कवी, तत्त्वज्ञ, संत ज्ञानेश्वर माऊली महाराज यांनी कवड्या व फाशांचा उपयोग करून ‘सापशिडी: हा खेळ बनवला. सापशिडी हा खूप जुन्या काळातील भारतीय खेळ आहे. त्याकाळी या खेळाला “मोक्षपट” किंवा “मोक्षपटम्” म्हटले जायचे. आजही सापशिडीसाठी वेगवेगळी नावे वापरली जातात. सापसिदी, सानप सिडी, ज्ञानचौपर ही काही नावे तसेच इंग्रजीमध्ये स्नेक अँड लॅडर किंवा चुट्स अँड लॅडर्स अशी नावे पाहायला मिळतात.
संत ज्ञानेश्वरांनी मुलांना नैतिकता आणि स्वतःच्या कृतीचे परिणाम सांगण्यासाठी, शिकवण्यासाठी या खेळाची निर्मिती केली. आयुष्य हा सापशिडीचा पट आहे, तर साप हे हाव, क्रोध, मत्सर ,अभिलाषा यांचे प्रतिक आणि शिडी हे सत्कर्म, सदाचार ,परोपकार, उत्कर्ष, प्रगतीचे प्रतिक मानले जायचे. समाजात चांगले वावरणाऱ्या माणसांना मोक्ष मिळतो म्हणजे, शिडी तर वाईटांना साप गिळतो व पुनर्जन्म घ्यावा लागतो. पूर्वी पटावर देव- देवता, झाडे, पाने ,फुले, प्राणी माणसे अशी चित्रे बाजूने असायची. काळ बदलत गेला तसे पटाचे स्वरूप बदलले. आता बाजारात वेगवेगळे पट मिळू लागले. पटावर पुढे जाऊन मागे यावे लागते म्हणून “बॅक टू स्क्वेअर वन” हा शब्द सापशिडीमुळे प्रचलित झाला. सापशिडी हा खेळ लोकप्रिय आहे कारण या खेळाचे सोपे नियम, मनोरंजकता, शैक्षणिक मूल्य (अर्थातच, संख्याज्ञान, गणन, निर्णयक्षमता) तसेच सामाजिक बंधन हे होय.
सापशिडीचा चौकोनी बोर्ड असून बोर्डाच्या खालच्या चौकापासून सुरुवात तर शेवट वर असतो. काही बोर्डावर 100 ,120 किंवा 150 चौके असतात. हा खेळ खेळताना फाशांचा सावध व विचारपूर्वक वापर करावा लागतो. इतर खेळाडूंचे निरीक्षण करावे लागते. दोन किंवा दोन पेक्षा अधिक खेळाडू एकत्र खेळू शकतात. शेवटच्या चौकीवर प्रथम जाणारा खेळाडू जिंकतो. साप शिडी बोर्डाची काही लक्षणे असतात. जसे की, रंगसंगती ,डिझाईन. सध्या साप व शिड्या ऐवजी इतर चित्रांचाही वापर केला जाऊ लागला आहे. सापांचे चित्र सामान्यतः लाल रंगाचे आणि बोर्डावर उभे असतात तर शिड्या हिरव्या रंगाच्या असून उभ्या असतात. वेगवेगळ्या रंगांमध्ये ही हा पट आढळतो.
अशाप्रकारे या खेळाचा फक्त मनोरंजन हा उद्देश नसून, सांस्कृतिक व अध्यात्मिक महत्त्व सुद्धा आहे. आजकाल जगभरात खेळला जाणारा हा खेळ विविध भाषांमध्ये अनुवादित केला जाऊन त्याच्या अनेक आवृत्तीही उपलब्ध आहेत. या खेळाची ऑनलाईन आवृत्ती ही उपलब्ध आहे, ज्यामुळे जगभरातील इतर खेळाडूंबरोबर खेळण्याची संधी मिळते. आता तुम्ही म्हणाल हे ‘सापशिडी’ पुराण कशासाठी? अहो ,आपल्या राहुल दादांनी नाही का मंगळवारीय बालकाव्य स्पर्धेमध्ये “सापशिडी” हा विषय दिला आणि विषय सापशिडीच्या उत्पत्ती पासून आज पर्यंतचा प्रवास सांगून गेला. घरात बसून खेळण्यासाठीचा हा लोकप्रिय खेळ आज ज्ञानाच्या कक्षा रुंदावण्यासाठीच जणू दादांनी समूहात दिला. समूहातील काही बालकवी मात्र सापशिडी खेळण्यात दंग झाले. जास्तीत जास्त सहभाग वाढवून शिलेदारांनी बालमनाचा, बालपणाचा आनंद घ्यावा. सर्व सहभागी शिलेदारांचे अभिनंदन! तूर्तास थांबते. धन्यवाद..!!!
शर्मिला देशमुख -घुमरे, बीड
सहप्रशासक/परीक्षक मराठीचे शिलेदार समूह