‘मराठवाडा मुक्तिसंग्राम’ आणि रझाकारांचा उदयास्त; तारका रूखमोडे
परीक्षणीय लेख
‘मराठवाडा मुक्तिसंग्राम’ आणि रझाकारांचा उदयास्त; तारका रूखमोडे
‘मराठवाडा मुक्तिसंग्राम’ म्हणजे भारतीय इतिहासाचे एक धगधगते रक्तरंजित पर्व आहे.१५ऑगस्ट १९४७ ला वीर शहिदांच्या रक्ताला न्याय मिळून भारतीय स्वातंत्र्याचा झेंडा फडकला.सारा भारत स्वातंत्र्याच्या तेजात उजळून निघत असताना मात्र मराठवाडा पाशवी अत्याचाराच्या जोखडात होरपळत होता. मराठवाड्याला खरी मुक्ती मिळायला १७ सप्टेंबर १९४८ची पहाट उजाडावी लागली. कारण त्याची पाळेमुळे निजामशाहीच्या क्रौर्यात व रझाकारांकडून होणाऱ्या अत्याचाराच्या परिसीमेत..सामान्य जनतेच्या रक्तरंजित इतिहासात दडलेली आहेत.
होय…हदय विदीर्ण करून टाकणारे ते मुक्तिसंग्रामातील मराठी माणसांचे मृत्यूचे प्रत्येक थरार आठवले की अंगावर काटा उभा राहतो. सम्राट अशोकाच्या 16 महाजनाच्या पदांपैकी अश्मक व मूलक हे गोदावरीच्या खोऱ्यात सुखानं नांदणारं प्राकृत बोलणारं महाराष्ट्राचं एक सुंदर प्राकृत रूप मराठवाड्याच्या रूपाने प्रसिद्ध होतं. यावर अनेकांनी आपली हुकूमत गाजवली.हे हैदराबाद संस्थानात होते. जेव्हा भारत स्वतंत्र झाला तेव्हा ५६५ संस्थानांपैकी हैदराबाद,जम्मू काश्मीर व जुनागड हे तीन संस्थान भारतात विलीन झाले नाहीत. हैदराबाद संस्थान भारतात विलीन होण्यापासून वाचवण्यासाठी निजाम मीर उस्मान अली बहादूर खान याचा कारभारी कासीम रझवी याने ‘रझाकार’ नावाची अनौपचारिक मुस्लीम स्वयंसेवक सेना..जी क्रूर अर्धसैनिक दल वा शिवी, देशद्रोही या नावाने ओळखली जाते ती भरती केली.
हैदराबाद संस्थानाला संघराज्यात समाविष्ट करण्यासाठी स्वामी रामानंद तीर्थ यांच्या नेतृत्वाखाली स्वातंत्र्याचा बिगूल वाजवला गेला व मुक्तिसंग्राम सुरू झाला या पार्श्वभूमीवर इस्लामिक राज्य कायम ठेवण्यासाठी इस्लामाचा रक्षक व हिंदूंचा भक्षक असलेला निजाम रझाकारांकरवी क्रूर अत्याचार करू लागला.हिंदूवर बंदुकीच्या फैरी झडून शवांचे खच पडू लागले. स्त्रियांशी हीन दर्जाचे निर्दयी पाशवी कृत्य केले जाऊ लागले.जालियनवाला बाग हत्याकांडापेक्षाही शेकडो भयावह कांड रझाकारांनी घडवले.या विरोधात मराठवाडा मुक्ती पर्व सुरू झाले.तेव्हा तिरंगा ध्वज जो कोणी फडकवेल त्याला गोळी घालून जागीच ठार केले जाईल असा वटहुकूम काढण्यात आला.
या वटहुकूमाला धुळकावून लावत गोरठा येथील भाऊराव पाटलाने घरावर ध्वज फडकवला.तेव्हा गोरठा व होनाडी ,बिदर या गावावर अडीच हजार रझाकारांनी आकस्मिक हल्ला चढवला..घरांना आग लावण्यात आली. घराचे दरवाजे तोडत बोकडासारखे लोकांना ओढत आणून चरा चरा तलवारीने त्यांना कापून काढले गेले. डुमणे सावकाराच्या वाड्यात सातशे लोक लपलेले असताना रझाकारांनी वाड्याला आग लावली,अनेक जण त्यात जळून राख झाले.शवांना दुर्गंधी सुटली तरी सात दिवस उलटूनही पंचनाम्यासाठी गावात एकही अधिकारी फिरकला नाही.
तुच्छ क्रूरतेची सीमा म्हणजे
भैरवपल्ली मधील बैठाखुम्मा उत्सव साजरा होत असताना युवकांची रझाकारांनी कत्तल सुरू केली व या कत्तलीचा आसुरी आनंद घेत महिलांना पकडून विवस्त्र करून या रक्ताच्या व शवांच्या खचात नग्न अवस्थेत स्त्रियांना नाचायला लावले.हा नरसंहार तर क्रूरतेचा अगदी कळसच होता.मृत्यूचा तांडव गावागावात सुरू झाला असताना बसवकल्याणच्या रस्त्याच्या बाजूला पाटील दडून बसले व व रस्त्याने जात असलेल्या निजामाला जागीच ठार केले.
रझाकारात हाहाकार उडाला या अन्यायी राजवटीच्या विरोधात सरदार वल्लभभाई पटेल यांनी वेगाने पावले उचलली व निर्णायकपणे’ऑपरेशन पोलो’ मेजर जे. एन.चौधरी यांच्या नेतृत्वाखाली सुरू केले. १३ सप्टेंबरला एकाच वेळी रणगाड्यांनी पाचही बाजूने हुकूमशाहीवर आक्रमण केले व पाच दिवसात हैदराबाद संस्थानास जेरीस आणले. मराठवाड्याच्या गावागावात हा संग्राम लढला गेला.यात बाबासाहेब परांजपे,शंकरसिंह नाईक विजयसिंग,रवीनारायण रेड्डी,दिगंबरराव,अशा कित्येक वीरांचे योगदान लाभले. १७ सप्टेंबर १९४८ रोजी निजामाने माघार घेतली. शीतल कूस देणारी स्वतंत्रता देवी लोकांना मिळाली. 1046 गावांनी आपल्या घरावर तिरंगा झेंडा अभिमानाने फडकवला.
हैदराबाद मुक्तिसंग्रामातील सुवर्णपान असलेली ही विजयगाथा अशा रक्तरंजीत घटनांनी माखलेली आहे. २७ हजार ते ४० हजार लोकांचा जीव या मराठवाडा मुक्ती संग्रामात गेला.अदम्य साहस,दुर्दम्य विश्वास,पोलादी निर्धाराच्या बळावर लढला गेलेला हा मुक्तिसंग्राम म्हणजे साहस व मनोबळाची परिसीमाच जणू..
आज ७६ वर्षानंतरही या भडभडणाऱ्या जखमा भरून आल्या असल्या तरीही या जखमातून सांडलेले रक्त आजही विसरता येत नाही त्याचं व्रण कायमच मराठी हृदयावर कोरले गेलेले आहे. जेव्हा जेव्हा इतिहासाचे पाने पलटली जातील तेव्हा तेव्हा या लढ्यातील हुतात्म्यांच्या आहुतीची मशाल मनामनात पेटत राहील व प्रत्येक माथा नतमस्तक होईल. निकराचा लढा देणाऱ्या सर्व हुतात्म्यांना आजच्या पावनदिनी मराठीचे शिलेदार समूहातर्फे मानवंदना..!!!



