सत्याचा, सत्तेलाच खडा सवाल “सत्तामेव जयते” का ?: प्रशांत ठाकरे
शनिवारीय काव्यस्तंभ स्पर्धेचे परीक्षण
सत्याचा, सत्तेलाच खडा सवाल “सत्तामेव जयते” का ?: प्रशांत ठाकरे
शनिवारीय काव्यस्तंभ स्पर्धेचे परीक्षण
“सत्यमेव जयते नानृतं सत्येन पन्था विततो देवयानः”: अर्थात… सत्याचाच विजय होतो, असत्याचा नाही. हे भारदार वाक्य २६ जानेवारी १९५० रोजी भारताचे राष्ट्रीय ब्रीदवाक्य म्हणून स्वीकारले गेले. “सत्यमेव जयते” ही केवळ राष्ट्रचिन्हावर कोरलेली उक्ती नाही तर, ती भारतीय बौद्धिक परंपरेतील एका गहन नैतिक भूमिकेचे प्रतीक आहे. ‘सत्य म्हणजे केवळ तथ्यांचे संकलन नव्हे, तर न्याय, विवेक, पारदर्शकता आणि आत्मसंयम यांचा समन्वय होय’. सत्य म्हणजे धर्माचा आत्मा…परंतु आजच्या सार्वजनिक जीवनाकडे पाहिले असता असे जाणवते की सत्याच्या या सूक्ष्म आणि कठीण वाटेऐवजी सत्ता मिळवण्याची, ती टिकवण्याची आणि विस्तारण्याची प्रवृत्ती अधिक निर्णायक होत चालली आहे. त्यामुळेच अनेकदा “सत्यमेव जयते”च्या जागी व्यवहारात “सत्तामेव जयते” हीच जीवननीती बनत असल्याचा भास होतो.
खास करून गेल्या तीन वर्षापासून महाराष्ट्राच्या राजकारणातले सत्य… सत्तेकडे झुकलेले पहायला मिळत आहे. सत्य हे विवेक आणि नैतिकता यांच्याही मोजमापांच्या पलीकडचचे मूल्ये आहे, तर सत्ता हे बाह्य रूप आहे. सत्य हे अंतःकरणाशी निगडित आहे तर सत्ता क्षणिक तत्वहीन तडजोड आहे. राजकारणात हा संघर्ष सर्वाधिक ठळकपणे जाणवतो, कारण तिथे निर्णयांचे परिणाम थेट जनजीवनावर होतात. परंतु हा प्रश्न केवळ राजकीय नाही; तर तो सांस्कृतिक आणि मानसिक आहे. सत्य ऐकण्याची अस्वस्थता वाढत आहे, कारण सत्य सत्तेला प्रश्न विचारते.
प्रत्येकवेळा सत्याला सिद्ध व्हावे लागते. इतिहास सांगतो की, अनेकदा सत्ता तात्पुरती विजयी भासली, पण दीर्घकाळात तिचे स्वरूप बदलले, तर सत्याने समाजाची अंतःप्रवाह दिशा ठरवली. सत्याची वाट संथ असते, पण ती खोलवर रुजते. सत्तेचा मार्ग वेगवान असतो, पण तो अस्थिर असतो. सत्ता क्षणभंगुर असते, कारण ती परिस्थितीवर अवलंबून असते पण सत्य टिकते. कारण ते माणसाच्या अंतःकरणाशी जोडलेले असते.
हाच विचार मनात ठेवून आज ‘शनिवारीय काव्यस्तंभ’ स्पर्धेसाठी ‘मराठीचे शिलेदार’ समूहाचे सर्वेसर्वा आदरणीय राहुल सरांनी “सत्तामेव जयते” हा विषय दिला. आपण तात्कालिक विजयासाठी मूल्यांचा त्याग करणार आहोत का, की दीर्घकालीन समाजहितासाठी सत्याची कास धरणार आहोत? हा प्रश्न केवळ मानवी भवितव्याशी निगडित आहे. हा विचार मनात ठेवून सर्व कवी, कवयित्रीनी आपली लेखणी हाती घेतली आणि विषयाचा योग्य न्याय दिला. कारण अखेरीस समाजाला दिशा देणारी गोष्ट सत्ता नसते, तर सत्यावर उभा राहिलेला विवेक असतो हे पटवून देणारे कवी समाज बदलायचे सामर्थ्य ठेवतात हे आज मला प्रकर्षाने जाणवले. तेव्हा तुम्हा सर्वांचे खूप खूप अभिनंदन पुढील लिखाणासाठी खूप खूप शुभेच्छा…!!
प्रशांत ठाकरे, सिलवासा
दादरा नगर हवेली दीव आणि दमण
मुख्य परीक्षक/ लेखक/ समीक्षक
©सहप्रशासक मराठीचे शिलेदार समूह



