भंडारा बायपासने राष्ट्रीय महामार्गाची ‘समृद्धी’ येणार दृष्टिपथात !
भंडारा, प्रतिनिधी संदीप नंदनवार
भंडारा बायपासने राष्ट्रीय महामार्गाची ‘समृद्धी’ येणार दृष्टिपथात !
-७३८ कोटींचा महत्वकांक्षी सहापदरी मार्ग
-जिल्ह्यासाठी विकासाचा महामेरुही
आंतरराज्यीय पातळीवरही होणार फायदा
भंडारा, प्रतिनिधी संदीप नंदनवार
भंडारा: शहरासाठी १४.८ किलोमीटर लांबीचा सहापदरी बायपास मार्ग राष्ट्रीय महामार्गाची समृद्धी ठरावी असा ७३८ कोटींपेक्षा जास्त खर्च केला जाणारा महत्वाकांक्षी प्रकल्प दृष्टिपथात येत आहे. राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ५३ वर असलेल्या बेला ते शिंगोरी या मार्गावर तयार करण्यात येत असलेला हा प्रकल्प झपाट्याने पूर्णत्वाकडे जात आहे. वेळ, इंधन व पैशांचीही बचत या महामार्गामुळे होणार असून वैनगंगा नदीवरील एक लेन पूर्ण झाले असून दुसऱ्या पुलाचे काम सुरू आहे. सन २०२५ मध्ये या नववर्षात हा बायपास मार्ग भंडारा जिल्ह्यासाठी विकासाचा महामेरू ठरणार असून याचा फायदा आंतरराज्यीय पातळीवरही होणार आहे.
दरम्यान, राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ५३ वरील निर्माणाधीन हा बायपास महामार्ग बांधकामासाठी खर्च ६१८.७५ कोटी रुपये असून भुसंपादन व युटीलीटी शिफ्टिींगसह ७३८ कोटी ६७ लाख रुपयांचा खर्च यावर होणार आहे. अपेक्षेप्रमाणे ठरवून दिलेल्या कालावधीत या बायपासचे काम पुर्ण झाले नसले तरी ३१ मार्च २०२५ पर्यंत काम पूर्ण करण्याचे उद्दिष्ट आहे. परिणामी या नववर्षांत या बायपासचा उपयोग रहदारीसाठी सुरू होईल. बायपास मार्गावरील रहदारी एकदा सुरू झाल्यास भंडारा शहरातून गेलेल्या महामार्गावरील रहदारी कायमस्वरुपी बंद होणार आहे. थेट लाखनी, साकोली व रायपूरकडे जाणारी वाहने बायपासचा उपयोग करतील. तसेच भंडारा, पवनी आणि तुमसरकडे जाणाऱ्या प्रवाशांसह सामान्य नागरिक, व्यवसायिक व अन्य घटक भंडारा शहराकडे येतील. परिणामी जड वाहतुकीतून भंडारा शहरवासीयांची कायमस्वरुपी वाहतूक कोंडीतून सुटका होणार आहे. याच मार्गावर नवीन रोजगाराच्या संधीही उपलब्ध होणार आहेत.
■ वैनगंगा नदीवर ६०० मीटर लांबीचा पुल
बायपासच्या १०.३४ किमी लांबीच्या ग्रीनफिल्डला दोन उड्डाणपूल आणि १७ अंडरपास प्रदान करून सर्व्हिस रोड आणि अतिरिक्त रस्ता सुरक्षा प्रदान करून पूर्णपणे प्रवेश-नियंत्रण आहे. तर नागपूर-रायपूर विभागादरम्यान उत्तम कनेक्टिव्हिटी आणि वाहनांची अडचण मुक्त होण्यासाठी भंडारा बायपास अत्यंत आवश्यक आहे. वैनगंगा नदीवरील ६०० मीटर लांबीच्या सहा पदरी पुलामुळे वाहतूक कोंडी कमी होईल.
■१३ गावातील ५८.८९ हेक्टर जमीन संपादीत
प्रकल्प उभारणीसाठी आवश्यक जमीन संपादित करण्यासाठी सुमारे १०१.७१ कोटी रुपये खर्च करण्यात आले. हा बायपास उजव्या बाजूने (नागपूरहून येताना) चार लेन रस्ता जिथे संपतो तिथूनच सुरू करण्यात आला आहे. हा बायपास रोड वैनगंगा नदीनंतर पलाडी येथे समाप्त होतो. दरम्यान सहापदरी बायपास महामार्ग बांधकामासाठी भंडारा तालुक्यातील तब्बल १३ गावांमधील ५६.८९ हेक्टर आर. जमीन संपादीत करण्यात आली आहे. बायपास मार्गासह वैनगंगा नदी पुलावर दोन लेन पुलाचे बांधकाम, एक उड्डाणपुल, दोन भूमीगत रस्ते, सहा लहान स्वरुपाचे भूमीगत रस्ते, लहान मोठे १५ पुल, १७ किलोमीटरचा सर्वांस मार्ग, २१ लहान जंक्शन आणि चार बसथांचे निर्माण केले जात आहेत.
■ गावांचे रुपडे पालटणार
महामार्ग क्रमांक ५३ वरील बायपास महामार्गाच्या बांधकामामुळे या मार्गावरील अन्य गावांचेही रुपडे पालटणार आहे. अजीमाबाद, बेला, भिलेवाडा, दवडीपार, दिघोरी, हंसापूर, गिरोला, खापा, कोरंभी, पलाडी, सालेबर्डी, सिरसघाट, उमरी आदी गावांचा यात समावेश राहणार आहे. महामार्गाच्या या गावांच्या जवळून बायपास गेल्याने व्यवसायाच्या दृष्टीने संधी निर्माण होणार आहे. पर्यायाने रोजगार निर्मितीला मोठ्या प्रमाणात हातभार लागण्याची चिन्हे आहेत. त्यातच वैनगंगा नदीपात्रात जल पर्यटनाच्या माध्यमातूनही गाव विकासाला चालना मिळणार आहे.
■ पिंगलेश्वरी देवस्थानही गजबजणार
महामार्गाच्या बांधकामाजवळच प्रसिद्ध कोरंभी येथील माता पिंगलेश्वरी यांचे देवस्थान आहे. बायपास पूर्ण झाल्यानंतर मातेच्या दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांचीही संख्या हमखास वाढणार आहे.
■ वैनगंगा नदीवर पूल उभारणे एक आव्हान
जेव्हा नद्यांमध्ये पूल तयार केले जातात तेव्हा पाणी ३-४ मीटर राहते, परंतु वैनगंगा नदीमध्ये ८-१० मीटरपेक्षा जास्त पाणी स्थिर स्थितीत आढळते. त्यामुळे वैनगंगेवर पूल बांधण्यासाठी बराच वेळ लागला व हे पुल उभारणे एक आव्हानच होते. त्यामुळे मार्ग पूर्ण करण्यासाठी २४ महिन्यांची मुदत देण्यात आली होती.
■ प्रकल्पात खालील गोष्टींचा समावेश आहे
१. आधारभूत भिंती बांधणे
२. पुलांचे बांधकाम
३. सेवा रस्त्यांचे बांधकाम
४. रस्ता विभाजक बांधणे
५. पादचारी मार्गांचे बांधकाम
६. संबंधित पायाभूत सुविधांचे बांधकाम
■ १४.८ किमी सहा-लेन बायपास अपडेट
📍 भंडारा एनएच-५३ चा भाग या ७०० कोटींच्या NHAI प्रकल्प पूर्ण झाल्यावर,
✅ वाहतूक कोंडी कमी होणार
✅ नागपूर-रायपूर कनेक्टिव्हिटी
✅ वैनगंगा नदीचा पूल प्रवाशी व पर्यटकांसाठी एक आकर्षण ठरेल
🌟सध्याची स्थिती:
✔️ रस्त्याचे काम पूर्ण झाले
✔️ पथदिवे बसवले
✔️ वैनगंगा पुलाचे ५० टक्के काम झाले



