गौमातेला ‘राष्ट्रमाता’ घोषित करा; उमरेड तहसीलदारांना भावपूर्ण निवेदन सादर
प्रतिनिधी : अखिल रोडे

गौमातेला ‘राष्ट्रमाता’ घोषित करा; उमरेड तहसीलदारांना भावपूर्ण निवेदन सादर
प्रतिनिधी : अखिल रोडे
उमरेड शहर/ तालुका
बिनधास्त न्यूज मिडीया
नागपूर/ उमरेड: ( दि २७) गौ-सन्मान आवाहन अभियानांतर्गत २७ एप्रिल हा दिवस संपूर्ण भारतात ‘गौ-सन्मान दिवस’ म्हणून उत्साहात साजरा करण्यात आला. याच निमित्ताने उमरेड येथील समस्त गौप्रेमी, वारकरी संप्रदाय आणि विविध संघटनांच्या वतीने गौमातेला राष्ट्रीय मातेचा दर्जा मिळावा आणि गोवंश हत्या कायमस्वरूपी थांबवण्यात यावी, या मागणीसाठी उमरेडचे तहसीलदार यांच्यामार्फत देशाचे पंतप्रधान, राष्ट्रपती, राज्यपाल आणि राज्याचे मुख्यमंत्री यांना निवेदन सादर करण्यात आले.
वारकरी संप्रदाय आणि संघटनांचा पुढाकार:
सोमवारी सकाळी ९ वाजता जुन्या बस स्टॉपवरील हनुमान मंदिर येथे सर्व गौभक्त एकत्र आले. तेथून भव्य दिंडी भजन मिरवणूक काढून तहसील कार्यालय गाठण्यात आले. या अभियानाचे नेतृत्व हरिभक्त परायण डॉक्टर प्रदीप महाराज इंगळे तसेच ह.भ.प. शंकर महाराज कावळे , ह.भ.प. श्रीहरी महाराज घरत यांनी केले. यावेळी सकल वारकरी संप्रदाय, विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलाचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
लोकसहभागातून स्वाक्षरी मोहीम:
गौमाता हे केवळ जनावर नसून ते आपल्या संस्कृतीचे श्रद्धास्थान आहे, ही भावना जनमानसात रुजवण्यासाठी भव्य स्वाक्षरी मोहीम राबवण्यात आली. “तुमची एक स्वाक्षरी गौमातेचे रक्षण करू शकते,” असे आवाहन यावेळी करण्यात आले. हजारो नागरिकांनी या निवेदनावर स्वाक्षऱ्या करून आपला पाठिंबा दर्शवला.
“गौमातेचे रक्षण करणे आणि तिला तिचा हक्काचा सन्मान मिळवून देणे हे प्रत्येक भारतीयाचे कर्तव्य आहे. जोपर्यंत गायीला राष्ट्रमाता घोषित केले जात नाही, तोपर्यंत आमचा हा लढा सुरूच राहील.” ह.भ.प. डॉ. प्रदीप महाराज इंगळे
यावेळी तहसीलदारांना निवेदन देताना संपूर्ण परिसर ‘जय गौमाता, जय गोपाल’ आणि ‘जय श्री राम’च्या घोषणांनी दुमदुमून गेला होता. प्रशासनाला दिलेल्या निवेदनात गोवंश हत्या बंदी कायद्याची कडक अंमलबजावणी करण्याची मागणीही करण्यात आली आहे.



