“दारोदारी येणारा घासलेटवाला…. काळाच्या ओघात गेला लयाला…”; विष्णू संकपाळ
शुक्रवारीय हायकू काव्यस्पर्धेचे परीक्षण

“दारोदारी येणारा घासलेटवाला…. काळाच्या ओघात गेला लयाला…”; विष्णू संकपाळ
शुक्रवारीय हायकू काव्यस्पर्धेचे परीक्षण
“कालाय तस्मै नमः…” अर्थात काळाला प्रणाम..! कोणत्याही गोष्टीच्या प्रतिक्षेचा काळ खूप कठीण असतो. मात्र मागे वळून पाहिले, तर लक्षात येते की आरे किती भूरर्कन उडून गेले ते दिवस..? कळलेच नाही इतका प्रवास कधी झाला!! १९७५ ते ९० चा काळ आठवतो का? जरा डोकावून बघा या काळात.” अगं ये सुमे…’जरा तेल्याच्या दुकानातनं पिंटभर राक्याल घिऊन ये गं पाच रूपयाचं.’ अजून संघात आलं नाही तवर काढू चार दिस” किंवा “अगं ये हिराक्का चिमणीभर राकेल उसनं दे गं, संघातनं आणलं की देती परत” गावात कुठं रात्रीचा कार्यक्रम असेल तर, पेटता पलिता किंवा बत्तीत घालायला राॅकेलची तजबीज आधीच करून ठेवावी लागायची, सुगीच्या दिवसात रात्री मळणीला, वस्तीला शेतावर जायचे असेल तर कंदिलात राॅकेलच कामी यायचे. दहावीच्या अभ्यासाला रात्री जागायचं तर राॅकेलची चिमणीच सोबत करायची.
पावसाळ्यात चूल पेटत नसेल तर शेणकुटावर थोडं राॅकेल ओतलं की काम व्हायचं. त्यावेळी पिंट, अर्धा पिंट असा मोजमापाचा उल्लेख व्हायचा. खेड्यात राजदूत मोटरसायकल असायची पेट्रोल अचानक संपले तर बिचारी राॅकेल पिऊन चालायची. अनेकांच्या आत्महत्या, गवताच्या गंज्या. पूर्ववैमनस्यातून घरे दारे राॅकेलच्या साक्षीनेच स्वाहा होत होती. शहरात घासलेटटटटटटट.वालालालाला……अशी एक दमदार आरोळी काॅलनीत घुमली की, स्री पुरूष पाच लिटरचे कॅन घेऊन त्याच्या भोवती गर्दी करायचे.वीस रूपयात भरून मिळायचे. घरोघरी स्टोव्ह ज्यात राॅकेलवरच सैपाक व्हायचा, काॅलेज अथवा शिक्षणासाठी पार्टनरशिप मध्ये रहायचे तर स्टोव्ह आणि राॅकेल अविभाज्य भाग. कधी कधी तुटवडा निर्माण व्हायचा, तेव्हा आख्खं शहर पालथी घालावं लागायचं. तर असे हे राॅकेल म्हणजे दैनंदिन गरजेपासून ते माणूस सरणावर गेला तरीही याच्या स्पर्शानेच अभिमंत्रित करून भडाग्नी दिला जायचा. अखेरपर्यंत सोबत करणारे एक दिव्य ज्वालाग्राही रसायन. !!!
काल ‘शुक्रवारीय हायकू काव्य’ स्पर्धेकरिता आ. राहुल दादांनी दिलेले चित्र पाहताक्षणीच वरील सर्व आठवणी जाग्या झाल्या.. चित्रात हातगाडीवर लादलेले “एलिफंट स्टँडर्ड व्हॅक्युम ब्रँण्डचे” एक राॅकेलचे बॅरल आहे. खालील बाजूस असलेल्या तोटीद्वारा तो विक्रेता लिटर. पाच लिटरच्या मापाने ते वितरीत करीत आहे. घरगुती वापरासाठी इंधन म्हणून राॅकेलचा सर्रास वापर होत असे. जुन्या काळात कधी कधी गावच्या किराणा दुकानात, राशन दुकानात राॅकेल अल्पदरात मिळत होते. पुढे पुढे याच राॅकेलचा रंग निळा झाला आणि तुटवडा पण भासू लागला. एव्हाना गॅस सिलेंडर आणि गॅस शेगडीने बहुतांश सैपाकघराचा ताबा घेतला होता. सन २०००नंतर तर राशन दुकानातून राॅकेल गायब झाले आणि खाजगी वितरण सुद्धा हळूहळू लयास गेले.
तसे या व्यवसायावर पोट भरणारे लोक इतर पर्यायाच्या शोधात विकेंद्रित झाले… आणि घासलेटवाला……. ही दमदार हाक कायमची काळाच्या पडद्याआड गेली.. मात्र त्या सर्व आठवणी आजच्या चित्राने जाग्या केल्या.. समूह प्रमुख आदरणीय राहुल दादांची हीच खरी खासियत आहे की, अशा प्रकारचे चित्र विषय देऊन रचनाकारांसमोर एक आव्हान उभे करतात.. समस्त हायकूकारांनी वैविध्यपूर्ण रचना देत हे आव्हान लिलया पेलले आहे. आज मला परिक्षणाची संधी दिल्याबद्दल आ. राहुल दादांचे आभार.
विष्णू संकपाळ बजाजनगर छ. संभाजीनगर
मुख्य परीक्षक, कवी, लेखक, संकलक
©सहप्रशासक मराठीचे शिलेदार समूह





